विरारची आई जीवदानी
महाराष्ट्रात अनेक जागृत देवस्थाने असून त्यातील बरीच स्थाने पर्वत, दऱ्या-खोऱ्यात असून आपल्या भक्तांचे रक्षण करीत आहेत. भाविकांनी श्रद्धा आणि भक्ती भावनेने केलेल्या नवसाला देवता हमखास फळ देतात. अशीच एक मनोकामना पूर्ण करणारी आदिशक्ती ‘जीवदानी माता’ होय. आपल्या महाराष्ट्रात २६० पेक्षा जास्त किल्ले आहेत. या किल्ल्यांपैकीच ‘जीवधन’ हा किल्ला ‘जीवधन’ नावाच्या डोंगरावर होता. या डोंगराच्या गुहेत ‘जीवदानी माता’ प्रगट झाली. विरार रेल्वे स्थानकापासून पूर्वेस सुमारे दीड-दोन मैलावर जीवदानी मातेचे मंदिर आहे.
तिच्या पायथ्याशी अत्यंत सुरेख असे गणेश मंदिर आहे. भक्त प्रथम गणेशाचे दर्शन घेतात. नंतर कासवाच्या प्रतिकृतीला पुष्प, हळद-कुंकू वाहून पायऱ्या चढण्यास भाविक सुरुवात करतात. या गडाची उंची पायथ्यापासून सुमारे ९०० फूट असून एकूण १४०० पायऱ्या आहेत. दुतर्फा असलेली हिरवीगार नयनरम्य वनराजी डोळ्याचे पारणे फेडते.
पायऱ्या पूर्ण चढून गेल्यावर याच डोंगर माथ्यावर काही चौरस फूटाचा सपाट भाग लागतो. या सपाट जागेवर पूर्वी मंदिर अथवा देवतेची मूर्ती असं काहीही नव्हतं. एक लहान खाड्यात तांदळा’ ठेवला होता. (तांदळा म्हणजे अष्टविनायकाच्या रुपासारखे) त्याचीच लोक भक्तीभावाने पूजा करीत असत. साधारण ही परिस्थिती १९४६ पर्यंत होती. पुढे १९४६ ते १९५६ या काळात बारकीबाय नावाची स्त्री नित्यनियमाने गडावर जाऊन पूजा करीत असे. पुढे मातेच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
पश्चिमाभिमुख असलेल्या मातेच्या मंदिराचे गर्भगृह १० फूट व जेमतेम ६ फूट उंच पाषाणात खोदलेले आहे. सौम्य शीतल व प्रसन्न मुद्रा असलेल्या मातेच्या डाव्या हाती कमलपुष्प असून दुसरा हात आशीर्वाद देण्याच्या स्वरुपात आहे. कोणतेही शस्त्र हातात नसले तरी मूर्तीमागे त्रिशूळ आहे. बाजूला असलेल्या दोन समया अखंड तेवत असतात. तिच्या पाठीमागे असलेल्या पाषाणाच्या विशिष्ट भागावर सुपारी लावून कौल’ मागितला जातो. मातेचा कौल योग्य असल्याचा निर्वाळा अनेक भक्तगण देतात.
देवीला अलंकारांनी विभूषित केले जाते. फुलमालांनी सजलेल्या मातेच्या मोहक रुपाने मन प्रसन्न होऊन जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटल्यास नवल ते काय? मातेच्या डाव्या बाजूला एका दगडी गुहेत श्रीकृष्णाचे मंदिर आहे. ‘कौल’ लावण्यापूर्वी या मंदिरात जाऊन येणे आवश्यक असते. मातेच्या समोर २० फूटाचे गुंफावजा सभागृह आहे. सभागृहाच्या छतावर अष्टमातांच्या प्रतिमा आहेत. ते गेल्यावर डावीकडे कालिका माता व उजवीकडे बारोंडा देवीचे मंदिर आहे.
या मंदिराच्या बाजूने उजवीकडे खाली उतरले की गायगोठा व वाघोबा मंदिराकडे जाता येते. ही दोन्ही मंदिरे गुंफेतच आहेत. शेजारीच पाण्याचे कुंड आहे. आख्यायिकेत गाईच्या प्राणार्पणाचा उल्लेख आहे. त्यात तथ्य आहे. देवीच्या गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला ‘बळी’ देण्याचे स्थान आहे. काही भक्त बळी न देता कोंबडे, बकरे सोडून देतात. भाविकांनी आणलेले खण, नारळ, हार, प्रसाद आदी गाभाऱ्यात उभ्या असलेल्या पुजाऱ्याच्यामार्फत देवीला वाहिले जातात. पहिली आरती पहाटे ५ वाजता होते.
आरतीपूर्व शंखध्वनी केला जातो दुसरी आरती दुपारी १२ वाजता असते. शेवटची आरती सायंकाळी साडेसात वाजता असते. गाभाऱ्याच्या समोर होमकुंड असून तेथे नवरात्रीत अष्टमीला होमहवन होते. विजयादशमी महोत्सव ही धुमधडाक्यात साजरा होतो. नवबालिकांना बोलावून प्रथम भंडारा दिला जातो. ‘जीवदानी’ या देवीस्थानाच्या उत्पत्तीची कथा मोठी विलक्षण आणि अंत:र्मुख होऊन विचार करावयास लावणारी आहे. ज्या डोंगरावर देवी वास्तव्य करुन आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी पश्चिम बाजूला एका अस्पृश्य शेतकऱ्याचे शेत होते.
त्याच्या जमिनीवर गाय चरत असे. पण तिच्या मालकाचा काही पत्ता नसे. त्या शेतकऱ्याला त्या विशिष्ट गायीच्या चराऊचे पैसेही मिळत नसत. म्हणून या गाईच्या मालकाचा छडाच लावायचा असा त्याने निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे संध्याकाळी ती गाय पूर्वेकडचा डोंगर चढू लागली. तिच्या पाठोपाठ शेतकरीही डोंगर चढत होता. गाय डोंगरमाथ्याच्या सपाट जागेवर जाऊन थांबली.
तेवढ्यात त्या गायीसमोर एक स्त्री प्रगटली. त्या शेतकऱ्याला चराऊचे पैसे देऊ केले. तसा शेतकरी म्हणाला, ‘बाई, मी अस्पृश्य आहे, मला शिवू नका.’ शेतकऱ्याचे ते शब्द कानी पडताच ती बाई जणू हवेत विरुन गेली. ती गुप्त होताच त्या गायीने काळीज पिळवटून जाईल असा हंबरडा फोडला आणि दरीत उडी घेतली. शेतकरी आवाक् झाला. गाईने आपल्या जीवाचे दान दिले म्हणून हा डोंगर ‘जीवदानी डोंगर’ म्हणून ओळखला जातो. विरार शहराची ग्रामदेवता असून सर्वांचे श्रद्धास्थान आहे. विश्वस्त मंडळांनी रोप-वे-‘ची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गडावर जाऊन देवीचे दर्शन घेणे सुकर झाले आहे.