Site icon My Marathi Status

वैष्णवांचे भूकवच तिरुपती बालाजी

भगवत्स्वरुप व्यंकटाचल पर्वत हा संपूर्ण भगवत स्वरुप समजण्यात येतो. त्याचे माहात्म्य स्कंद पुराणात वर्णिले आहे. सर्व वेद व्यंकटेशाचे गुणसंकीर्तन करतात. व्यंकटेश हे विष्णूचेच एकरुप आहे. महाराष्ट्रातील विठ्ठल बालकृष्ण समजला जातो. तसा तिरुपतीचा व्यंकटेशही ‘बालाजी’ या नावाने ओळखला जातो. शेषाचल डोंगर माथ्यावर तिरुमले गाव वसले आहे. त्या डोंगरमाथ्यावरील तिरुमैल गावात व्यंकटेश्वर आहे.

पायाथ्याशी असलेल्या तिरुपती’ गावाच्या नावानेच हे क्षेत्रस्थान ओळखले जाते. या दोन्हीला मिळून तिरुपती बालाजी’ म्हणण्याची प्रथा रुढ झाली आहे. या बालाजीची कथा, आख्यायिका अशी सांगितली जाते की, एकदा भगवान विष्णूंशी लक्ष्मीमातेचे भांडण झाले व ती वैकुंठ सोडून गेली. त्यामुळे एकट्या विष्णूंना करमेना म्हणून ते शेषाचलावर येऊन राहिले.

रुसलेल्या लक्ष्मीचे स्थान व्यंकटेशापासून ३-४ मैलांवर असून ती पद्मावती या नावाने ओळखली जाते. दुसरी आख्यायिका अशी आहे. पूर्वी मेरु पर्वताची शिखरे उडवून देण्याचा प्रयत्न वायूने केला पण आदिशेषाने आपल्या सहस्त्र फण्यांचे छत्र पर्वतावर धरले. त्यामुळे वायू पराजित झाला. पण आदिशेषाने फण्यांचे छत्र बाजूला करताच वायू पुन्हा वेगाने वाहू लागला.

त्यावेळी उडालेल्या मेरुचा तुकडा म्हणजेच व्यंकटेशाचा सप्तगिरी डोंगर होय. आदिशेषाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन विष्णूने इथे कायमचे वास्तव्य करण्याचे मान्य केले. डोंगरावरील पठारावर हे मंदिर विराजमान आहे. हे मंदिर म्हणजे विभिन्न कालखंडातील द्राविड वास्तुशिल्पांचा मनोहारी संगम आहे. २.२ एकरात पसरलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे.

मंदिराभोवती तट असून तीन प्राकार आहेत. मुखद्वारातून आत गेल्यावर डाव्या हाताला रंगनायकुल मंडप दक्षिणोत्तर, पश्चिमोत्तर पसरला असून मंडपात श्रीरंगनाथाची मूर्ती असलेले मंदिर आहे. तिरुमलराय मंडपाच्या उत्तरेकडे ध्वजस्तंभ व बलिपीठ तसेच पितळेच्या काही सुंदर मूर्ती आहेत. तर आतील प्राकारच्या डाव्या कोपऱ्यात ‘कल्याणमंडप ‘ आहे.

व्यंकटेश्वर व पद्मावती यांच्या वार्षिक विवाहोत्सवासाठी हा मंडप वापरला जातो. श्री व्यंकटेशाचे गर्भगृह १२ बाय १२ फूट एवढे आहे. श्री व्यंकटेश्वराची मूर्ती उंच कमळाच्या अधिष्ठानावर उभी आहे. मस्तकावरील मुकुट आणि अधिष्ठानाचे कमळ वगळता मूर्तीची उंची सुमारे सात फूट आहे. या मूर्तीला पुनुगु तेल नित्य लावले जाते. देवाच्या चार हातांपैकी तीन हातात चक्र, शंख व कमळ असून एका हाताने पृथ्वीकडे निर्देश केला आहे.

मूर्तीच्या गळ्यात यज्ञोपवित असून चार माळाही आहेत. मूर्तीचा रंग श्यामल असून मूर्तीच्या मस्तकावर जटा आणि खांद्यावर नागबंध आहे. मस्तकावरील मुकुट २० इंच उंचीचा आहे. प्रत्येक शुक्रवारी श्री व्यंकटेश्वराला अभिषेक असतो. नंतर मूर्ती फुलांनी सुशोभित करतात. श्री सूक्ताचा पाठ होतो. त्यावेळच्या सेवेला भगवती आराधना’ म्हणतात.

देवाला त्या दिवसाचे पंचांग वाचून दाखवितात. आदल्यादिवशी देवापुढे उत्पन्नाचा हिशेब सादर केला जातो. अन्नाचा नैवेद्य दाखविताना घंटानाद होतो. त्यानंतर मध्यान्ह पूजा, उपराह्यपूजा, निशी पूजा या तिन्ही पूजा होतात. देवस्थानापासून चार मोठे ब्रह्मोत्सव साजरे होतात. तिरुमलै पर्वतावर प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने श्रीव्यंकटेश्वराच्या सन्मानार्थ हा उत्सव सुरु केला आहे.

असं म्हटलं जातं की, तिरुपती बालाजीला स्वत:च्या लग्नासाठी झालेले कर्ज कलियुगातील त्याचे भक्त देवाला पैसा अर्पण करुन फेडीत असतात. म्हणून येथील हुंडीत अगणित पैसे जमत असतात. भारतातील सर्व मंदिरात उत्पन्नाचे बाबतीत याचा पहिला क्रमांक लागतो. विशेष म्हणजे ज्या कल्याण मंडपात भगवंताचा विवाह साजरा झालायेथे विवाहाला मुहूर्ताची आवश्यकता नाही त्यामुळे वर्षभर विवाह साजरे होतात.

संसारातील त्रिविध तापांपासून सुटून सुखशांतीच्या मुक्कामाला पोचविणाऱ्या भगवान व्यंकटेशाला शरण जाण्यावाचून दुसरा मार्ग नाही. म्हणून त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्तगण येथे येत असतात. जाण्याचा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे मार्गे जाणाऱ्या मद्रास मेलने रेणीगंडा स्टेशनवर उतरुन देवस्थान ट्रान्सपोर्टच्या बसने जाता येते.

Exit mobile version