गोव्याचे हे सुप्रसिद्ध मंदिर असून अनेक कुटुंबांची शांतादुर्गा ही कुलदेवता आहे. तशीच गोवेकरांचीही प्राचीन कुलस्वामिनी मानली जाते. मंदिराच्या बाजूला हिरवेगार जंगल तर समोर हिरवीगार शेती पाहावयास मिळते. या शांतादुर्गाचे स्थान कवलेम (कवळे, क्युअला) या गावी असून हे गांव फोंडाच्या नैऋतेला ३ कि.मी. अंतरावर आहे.
शांतादुर्गा ही पार्वतीचा किंवा दुर्गेचा अवतार मानला जातो. या मंदिरातील पार्वतीदेवी येथे शांतादेवी म्हणूनही ओळखली जाते. गोव्याचे लोक या देवीला ‘सातेरी देवी’ असेही म्हणतात. या मंदिराचे मूळ स्थान मार्गागोवामधील क्विलोस्सीम येथे होते. १६ व्या शतकात पोर्तुगिजांच्या विध्वंसक आक्रमणापासून वाचवण्यासाठी हे मंदिर आजच्या स्थानी म्हणजेच कवलेम येथे हलविण्यात आले.
इ. स. १७३८ मध्ये मराठा राजा शाहू महाराज याने हे मंदिर बांधले. त्यावेळी पेशव्यांचे कारभारी रामचंद्रबाबा सुखटणकर यांनी मदत केली. पुराण कथेप्रमाणे शिव आणि विष्ण यांचे जेव्हा युद्ध सुरु झाले तेव्हा या देवीने ब्रह्मदेवाच्या इच्छेनुसार अवतार घेऊन दोघांना शांत केले. म्हणून तिला शांतादुर्गा’ म्हटले जाते. त्यामुळेच तिच्या आजूबाजूला शंकर व विष्णू यांच्या मूर्ती आहेत.
शांतादुर्गा मंदिरावर जो कळस उभारला आहे. त्याला गोव्यात ‘घूड’ म्हणतात. येथील सर्व देवस्थानांमधील सर्वात उंच घूड हा समजला जातो. हा घूड फक्त उंचच नसून देखणा देखील आहे. मंदिराचे छप्पर पॅगोडासारखे वाटते. पॅनल्सवरील सजावट, कारागिरी उच्च प्रतिची आहे. या मंदिराच्या बांधकामावर युरोपियन शैलीचाही प्रभाव दिसून येतो. हे मंदिर लालसर, तपकिरी, पिवळ्या रंगात रंगवले असून मंदिरासमोर सहा मजली भव्य अशी दीपमाळ आहे.
मंदिराच्या सभागृहाचे छत दिव्यांच्या झुंबरांनी सजवले आहे. गृहगृहाला चांदीचे प्रवेशद्वार असून दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी श्री शांतादुर्गेच्या दोन मूर्ती आहेत. सकाळी १२ वाजेपर्यंत उभ्या असलेल्या शांतादुर्गेचे भक्तांना दर्शन घडते. त्यानंतर मात्र ती मूर्ती मागे सरकवली जाते. नवरात्रामध्ये मात्र दोन्ही मूर्तीचे दर्शन भक्तांना होते. नवरात्रीत मात्र देवीला रोज नवीन पोषाख चढवला जातो.
मुख्य मंदिराभोवती इतर देवतांची स्थाने आहेत. दीपमाळेजवळ क्षेत्रपाळ तर वायव्य दिशेस देवचराचे स्थान आहे. उत्तरेस नारायण देव, ईशान्येस ग्रामपुरुष शिवशर्मा अशी स्थाने आहेत. या मंदिराची वार्षिक जत्रा फेब्रुवारी महिन्यात असते. या प्रसंगी निघणाऱ्या रथयात्रेत भक्तमंडळी रथ मंदिराच्या प्रांगणात ओढत नेतात. ही देवी कौशिक गोत्री सारस्वत ब्राह्मणांची कुलदेवता आहे.
बाजीराव पेशवे ह्यांनी कवळे (क्युअला) गाव या देवीला इनाम दिले. गोव्यात कुलदैवताच्यासमोर विवाह लावण्याची प्रथा आहे. अनेक नववधू व वर मंदिरामध्ये पाहावयास मिळतात. या देवीचे पूजन गोव्यात सर्वत्र केले जाते. येथे भाविकांसाठी निवास व्यवस्था केलेली आहे. येथील दर्शनाची वेळ ७ ते रात्री ९ अशी आहे. भक्तजन कौल, लावण्यासाठी येतात. गोव्याचे निसर्गसौंदर्य अद्वितीय आहे. सुंदर समुद्रकिनारे, हिरव्यागार बागा, उंच ताडमाड, मांडवीचे विशाल पात्र सगळेच विलोभनीय आहे. मंगेश, शांतादुर्गा यासारख्या देवतांच्या मंदिरांनी ही भूमी पावन केली आहे.