तीर्थराज प्रयाग
प्रयाग येथे गंगा, यमुना व सरस्वती या तीन नद्यांचा संगम असून त्यातील गंगा, यमुना दृश्य आहेत. पण सरस्वती अदृश्य आहे. या तीन नद्यांच्या संगमाला त्रिवेणी संगम’ म्हणतात. या संगमामुळे याला तीर्थराज’ म्हटले आहे. प्रयाग हे उत्तरेकडील अत्यंत लोकप्रिय असे तीर्थक्षेत्र असून या प्रयागचे रुढ नांव ‘अलाहाबाद’ असेही आहे. हे स्थान वाराणसी पासून १३५ कि. मी. वर असून मुंबई वाराणसी हे अंतर १३६० कि. मी. आहे. ज्याप्रमाणे ग्रहात सूर्य, ताऱ्यांमध्ये चंद्रमा तसेच तीर्थांमध्ये प्रयागराज सर्वोत्तम आहे.
प्रयागात स्नान करणे तर स्वर्गप्रद आहेच. म्हणून भाविक स्नान करतांना गंगेच्या जसा नामोच्चार करतात, तसाच प्रयागराज, वेणीमाधव’ असाही नामोच्चार करतात. पद्म पुराणात म्हटले आहे की, प्रयागात स्नान केल्याने इच्छापूर्ती होते. महर्षी मार्कंडेय व युधिष्ठिर संवादात प्रयागची महती वर्णिली आहे. त्यात म्हटले आहे की, प्रयागात साठ कोटी दहा सहस्त्र तीर्थ आहेत. प्रयागात देह टाकला तर स्वर्गप्राप्ती मिळते.
येथील तपाने उत्तम लोक प्राप्त होतात. गोदान विशेष पुण्यकर आहे. प्रयागच्या उत्तरेकडील मानसतीर्थ निवास पुण्यदायी असून प्रयागमधील तर्पण पूर्वजांना उत्तम गती देते. महाप्रलय होऊन सर्व जग बुडाले, तरी प्रयाग बुडणार नाही व प्रलयांती श्रीविष्णू इथे वटपत्रावर शयन करतील, असे क्षेत्र माहात्मात सांगितले आहे. प्राचीन काळी येथे ऋषिमुनींनी अनेक यज्ञयाग केले, म्हणून ही पवित्रभूमी यज्ञभूमी म्हणून प्रख्यात झाली.
तेव्हापासून या भूमीला तीर्थराज प्रयाग म्हणून संबोधू लागले. का येथील कुंभमेळ्याची कथा सांगतांना म्हटले आहे की, देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून अनेक वस्तू, रत्ने व अमृत बाहेर आले. दानवांना ते मिळू नये म्हणून इंद्रपुत्र जयंत ते घेऊन जात असता देव-दानवात मोठी लढाई झाली. या लढाईत तो कुंभ चार ठिकाणी पडला. त्यातील अमृताचे कण-थेंब हरिद्वार, नाशिक, उज्जैन व प्रयाग येथे पडले म्हणून दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो.
त्यासमयी त्रिवेणी संगमात स्नान केले तर महत्पुण्य मिळते. ऋग्वेदात संगम स्नानाविषयी लिहिले आहे. त्रिवेणी संगमात बुड्या मारुन जे स्नान करतात, त्यांना स्वर्गप्राप्ती होते. प्रभू रामचंद्रांनी वनवासाला जात असताना या ठिकाणी गंगापार होऊन भरद्वाजाच्या आश्रमात आले होते असे रामायणात सांगितले असून गोत्रवधाच्या पापामुळे खिन्न झालेल्या युधिष्ठिराला मार्कंडेय मुनीने प्रयाग क्षेत्राची यात्रा करण्यास सांगितले.
सम्राट हर्ष हा त्यागी सम्राट होता. तो दरवेळी कुंभमेळ्यात येत असे आणि धर्मचर्चा घडवून आणी. ब्राह्मण, गोरगरीब, याचक, भिक्षू, श्रमण यांना दान करी. येथेच श्री शंकराचार्य यांनी कुमारिलभट्ट या महामीमांसका बरोबर वैदिक धर्माच्या रक्षणासंबंधी चर्चा केली होती. वैदिक संस्कृती आणि वैदिकेतर जन समुदायाची यात्रा संस्कृती यांचाही येथेच संगम झाला. येथील नद्यांच्या संगमाला त्रिवेणी म्हटलं आहे. कारण गंगा-यमुना-सरस्वती या तीन नद्यांचे प्रवाह येथे वेणीसारखे एकमेकांत मिसळले आहेत. हिंदुस्थानात १४ प्रयाग क्षेत्रे आहेत. त्यातील १३ प्रयागक्षेत्रे उत्तरांचल राज्यात आहेत.