हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला तुलसीविवाह माहिती, इतिहास मराठी । Tulsi Vivah Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – दत्तजयंती
तुलसीविवाह मराठी । Tulsi Vivah Information in Marathi
कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या काळात आपल्याकडे तुलसी विवाहाचा कार्यक्रम असतो. आपल्या घराच्या अंगणात तुलसी वृंदावन असते. निदान एखाद्या कुंडीत किंवा डब्यात तुळशीचे रोप लावलेले असते. श्रद्धाळू स्त्रिया रोज तुळशीला पाणी घालतात. तिची पूजा करतात. तुळशीला तुलसीमाता म्हटले आहे. तुळस अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती आहे. अनेक लहानमोठ्या आजारांवर तुळशीचा उपयोग होतो. जेथे तुळशीचे बन आहे, तेथील हवा शुद्ध व निरोगी राहते. ज्या घरात तुळस आहे ते घर तीर्थासारखे पवित्र असते. तुळस ही पुण्यदायक, पापनाशक आहे. म्हणूनच आपल्याकडे तुळशीची पूजा केली जाते.
तुळस ही विष्णुप्रिया, विष्णुकांता आहे. भगवान विष्णूला तुळस एवढी प्रिय का, तुलसी विवाह का करतात, याविषयी पद्मपुराणात एक कथा आहे. ती अशीपूर्वी जालंदर नावाचा एक महाभयंकर दैत्य होता. त्याने सर्व देवांना जिंकले होते. त्याच्या पराक्रमापुढे कुणाचे काहीएक चालत नव्हते. त्याच्या पत्नीचे नाव होते वृंदा. वृंदा ही महान पतिव्रता होती. ती संकटकाळी जालंदराला सल्ला देत असे. मदत करीत असे. ती आपल्या पतीची देवासमान सेवा करीत असे. जर वृंदेचे पातिव्रत्य भंग पावले तरच जालंदराचा पराभव होईल व त्याला मृत्यू येईल, असा जालंदराला वर होता.
समोरासमोर युद्ध करून जालंदराचा पराभव करणे व त्याला ठार मारणे ही गोष्ट देवांना अशक्य होती. वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग केल्याशिवाय जालंदर मारला जाणार नाही, हे लक्षात घेऊन विष्णूने एक कपटकारस्थान केले. त्याने कुणाचे तरी धड आणि डोके वृंदेपुढे माकडाकरवी नेऊन टाकले. जालंदर युद्धात मेला, असे देवांनी वृंदेला खोटेच सांगितले. अगदी जालंदरासारखेच ते धड व डोके पाहून वृंदा फसली. जालंदर मेला असे समजून वृंदा शोक करू लागली. इतक्यात तेथे एक कपटी साधू आला. त्याने त्या शरीराच्या तुकड्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला.
मी आत्ता संजीवनी मंत्राने जालंदराला जिवंत करतो असे म्हणाला आणि त्याच क्षणी स्वतः विष्णूच जालंदराचे रूप धारण करून वृंदेपुढे उभा राहिला. तो साधू, ते शरीराचे तुकडे यापैकी तेथे काहीच नव्हते. आपला पती जिवंत झाला हे पाहन वृंदेला अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात तिने जालंदराचे रूप धारण केलेल्या विष्णूला प्रेमाने आलिंगन दिले. तो जालंदर नव्हताच. तो होता विष्णू. वृंदेने परपुरुषाला स्पर्श केल्याने तिच्या पातिव्रत्याचे सामर्थ्य संपले. तिचे पातिव्रत्य भंग पावले. त्या वेळी जालंदर देवांशी युद्ध करीत होता.
पण अजाणतेपणी का होईना, वृंदेच्या हातून पाप घडले. आणि त्यामुळे जालंदर खरोखरच युद्धात मारला गेला. वृंदेला खरा प्रकार जेव्हा कळला तेव्हा तिने क्रोधाने विष्णूला शाप दिलाः “तुला तुझ्या बायकोचा विरह सहन करावा लागेल व माकडांची मदत घ्यावी लागेल.” असा शाप देऊन तिने अग्निप्रवेश केला व ती जळून गेली. आपण एका पतिव्रतेला फसविले याबद्दल विष्णूला पश्चात्ताप झाला. तो वेडापिसा झाला व वृंदेच्या राखेजवळ बसून राहिला. मग विष्णूला शांत करण्यासाठी, त्याचे वेड घालविण्यासाठी पार्वतीने वृंदेच्या राखेवर तुलसी, आवळी व मालती ही तीन झाडे उत्पन्न केली.
काही दिवसांनी शांत झालेल्या विष्णूला त्या तीन झाडांपैकी तुलसी हीच सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटले. म्हणून ती त्याची आवडती झाली. विष्णूनेच पुढे कृष्णावतार धारण केला आणि वृंदाच पुढच्या जन्मी रुक्मिणी झाली. श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून आणले व तिच्याशी कार्तिक शुद्ध द्वादशीला विवाह केला. अशा रीतीने वृंदा, रुक्मिणी व तुलसी एकरूप असल्यामुळे त्याचे स्मरण म्हएत दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या काळात तुलसीविवाहाचा उत्सव करतात. तुलसीवृंदावन सारवून, रंगवून सुशोभित केले जाते. त्याच्या चारी बाजूंना तुऱ्याचे ऊस उभे केले जातात.
झेंडूच्या माळा बांधतात. तुळशीच्या बुंध्याशी आवळे, चिंचा ठेवतात. तुळशीला हिरव्या बांगड्या बांधतात. तुळशीसमोर बालकृष्णाची मूर्ती ठेवतात किंवा विष्णूचे प्रतीक म्हणून शाळिग्राम ठेवतात. मग भटजीला बोलावून विवाहाचे सर्व विधी करतात. विवाहासाठी जमलेल्या सर्वांना अक्षता वाटतात. मग तुलसी ही वधू व बालकृष्ण हा वर यांच्या मध्ये अंतःपट धरतात. मग ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणून मंगलाष्टके म्हणतात.
अंतःपट दूर झाल्यावर घरातील यजमान हातात दोन हार घेतो. त्यांतील एक हार बालकृष्णाला व दुसरा तुलसीला घातला जातो. अशाप्रकारे तुलसीविवाह झाला की लाडू, करंज्या, इत्यादींचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. तुलसीविवाहाच्या वेळी सगळीकडे दिवे लावले जातात. सगळ्यांना प्रसाद दिला जातो. असा असतो तुलसीविवाहाचा समारंभ. तुळशीचे लग्न होईपर्यंत चातुर्मास चालू असतो. तुलसी विवाह झाला की मग मुलामुलींचे विवाह करावयाचे असतात. ज्या मुलींची लग्ने लवकर जमत नाहीत त्यांच्या घरी तुलसीविवाह केला असता लग्न लवकर जमते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
काय शिकलात?
आज आपण तुलसीविवाह माहिती, इतिहास मराठी । Tulsi Vivah Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.