हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला वटपौर्णिमा माहिती, इतिहास मराठी । Vat Purnima Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – दसरा (विजयादशमी)
वटपौर्णिमा मराठी । Vat Purnima Information in Marathi
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी सुवासिनी स्त्रिया सौभाग्यवृद्धीसाठी वडाची पूजा करतात. या दिवशी सुवासिनींनी उपवास करावयाचा असतो. या व्रतात मुख्य पूजा सावित्रीचीच असते. परंतु रूढी वेगळी आहे. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली मरण पावला व पुन्हा तिथेच जिवंत झाला म्हणून या दिवशी वडाची पूजा केली जाते. वडाचे झाड जवळ नसेल तर घरीच पाटावर गंधाने वटवृक्षाचे चित्र काढून त्याची पूजा केली तरी चालते. मात्र वडाची फांदी घरी आणून तिची पूजा करणे सोयीचे असले तरी ते शास्त्रसंमत मात्र नाही.
वडाची पूजा केल्यावर कापसाच्या सूत्राने-दोऱ्याने वटवृक्षास तीन व जमल्यास अकरा किंवा सोळा प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. शेवटी पूजा सांगणाऱ्या पुरोहिताला वायन द्यावयाचे असते. ही सावित्री कोण, तिची ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी स्त्रियांनी पूजा का करावयाची, यासंबंधीची कथा मोठी उद्बोधक व विचार करावयास लावणारी आहे. पूर्वी मद्रदेशात अश्वपती नावाचा राजा होता. त्याला सर्व प्रकारचे ऐश्वर्य होते. पण त्याला मूलबाळ नसल्याने तो अतिशय दुःखी होता. मग त्याने संतानप्राप्तीसाठी सावित्रीची आराधना केली. त्या आराधनेमुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवपत्नी सावित्रीने राजाला वर दिला, “तुला माझ्या अंशाने एक कन्या होईल.” काही दिवसांनी राजाला एक दिव्य तेजस्वी कन्या झाली.
सावित्रीच्या वरदानामुळे ती प्राप्त झाली, म्हणून त्याने तिचे नाव ‘सावित्री’ असे ठेवले. सावित्री दिसामाजी मोठी होऊ लागली. ती आता लग्नाला आली. तिनेही सावित्री व्रत केले. एके दिवशी सावित्री आपल्या वडिलांजवळ येऊन बसली असता राजाने तिच्या विवाहाचा विषय काढला. परंतु सावित्रीला साजेसा असा एकही वर राजाला दिसेना. तेव्हा राजा अश्वपती सावित्रीला म्हणाला, “तू आपल्या वृद्ध अमात्यांना बरोबर घेऊन जा व तुला अनुरूप असा वर तू स्वतःच शोध.”
वडिलांनी अशी आज्ञा केली असता सावित्री वृद्ध अमात्यांना बरोबर घेऊन वरसंशोधनासाठी निघाली. ती अनेक देशांत गेली. अनेक राजपुत्रांना तिने पाहिले; पण तिला एकही राजपुत्र पसंत पडला नाही. असे अनेक देश पहात पहात सावित्री आपल्या घरी परत आली. तिने आपल्या पित्याला सांगितले “पिताजी, शाल्व देशाचा धुमत्सेन नावाचा एक धर्मशील राजा आहे. त्याचे राज्य शत्रूने हिरावून घेतले आहे. तो आता अरण्यात राहतो. तो वृद्ध आहे. तो आणि त्याची पत्नी अंध आहेत. त्यांना सत्यवान नावाचा नावासारखाच सत्यवचनी व पराक्रमी पुत्र आहे.
मी त्याला स्खोमन पती म्हणून वरले आहे.” सावित्री हे सांगत होती त्या वेळी नारदमुनी तेथे होते. सावित्रीचे बोलणे ऐकताच ते राजा अश्वपतीला म्हणाले “राजा, सावित्रीने घेतलेला निर्णय योग्य नाही. सत्यवान सर्वगुणसंपन्न आहे हे खरे; पण आजपासून बरोबर एक वर्षाने त्याला मृत्यू येणार आहे.” नारदांनी असे सांगितले असता राजाने सावित्रीला तिचा बेत बदलण्याचा आग्रह केला. पण सावित्री म्हणाली, “नाही. मी माझा निश्चय बदलणार नाही. कन्यादान एकदाच केले जाते. मी मनोमन सत्यवानाला पती म्हणून वरले आहे. तो दीर्घायुषी असो, नाहीतर अल्पायुषी असो.
मी आता सत्यवानाशिवाय दुसऱ्या कुणालाही पती म्हणून स्वीकारणार नाही.” मग एका शुभ मुहूर्तावर सावित्रीचा सत्यवानाशी विवाह झाला. सावित्रीला अतिशय आनंद झाला. ती सत्यवानाबरोबर अरण्यातील झोपडीत राहू लागली. ती आपल्या सासूसासऱ्यांची, सत्यवानाची मनोभावे सेवा करीत होती. परंतु तिला नारदांचे ते शब्द सारखे आठवत होते. एक वर्ष पुरे होत आले तेव्हा सावित्रीने विचार केला, आता आपल्या पतीचा मृत्यू अगदी जवळ आला आहे. मग तिने ज्येष्ठ शुद्ध द्वादशीपासून तीन दिवस सावित्रीव्रत केले. ती सावित्रीचा जप, ध्यान, पूजन करीत होती. ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस.
त्या दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी वनात निघाला. सावित्रीसुद्धा तो नको म्हणत असतानाही त्याच्याबरोबर गेली. सत्यवान एका वटवृक्षावर चढून लाकडे तोडू लागला. परंतु एकाएकी त्याला कसेतरी होऊ लागले. डोक्यात अतिशय वेदना होऊ लागल्या. तो तसाच खाली आला. सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. अतिशय घाबरलेली सावित्री त्याचे डोके चेपू लागली. त्याच वेळी प्रत्यक्ष यमधर्म तेथे आला. सावित्रीने त्याला नमस्कार करून विचारले, “आपण कोण आहात? देव, दैत्य, की गंधर्वे? आणि आपण येथे कशासाठी आला आहात?” यम म्हणाला, “हे सावित्री! संपूर्ण जगाचे नियमन करणारा मी यम आहे.
तुझ्या पतीचे आयुष्य संपले आहे. परंतु तू श्रेष्ठ पतिव्रता असल्याने तुझ्या पतीचे प्राण नेण्यासाठी माझ्या दूतांना न पाठविता मी स्वतःच आलो आहे,” असे बोलून यमाने सत्यवानाच्या शरीरातून अंगुष्ठमात्र पुरुषाला (प्राणाला-जीवाला) बाहेर खेचले व त्याला घेऊन तो दक्षिण दिशेला जाऊ लागला. सावित्री त्याच्या मागोमाग जाऊ लागली. . खूप दूर गेल्यावरही सावित्री पाठ सोडत नाही, हे पाहून यम तिला समजावीत म्हणाला “हे साध्वी, आता तू परत जा. हे कष्ट घेऊ नकोस. इतक्या दूरपर्यंत कोणीही येऊ शकत नाही.” सावित्री म्हणाली, “मी माझ्या पतीच्या बरोबर असताना मला कसलाही त्रास होत नाही.
मी अत्यंत सुखाने येत आहे. पती हेच स्त्रीचे एकमेव आश्रयस्थान आहे. अन्य कोणीही नाही.” यमाने सावित्रीशी अनेक प्रकारे युक्तिवाद केला, पण सावित्रीने जराही माघार घेतली नाही. सावित्रीची पतिनिष्ठा व प्रेम पाहून यम प्रसन्न झाला. तो म्हणाला, “मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. मी तुला हवे असतील ते पाच वर देतो. मागून घे.” सावित्रीने अत्यंत नम्रतेने पुढील पाच वर मागितले.
(१) माझ्या सासऱ्यांना दृष्टी यावी व त्यांचे गेलेले राज्य परत मिळावे. (२) माझ्या पित्याला शंभर पुत्र व्हावेत. (३) मलासुद्धा शंभर पुत्र व्हावेत. (४) माझ्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे व (५) आमची धर्मावर अढळ श्रद्धा राहावी. यमाने सावित्रीला हे सर्व वर दिले व सत्यवानही परत दिला. अतिशय आनंदित झालेली सावित्री आपल्या पतीसह आपल्या घरी परत गेली. अशी ही सावित्री. तिने स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतःच घेतला. संकटांना डगमगली नाही. गरिबीतही सुखसमाधान मानले. प्रत्यक्ष मृत्यूशीही झुंज दिली. आपल्या कर्तृत्वानेच आपण आदर्श होऊ शकतो, हे तिने दाखवून दिले. सावित्री हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरले आहे. म्हणूनच सुवासिनी स्त्रिया या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत करून सावित्रीची पूजा करतात.
काय शिकलात?
आज आपण वटपौर्णिमा माहिती, इतिहास मराठी । Vat Purnima Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.