Site icon My Marathi Status

जेथे मातेचे श्राद्ध केले जाते सिद्धपूर (मातृगया)

पाटण हा गुजरात राज्याच्या उत्तर भागात हा जिल्हा असून पाटणपासून २८ कि.मी. वर असलेल्या गावाला सिद्धेश्वर म्हणतात. हे एकच क्षेत्र असे आहे की जेथे मातेचे श्राद्ध केले जाते. त्याशिवाय अनेक तीर्थे आहेत. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-दिल्ली मार्गावरील मेहसाणा व आबूरोड ह्या दरम्यान मेहसाणाहून २१ मैलावर हे स्टेशन असून स्टेशनपासून एक मैलावर सरस्वती नदीच्या काठी हे स्थान वसले आहे.

स्टेशनचे नांव सिद्धपूर असून ह्या स्थानास मातृगया म्हणतात. एक आख्ययिका अशी आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र कर्दमऋषि यांचा विवाह मनूकन्या देवहुती हिच्याबरोबर झाला. देवहुतीच्या पोटी विष्णूंनी कपील महामुनी या नावाने अवतार घेतला. मातेस ब्रह्मज्ञान शिकवून कपील निघून गेले. देवहुतीने ब्रह्मनिर्वाण ज्या स्थळी प्राप्त करुन घेतले, तेच हे आजचे सिद्धपूर उर्फ मातृगया. दुसरी कथा अशी.

पित्याच्या आज्ञेने परशुरामाने मातेचा वध केला. पित्याकडूनच वरदान मागून मातेला पुन्हा जिवंत केले. पण त्याला मातृहत्त्येचे पाप लागलेच. या पापातून परशुरामाने अस्था व बिंदू सरोवरात स्नान केले.

तसेच मातृतर्पणही केले. तेव्हापासून हे क्षेत्र आईचे श्राद्ध करण्यासाठी उपयुक्त मानतात. इथे एकदा श्राद्ध केल्यावर पुन्हा दरवर्षी श्राद्ध करावे लागत नाही. युद्धप्रसंगी दुःशासनाचे रक्त भीमाच्या तोंडाला लागले होते. म्हणून श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार भीमाने या क्षेत्री येऊन सरस्वतीत स्नान केले आणि पापमुक्त झाला.

सर्व नद्या समुद्राला मिळतात. पण सरस्वती नदी समुद्रात मिसळत नाही. ती कच्छच्या मरुभूमीत लुप्त होऊन जाते. म्हणून तिला कुमारिका’ म्हटले आहे. या सरस्वतीच्या किनारी पिंपळवृक्ष असून तेथे ब्रह्मांडेश्वर शिवमंदिर आहे. भाविक सरस्वती नदीत स्नान करुन येथे मातृश्राद्ध करतात.

Exit mobile version