ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

महाराष्ट्राची संत परंपरा फार मोठी आहे. ज्ञानेश्वरांदिकांपासून येथे अनेक संत-महात्म्ये होऊन गेले व त्यांनी सत्य, नीती, शांती, दया, समता, भ्रातृभाव ह्या दैवी गुणांचा प्रचार करुन लोकांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. अशा या थोर संतांच्या परंपरेत बसणारे श्री गोंदवलेकर महाराज हे अगदी अलीकडच्या काळात श्रीक्षेत्र गोंदवले येथे होऊन गेले. अशा गोंदवलेकर महाराज यांचा जन्म गोंदवले येथे झाला. त्यांचे पूर्ण नांव श्रीगणपती रावजी गोंदवले.

लहानपणापासून त्यांना देवधर्माची आवड होती. त्यामुळे नामाची अतिशय गोडी लागली. याच वयात त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करुन घेण्याचे ध्येय बाळगले होते. त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावयाची त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी बरीच भ्रमंती करुन गुरुंचा शोध घेतला. त्यांना फार कष्ट पडले आणि बेळगावचे थोर ब्रह्मज्ञानी श्री तुकाराम चैतन्य या सद्गुरुंची भेट झाली.

त्यांनी मार्ग दाखवला. त्या मार्गाने जाऊन महाराजांना वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त झाली. पुढे गुरुअनुग्रहासाठी हिंडत असताना श्री रामदासस्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण ह्यांनी महाराजांना दर्शन दिले. त्यांनी महाराजांना नांदेडजवळील मेहेळगांवी श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे जाण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार श्रीमहाराज तुकामाईकडे गेले. त्यांनी तेथे नऊ महिने राहून गुरुसेवा केली व पूर्णज्ञानी झाले. श्री तुकामाईंनी त्यांचे नांव ब्रह्मचैतन्य ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहन लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.

प्रपंच सांभाळून भगवंताशी अनुसंधान ठेवण्यासाठी भगवंताचे नाम हे सर्वोत्कृष्ट साधन आहे. यासाठी नामाच्या नादी लागावे म्हणून महाराजांनी अथक प्रयत्न केले. महाराजांनी असंख्य प्रापंचिकांना खऱ्या समाधानाचा, आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. महाराज सर्वाना सांगत असत. मी तुमच्याजवळ आहे असं मी म्हणतो त्यावेळी ‘मी’ ही व्यहीन परमात्मस्वरुप तुमच्याजवळ आहे, असा त्याचा अर्थ असतो.’

‘एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत. जेथे नाम आहे तेथे मी आहे. तुम्ही तुमच्यापाशी नाही इतका मी तुमच्याजवळ आहे. मला हाक मारा की मी पुढे आहेच. तुम्ही सतत नाम घेत राहा म्हणजे तुम्हाला सोडून मला राहाताच येणार नाही. मी निर्लेप नामामध्ये राहातो. तुम्ही निर्लेप निर्विकल्प नाम घ्या. माझ्या सहवासाची प्रचिती आल्यावाचून राहाणार नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलीकडे मला कसलीच अपेक्षा नाही. नाम घेणे म्हणजे माझ्या हातात आपला हात देणे होय.’ असे उद्गार त्यांनी शिष्यांसमोर काढले.

महाराजांनी अनेकांना भक्तीमार्गाला लावले. त्यांचे कार्यच असामान्य होते. महाराज प्रत्यक्ष रामावताराने पृथ्वीतलावर अवतरले होते. श्री महाराजांनी व्यसनाधीनांना व्यसनमुक्त केले. विषयासक्त व्यक्तींना ते मोठ्या प्रेमाने धडा शिकवीत. रामनामाच्या सामर्थ्यावर मृत मुलगा जिवंत असल्याचे दाखवून दिले. स्वत:च्या कर्तृत्वाने त्यांनी बोटीतील जीव वाचवले. भूत-पिशाच्याने पछाडलेल्यांची पीडा दूर केली. कित्येक विवाह जमविले, अनाथ मुलींना उत्तम स्थळे पाहून दिली. कर्मकांड, होमहवन, यज्ञ, याग यांच्या विरोधात न जाता रामनामाचेमहत्त्वसामान्यांपासून याज्ञिक वैदिकांनाही पटवून दिले.

आपल्या आवडीचे कोणतेही नाम घेणे योग्य असा उपदेश पण केला. रामनामाच्या सामर्थ्यावर तळागळातील सामान्यांना एकत्र आणले. श्री महाराजांनी कसाईच्या हाती जाणाऱ्या अनेक गाई सोडवल्या. श्री महाराज गोंदवले येथे स्थायिक झाले. त्यांनी मारुती मंदिरेही उभारली. त्यांनी १८९० नंतर थोरल्या राम मंदिराचा पाया घातला. महाराजांनी स्वतः लक्ष घातले, पैसा जमा झाला.

१८९१ मध्ये मंदिर बांधून तयार झाले. पण श्रीरामाच्या मूर्ती तयार नव्हत्या. मात्र तडवळे’ गावच्या कुलकर्णीने आपल्या स्वतःसाठी बनवलेल्या राममूर्ती दृष्टांताप्रमाणे गोंदवले येथील राममंदिरासाठी महाराजांकडे आणून दिल्या. १८९२ च्या रामनवमीस मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली.

निर्गुणाची उपासना कठीण असते म्हणून सगुण उपासनेसाठी त्यांनी श्रीराममूर्तीची स्थापना केली. त्यांची श्रीरामावर इतकी अनन्य भक्ती होती की, ज्यावेळी ते नैमिषारण्यात जाण्यास निघाले त्यावेळी मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर इ.स. १९१३ मध्ये समाधिस्त झाले. हे स्थान सातारापंढरपूर मार्गावर दहीवडीजवळ आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, पंढरपूर, सोलापूर इत्यादी ठिकाणांहून एस. टी. ची सेवा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: