Site icon My Marathi Status

भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे श्री स्वामी समर्थ

श्री अक्कलकोट स्वामी समर्थांना दत्तात्रेयाचा चौथा अवतार मानले आहे. श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष आहेत. श्रीपाद वल्लभ १४ व्या शतकात अवतारी पुरुष जन्माला आले. १४०८ ते १४५८ हा त्यांचा कालखंड आहे. १४५७ च्या सुमारास ते श्रीशैल्य, यात्रेच्यावेळी कर्दळीवनात होते. समाधी अवस्थेत ध्यानस्थ होते. तेव्हा अंगावर वारुळ तयार झाले.

एका लाकूडतोड्याने कुन्हाडीचा घाव घातल्यावर वारुळ ढासळले आणि त्यातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. ही आख्यायिका त्यांच्या पोथ्यातून सांगितली जाते. आपल्या प्रकटीकरणानंतर श्री स्वामी समर्थ मुंबईतील बाणगंगेवर २५ वर्षे वास्तव्य करुन विविध ठिकाणी जाऊन वटवृक्षातळी अक्कलकोट येथे आपल्या अवतार समाप्तीपर्यंत राहिले. त्यांची पत्रिका उपलब्ध आहे. त्यांचा गण देवगण होता.

ते यजुर्वेदी ब्राह्मण असून काश्यप गोत्र व आद्यनाडी होती. नृसिंहयान हे श्री स्वामी समर्थांचे जन्मगाव. चैतन्यस्वामी हे त्यांचे टोपणनांव होते. मेष राशी व स्वामी मंगल यावरुन स्वामी समर्थांची कुंडली मांडण्यात आली आहे. श्री स्वामी महाराजांचे शरीर अतिशय दिव्य असे होते. ते अजानबाहू होते. अंगकांती अतिशय तेजस्वी व गौरकाय होती. नाक अगदी सरळ तर कपाळ भव्य होते. अक्कलकोट हे प्रज्ञापूर आहे.

अक्कलकाढा या औषधी वनस्पतीपासून व अक्कलक, अक्कलकारा, आणि भुईकोट किल्ला व अक्कलावरुन अक्कलकोट हे नाव पडले असावे असे मत आहे. श्री स्वामी समर्थांनी मोहोळ सोडले आणि साधारणपणे १८५६-५७ मध्ये अक्कलकोटला आल्याची नोंद आहे. गावाच्या सीमेवर असलेल्या श्री खंडोबाच्या देवळात त्यांनी मुक्काम केला. कोणीतरी एक वेडा असावा अशा समजुतीने सर्व गावकऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

पण एक दिवस श्री स्वामी महाराज चिलीम ओढीत बसलेले मुसलमान मुलांनी पाहिले. आश्चर्य म्हणजे त्या चिलीममध्ये विस्तव, तंबाखू नसताना त्यातून धूर येत होता. हे पाहून मुसलमान तरुणांना आश्चर्य वाटले. त्यांनी स्वामींची चौकशी केली. त्यावर स्वामी महाराज त्या तरुणांना म्हणाले की, मी गेले ३-४ दिवस उपाशी आहे, माझी जेवणाची व्यवस्था करा.

हे ऐकताचक्षणी मुसलमान तरुण अक्कलकोट गावातील त्यांच्या ओळखीच्या एका ब्राह्मणाकडे म्हणजे चोळप्पाकडे गेले. सर्व हकीकत त्यांना सांगितली. तसे चोळप्पाने श्री स्वामी महाराजांची जेवणाची व्यवस्था आपल्या घरी केली व चोळप्पा श्री स्वामी महाराजांना घेऊन घरी आले. जेवावयास बसविले. महाराजांनी अगदी पोटभर जेवण केले व विश्रांती घेतली. पुढे श्री स्वामी महाराज त्या चोळप्पाकडेच राहिले.

स्वामींकडे सतत दीन-दुबळ्यांची, रंजल्या-गांजलेल्यांची, गरजूंची, रुग्णांची रीघ असायची. स्वामींनी कोणालाही कधी निराश केले नाही. रिक्त हस्त परत पाठविले नाही. त्याचवेळी ढोंगी माणसाचा बुरखाही फाडायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यांना भूतभविष्य-वर्तमान यांचे ज्ञान होते. मनकवडेपणा त्यांच्यापाशी होता आणि अशक्य वाटणाऱ्या घटना शक्य करुन दाखविण्याचं अलौकिक सामर्थ्यही त्यांच्यापाशी होते. त्यांच्या लीला अगणित आहेत.

स्वामी अनेकदा फटकळपणे बोलत. अनेकदा गतीप्रदानही करीत. त्यांचा राग विलक्षण होता. तरी स्वामी फणसासारखे होते. वरुन काटे आतून गोड गरे.. श्री अक्कलकोट वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे पहाटे साडेपाच वाजता काकड आरती होते. नंतर उपस्थितांना मठातील गाभाऱ्यातील पादुकांचे दर्शन होते. मध्यान्हापर्यंत पूजा, अभिषेक, लघुरुद आणि महारुद्र करता येतो. रात्री आठच्या सुमारास धुपारती व आरती होते.

श्री स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसत. तेथेच त्यांची अवतारसमाप्ती झाली. या वडाच्या झाडाखाली आणि मंदिर परिसरात श्रींच्या पादुका आहेत. जवळच अन्नछत्र असून मुरलीधर मंदिरात भक्तांची उतरण्याची सोय आहे. श्री गुरुमंदिर उर्फ बाळाप्पा महाराज मठ, जोशीबुवांचा मठ, वटवृक्ष स्वामी मंदिर मठ, राजे रायरामन् यांचा मठ, समाधीमठ हे अक्कलकोट मधील प्रसिद्ध मठ आहेत. सोलापूर पासून ३९ कि. मी. अंतरावर अक्कलकोट बसस्थानक आहे. हे स्थान मुंबईपासून ४५० कि. मी. वर आहे.

Exit mobile version