Site icon My Marathi Status

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक तीर्थ माहूरची रेणुकादेवी

विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवरील नांदेड जिल्ह्यात माहूर नावाचे गाव आहे. नैसर्गिक शोभेने संपन्न असा गड असून गाव डोंगराळ भागात समुद्रसपाटीपासून २५०० फूट उंचीवर अगदी आडवळणी आहे. पर्वताच्या कड्यावर रेणुकामातेचे मंदिर असून वर जाण्यास दोन हजार पायऱ्या आहेत. हे तीर्थ नांदेडपासून १२८ कि. मी. तर मुंबईपासून ७८९ कि. मी. वर आहे.

श्री रेणुकेची स्थाने भारतभर ठिकठिकाणी आहेत. त्यातील मूळ स्थान माहूर म्हणजेच ‘मातापूर’ होते. अपभ्रंशाने त्याचे नांव माहूर झाले. मातापूरची माता म्हणजे जमदग्नी भार्या रेणुका ही होय. या रेणुकेला एकवीरा असेही म्हणतात. हे स्थान शक्तिपीठांपैकी अनन्यसाधारण महत्त्वाचे मानले जाते. प्राचीन धर्मग्रंथातून रेणुकेचे चरित्र विस्ताराने वर्णिलेले आहे. आदिती हीच रेणुका.

नैसर्गिक शोभेने संपन्न अशा गडावर तिचे स्थान आहे. हे मस्तकचक्राचे स्थान असल्याने इथे रेणुकामातेचे मुख आहे. महाराष्ट्रातील अनेकांची कुलदैवत आहे. रेणुका प्रसेनजित राजाची कन्या. स्वयंवरसमयी तिने जमदग्नीला पती म्हणून वरले असा पुराणात उल्लेख आहे. तर महाभारतानुसार ती कमळातून उत्पन्न झाली म्हणून तिला कमली’ म्हटले आहे.

कालिकापुराणाप्रमाणे ती विदर्भ राजाची कन्या होय. स्कंदपुराणात एक कथा आहे. एकदा रेणुका गंगास्नान करीत होती. तेथे चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या प्रियोत्तमेबरोबर जलक्रीडा करु लागला. त्यामुळे तारुण्यवती रेणुकेचे मन विचलीत झाले. ते अंर्तज्ञानाने जमदग्नीने जाणले. रेणुका आश्रमांत येताच त्याने आपल्या पाचही पुत्रांना आईचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली.

चार मुलांनी ही आज्ञा अमान्य केली. मात्र परशुरामाने प्रत्यक्ष आईला मारले. परशुरामाच्या पित्याला जमदग्नीला संतोष झाला. नंतर परशुरामाने आईला जीवित करण्याचा वर मागितला. जिवंत झाल्यावर रेणुकेने देहशुद्धीसाठी अग्निसेवन केले. अग्नीच्या प्रखर ज्वालांनी तिच्या अंगावर फोड उठले. त्यामुळे दोष नाहिसा झाला. दुसरी कथा अशी आहे की, रेणुका व जमदग्नीच्या आश्रमात संपन्नता होती.

वैभव होते. सहस्त्रार्जुन एकदा आश्रमात आला. त्याला कामधेनूच्या कृपेने असलेले आश्रमांतील वैभव पाहावले नाही. त्याने कामधेनूचा अपहार केला. मात्र कामधेनूने स्वत:च स्वत:चे रक्षण केले. क्रोधीत राजाने जमदग्नीचा वध केला व रेणुकेला २१ ठिकाणी २१ वेळा जखमी केले. रेणुकेने परशुरामाकडून एकवीस वेळा समस्त पृथ्वी निःक्षत्रिय होईल असा शाप त्याला दिला.

परशुराम आपल्या पित्याचे शव व मातेला घेऊन तेथून निघाला व एखाद्या पवित्र स्थानाचा शोध घेऊ लागला. माहूर क्षेत्री येऊन पोहोचल्यावर आकाशवाणी झाली. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. रेणुका सती जाण्यास सज्ज झाली. तत्पूर्वी तिने परशुरामाला उपदेश करुन शेवटी तिने पिण्यास पाणी मागितले.

परशुराम पाणी घेऊन येईपर्यंत इकडे रेणुकेचा अर्धाअधिक देह जळून गेला होता. मस्तक तेवढे शिल्लक राहिले होते म्हणून माहूरगडावर केवळ देवीचे मस्तक आहे. रेणुकामातेच्या वास्तव्यामुळे माहूर मातृभूमी बनली. रेणुका ही इथल्या शक्तीपिठाची अधिष्ठात्री देवता. देवी जगदंबा हिच्या स्वरुपाशी ती एकजीव झालेली आहे. हिचे मंदिर गिरीशिखरावर आहे.

मुख्य मंदिरावर चौकोनी शिखर आहे. मंदिराचे वास्तुशिल्प प्राचीन पद्धतीचे आहे. गाभाऱ्यात रेणुकीची मूर्ती नसून तिचा तांदळा’ आहे. रेणुकादेवीचा हा ‘तांदळा’ पाच फूट उंच व चार फूट रुंद असा आहे. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवले आहे. तिच्या महाद्वाराजवळ महाकाली ही शेंदुरचर्चित देवी आहे.

तिला रेणुकेची धाकटी भगिनी मानतात. पूजेचा पहिला मान तिलाच देतात. देवीचे दर्शन झाल्यावर कुटलेला विडा प्रसाद म्हणून मिळतो. देवीलासुद्धा भक्त तांबूल समर्पण करतात. तिच्या बैठकीवर सिंह कोरलेला आहे. देवीचे ध्यान भव्य व उग्न दिसते. रेणुकेच्या शेजारी महालक्ष्मी व तुळजाभवानी यांची दोन लहानशी मंदिरे आहेत. दक्षिणेला परशुरामाचे मंदिर आहे. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही रेणुकेची उपासना होते.

Exit mobile version