विदर्भ नावाच्या नगरात ‘वेदमित्र’ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. वेदमित्राला ‘सुमेधा’ नावाचा मुलगा होता. ‘सारस्वत’ नावाचा ब्राह्मण वेदमित्राचा जिवलग मित्र होता. त्याच्या मुलाचे नाव होते ‘सोमवंत’. ‘सुमेधा’ आणि ‘सोमवंत’ हेही एकमेकांचे जिवलग मित्र होते. ते दोघे वयात आले तेव्हा त्या दोघांचे वडील त्यांना म्हणाले, “मुलांनो, तुम्ही सर्व विद्यात पारंगत झाला आहात.
तुम्ही आता तुमची विद्या राजापुढे दाखवा व त्याच्याकडून धन मिळवा. मग तुमची दोघांची आम्ही लग्ने करून देऊ.” त्या दोघांनी विदर्भ राजाकडे जाऊन आपली विद्या दाखवली. राजाच्या मनात आले की या दोघांची आता थोडी विचित्र परीक्षा घ्यावी. तो त्यांना म्हणाला, “मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. नैषधपुरीचा राजा ‘चित्रांगद’ याची पत्नी शिवभक्त आहे.
शिव-पार्वतीची ती उपासना करते. म्हणून ती शिव-पार्वती समजून जोडप्याचा सन्मान करते. तुमच्यापैकी एकाने स्त्री व्हावे आणि जोडपे म्हणून तिच्याकडे जावे. ती तुम्हांला जे धन देईल ते तुम्ही मला आणून दाखवा. म्हणजेच तुम्ही सर्व विद्या पारंगत आहात हे मी मानेन व तुम्हांला भरपूर द्रव्य देईन.” ते दोघे म्हणाले, “हे राजा, पुरुषाने स्त्रीवेष धारण करू नये. त्यामुळे वेष घेणारा व त्याचा स्त्रीवेष बघणारा दोघेही पुरुष अधःपात पावतात. म्हणून हे अनुचित कर्म न करता आम्ही दोघे धन मिळवू.”
स्त्रीवेष धारण न करता चांगल्या मार्गाने धन मिळविण्याचे त्यांनी ठरवले तेव्हा राजा म्हणाला, “तुमची विद्या मला कळलीच आहे. पण तुम्ही वेषांतर किती चांगले करता हे मला बघायचं आहे. म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेष धारण करावा.” राजाच्या आग्रहामुळे ते दोघे कबूल झाले. दोघांपैकी एकाला राजाने स्त्रीवेष दिला व त्यांना सोमवारी संध्याकाळी नैषध देशात पाठवले. सीमंतिनीने ते जोडपे पाहिले तेव्हा तिने ओळखले की या दोघात कोणीही स्त्री नाही.
हे दोघे पुरुषच आहेत. पण तिने तसे न दाखवता हे दोघे शिवपार्वती समजून त्यांची पूजा केली. त्यांना भोजन दिले व वस्त्रभूषणे देऊन त्यांना पाठवले. ते नैषध देशातून निघाले. राजाची अट आपण पूर्ण केली या आनंदात ते दोघे होते. ते अरण्यातून जाऊ लागले. तेव्हा स्त्रीवेषधारी तरुणाला जाणवले की आपल्यात बदल होतो आहे. आपण स्त्री होत चाललो आहोत.
ती आता कामविव्हल स्त्री झाली होती. ती दुसऱ्याला पती समजून त्याने तिची कामपूर्ती करावी असे ती त्या तरुणाला सांगत होती. तेव्हा त्याचा मित्र म्हणाला, “अरे तू शरीरसंगाची कसली इच्छा धरतो. ते नाटक राजापुरते व सीमंतिनीपुरते होते. आपण दोघे ब्रह्मचारी पुरुष आहोत.” तेव्हा दुसऱ्या मित्राने त्याला आडमार्गाने नेऊन आपण शरीराने खरोखरच स्त्री असल्याचे वस्त्रे दूर करून दाखवले व ती स्त्री त्याच्या अंगाशी येऊ लागली. त्या तरुणाला कळले की आपल्या मित्राचे स्त्रीमध्ये रूपांतर झाले आहे. तरी त्याने आपल्या मनात विकार येऊन दिला नाही.
अशा प्रकारे निर्जन एकांतात वश होऊन परस्त्री कामयाचना करत असताही त्याचे मन शुद्ध राहिले. असा पुरुष खरोखरच शंकरासमान होय. वेदमित्राचा मुलगा खरा साधू होता. त्याने स्त्री झालेल्या सारस्वतपुत्राला समजावले. ते दोघे घरी आले व त्याने सर्व झालेला सर्व प्रकार ‘सारस्वत ब्राह्मणाला सांगितला. तेव्हा ‘सारस्वत’ ब्राह्मण रडत रडत राजाकडे गेला व “माझ्या एकुलत्या एका पुत्राचा तू घात केलास.
तुझा निर्वंश होईल.” अशी शापवाणी उच्चारली. राजाने मान खाली घातली. खोटी स्त्री होती ती खरी कशी झाली? याचे कोडे राजाला पडले. राजाने राज्यातील ब्राह्मणांना बोलावले व प्रखर अनुष्ठान करून ‘सारस्वत ब्राह्मणाच्या मुलाला पुन्हा पुरुषत्व आणून देण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, “महाराज, हे काम आमच्याने होणार नाही.” म्हणून मग राजाने मोठा यज्ञ करायचे ठरवले.
हा यज्ञ सात दिवस चालला. या सातही दिवसांत राजाने अन्न वर्ज केले. तेव्हा यज्ञदेवता प्रसन्न झाली व म्हणाली, “राजा वर माग.” राजा म्हणाला, “सोमवंत हा स्त्री झाला आहे. त्याला पुन्हा पुरुष कर.” देवी म्हणाली, “ते माझ्या हातात नाही. सीमंतिनी ही महातपस्वी आहे. तिच्यापुढे मीसुद्धा कोणी नाही. पण राजा माझे ऐक. ती स्त्रीच राहू दे. ‘सुमेधा’शी तिचे लग्न कर. त्या दोघांना एक दैवी गुण असलेला मुलगा होईल.”
राजाने देवी पार्वतीची आज्ञा प्रमाण मानली. त्याने ‘सुमेधा व सोमवंती’ यांचे लग्न लावले. नंतर त्या जोडप्याला मुलगा झाला. सीमंतिनीने ज्या दोन पुरुषांना शिवपार्वती समजून त्यांची पूजा केली, त्या जोडप्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. धन्य ती सीमंतिनी, तिचा संकल्प आणि तिची शिवपार्वती भक्ती!