श्री गणेश ही अशी एक देवता आहे की, भारतातल्या सर्व भागात तिची उपासना केली जाते. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी गणेशाचे स्तवन केले असता कार्यात कोणतेही विघ्न येत नाही अशी श्रद्धा आहे. श्रीगणेशाची अनेक स्थाने भारताच्या सर्व भागात, तसेच भारताच्या बाहेरही दिसून येतात. या स्थानांतील काही स्थाने विशेष प्रभावी समजली जातात. गणेशाची आठ पीठेशक्तिकेंद्रे आहेत व ही आठही शक्तीकेंद्रे महाराष्ट्रात आहेत. त्याला आपण अष्टविनायक स्थाने म्हणतो.
या अष्टविनायकांच्या गणनेत श्री मोरेश्वराला अग्रस्थान दिले आहे. मोरगांव हे क्षेत्र पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात कन्हा नदीच्या काठावर आहे. हे स्थान पुण्यापासून ६४. कि. मी. दूर असून जेजुरी पासून १७ कि. मी. तर मुंबईपासून २२५ कि. मी. वर आहे. मोरगांव या क्षेत्राचा आकार मोरासारखा असून येथे विपुल प्रमाणात मोर आढळतात. आणि येथील गणपती मोरावर आरुढ झाला आहे. म्हणून या परिसराला, क्षेत्राला मोरगांव’ अशीही या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. या क्षेत्राचे माहात्म्य गणेशकोशात पुढीलप्रमाणे आहे.
पाच देवता, ब्रह्मा, विष्णू, शिव, शक्ती, सूर्य यांनी येथे तप केले. तपसमाप्तीनंतर श्री गणेशाने त्यांना दर्शन दिले. पाच देवतांच्या प्रार्थनेला मान देऊन श्री गणेशाने मोरगाव क्षेत्री कायम निवास करण्याचे मान्य केले. मग या देवतांनी या गणेशाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी केली. येथे राहन जे पुरश्चणादी करतील, त्यांना विघ्नांची भीती वाटणार नाही असा आशीर्वादही दिला. मोरगावच्या गणेशाला मयूरेश्वर किंवा मोरेश्वर असे नांव का मिळाले यासंबंधी मदगल पुराणात एक कथा सांगितली आहे ती अशी.
फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने पुत्र झाला. त्याचे नांव सिंधू ठेवले. पुढे सिंधूनेही सूर्याची उपासना करुन अमरत्त्व मिळविले. अमरत्व मिळताच अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे ही इर्षा निर्माण होताच, त्याने पृथ्वी जिंकली, इंद्राचा पराभव केला. तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरु केले. सिंधूने आपल्या पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला गंडकी नगरीत बंदिवासात टाकले. त्यामुळे देव अधिकच संकटात सापडले.
तशी त्यांनी गणेशाची आराधना सुरु केली. गणेश प्रसन्न झाले व भयभीत देवांना आश्वासन दिले की, मी लवकरच पार्वतीच्या पोटी मयूरेश्वर या नावाने अवतार घेऊन तुमची सिंधूच्या त्रासातून सुटका करीन. सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वती मेरु पर्वतावर राहात होते. पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश-पुजन करीत असताना, पुजनातील गणेशमूर्ती सजीव झाली. ती बालकाचे रुप घेऊन पार्वतीला म्हणाली, ‘आई, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे.’ पुढे गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले.
गणेश एका प्रचंड मोरावर बसून कमलासुराचा वध करुन त्याने त्याच्या शरीराचे तीन तुकडे करुन तीन दिशांना फेकले. कमलासुराच्या मस्तकाचा भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजेच मोरगांव क्षेत्र. मग गणेशाने सिंधू राजाचा पराभव करुन सर्व देवांची मुक्तता केली. मोरावर बसून गणेशाने दैत्य संहार केला त्याला मयूरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात. मोरगावात येताच प्रथम दगडी तट दिसतो. त्याच्या चार कोपऱ्यात चारमिनारासारखे स्तंभ आहेत. यात उंच भागी मोरेश्वराचे भव्य मंदिर आहे. हे मंदिर चिरेबंदी असून उत्तराभिमुख आहे.
मंदिराच्या पायऱ्या चढल्यावर नगारखाना दिसतो. त्याच्या खाली गणपतीकडे तोंड करुन आपल्या पुढच्या दोन पायांत लाडू घेऊन उभा असलेला मोठा दगडी उंदीर आहे. त्याच्यापुढे १५ फूट उंचीच्या चौथऱ्यावर नंदी आहे. त्याचे तोंड गणपतीच्या दिशेला आहे. गणपती पुढे नंदी कसा काय ? या शंकेचे निरसन करणारी एक आख्यायिका पण आहे.
महाद्वारापुढे दोन व आतील प्रांगणात दोन अशा चार दीपमाळा असून मध्ये एक जयस्तंभही आहे. चौथऱ्यावर मुख्य सभामंडप असून त्याच्या पूर्वेला देवाचे शेजघर आहे. पूर्वेला नग्नभैरवाचे देऊळ व पश्चिमेला एक जुने तरटीचे झाड आहे. या वृक्षाखाली बसूनच मोरया गोसाव्याने तपश्चर्या करुन सिद्धी प्राप्त करुन घेतली. आजही भक्तगण या झाडाखाली बसून साधना करतात. तेथे अनुष्ठान केल्यास इष्ट फलप्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे.
तटाच्या आतल्या चौकात आठ कोपऱ्यात गणेशाच्या आठ प्रतिमा आहेत. मंदिरातील मयूरेश्वराची मूर्ती स्थूल स्वरुपात आहे. तिच्या नेत्रस्थानी, भालप्रदेशी व नाभीमध्ये लखलखीत हिरे बसविले आहेत. गणेशाची मूर्ती उकिडव्या अवस्थेत बसलेली असून सोंड डावीकडे वळली आहे. मूर्ती संपूर्ण सिंदुरचर्चित आहे. येथे दिवसातून तीन वेळा महापूजा होते. तिन्ही वेळा वेगवेगळे नैवेद्य दाखविले जातात. सकाळी खिचडी, पोळी, दुपारी पूर्ण जेवण व रात्री दूधभात अशी नैवेद्याची व्यवस्था आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला व माघ शुद्ध चतुर्थीला (गणेशजयंती) असे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. विजया दशमीचा उत्सवही मोठ्या प्रमाणात होतो. हा गणेश नवसास पावतो अशी श्रद्धा आहे.