योगासने करण्याआधीच्या आवश्यक सूचना
- जेवणानंतर सहा तासानी, दूध प्यायल्यानंतर दोन तासांनी किंवा अगदीच अनशापोटी आसने करावीत.
- शौच-स्नानादीतून निवृत्त झाल्यावरच आसने करावीत.
- आसने करताना श्वास तोंडाने न घेता नाकानेच घ्यावा.
- जमिनीवर काहीही न अंथरता कधीही आसने करू नये. गरम ब्लँकेट, घोंगडे, गोणपाट किंवा एखादे विद्युतरोधक आसन अंथरून त्यावरच आसने करावीत, जेणेकरून शरीरात निर्माण झालेली विद्युतशक्ती नष्ट होणार नाही.
- आसन करताना शरीरासोबत जबरदस्ती करू नये. आसन म्हणजे कसरत नव्हे. म्हणून आसने धैर्यपूर्वक करावीत.
- आसने केल्यानंतर थंडीत किंवा जोराचा वारा वाहत असताना बाहेर जाऊ नये. स्नान करायचे असल्यास थोड्या वेळाने करावे.
- आसने करताना अंगावर कमीतकमी व सैल कपडे असावेत.
- आसने करताना अधूनमधून व शेवटी शवासन करून शिथिलीकरणाद्वारे शरीराच्या ताठरलेल्या स्नायूंना आराम द्यावा.
- आसने झाल्यावर लघुशंकेला अवश्य जावे, जेणेकरून एकत्रित झालेली दूषित तत्त्वे लघवीवाटे बाहेर निघून जातील.
- आसने करताना त्या-त्या आसनांच्या कृतीत सांगितलेल्या चक्रावर ध्यान केल्याने व मानसिक जप केल्याने अधिक लाभ होतो.
- आसनानंतर थोडे ताजे पाणी पिणे लाभदायक आहे. ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्यात विभाजित होऊन संधिस्थानाच्या भागातून मल बाहेर काढण्यासाठी पाणी खूप आवश्यक असते.
- स्त्रियांनी गरोदरपणात आणि मासिक पाळीत कोणतेही आसन कधीही करू नये.
- आरोग्याच्या इच्छुक प्रत्येक व्यक्तीने सकाळी तुळशीची ५-६ पाने खाऊन वरून पाणी प्यावे. यामुळे स्मरणशक्ती वाढते तसेच आम्लपित्त व इतर व्याधींतही लाभ होतो.
आसनाच्या कृतीत येणाऱ्या काही अवघड शब्दांचे अर्थ –
- रेचक : श्वास सोडणे
- पूरक : श्वास आत घेणे
- कुंभक : श्वास आत किंवा बाहेर रोखून ठेवणे.
- अंतकुंभक : दीर्घ श्वास घेऊन आतच रोखून ठेवण्याच्या क्रियेला अंतकुंभक किंवा आभ्यांतर कुंभक असे म्हणतात.
- बहिकुंभक : श्वास बाहेर सोडून परत न घेता तो बाहेरच रोखण्याच्या क्रियेला बहिर्कुभक म्हणतात.