Site icon My Marathi Status

शिवरायांना छत्रसिंहासन का नसावे?

शेकडो वर्षे हिंदुस्थानातील जनतेवर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती करणाऱ्या धर्मपिसाट परकीय महासत्तांना शिवरायांनी शक्तीने व युक्तीने तोंड देऊन, त्यांच्या कचाट्यातून महाराष्ट्राला मुक्त केले. तीनशे-साडेतीनशे वर्षे सुलतानांनी महाराष्ट्राला तुच्छ गुलाम केले होते. सगळा समाज लाचार बनला होता. महाराष्ट्राध्या धर्मसंस्कृतीला, मराठ्यांच्या बायकामुलींना कसलीही किंमत उरली नव्हती. मुसलमानांच्या धाडी हिंदंच्या बायकामुलींना पळवून नेत होते. घरादारांची राखरांगोळी करीत होते. याला विरोध करणारा कोणीच नव्हता.

मराठ्यांचे सार्वभौम वैभवशाली स्वराज्य निर्माण होईल असे कुणाला कधीच वाटले नाही; परंतु शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचे सारे चित्रच बदलून टाकले. श्रीकृष्णाने साध्या भोळ्या गवळ्यांच्या मदतीने गोवर्धन पर्वत उचलून गोपजनांचे रक्षण केले व इंद्राची मस्ती उतरविली; त्याप्रमाणे शिवरायांनी बालपणापासून शेतकऱ्यांची, कुणब्यांची अंगठेबहादूर पोरेसोरे हाताशी धरून मोठा चमत्कार करून दाखविला.

औरंगजेबाचे सगळे विषारी डाव उधळून लावण्यात महाराज यशस्वी झाले. अथक प्रयत्न करून, रक्ताचे पाणी करून, नेत्रदीपक, रोमहर्षक पराक्रम करून स्वतंत्र राज्य, रयतेचे राज्य, स्वकीयांचे राज्य प्रस्थापित केले. आपल्या अतुल पराक्रमाने शिवरायांनी आदिलशाहीच्या व मोंगली सत्तेच्या विरोधाचे सामर्थ्य क:पदार्थ ठरविले. असे असले, तरी आमच्याच लोकांना, मराठी लोकांना अजूनदेखील शिवाजी भोसले हा आपला राजा आहे असे वाटत नव्हते. शिवाजी म्हणजे एक सरदाराचा पुत्र असेच वाटत होते. बादशहा व त्याच्या सरदारांना शिवाजी हा एक गुंड दरोडेखोर वाटत होता.

परकीयांचे सोडा, पण बादशहाच्या पदरी पिढ्यानपिढ्या चाकरी-नोकरी करणारे काही मराठे लोक शिवरायांचा मत्सर करीत होत आणि म्हणत, ‘कोण हा शिवाजी? याचे आजे, पणजे तर साधे कुणबी होते. आपल्याच अन्नदात्या बादशाहीविरुद्ध बंड करणारा, स्वामिद्रोही कृतघ्न माणूस! चारदोन किल्ले बळकाविले, गुंडांचे जमाव जमविले म्हणजे कोणी राजा होतो काय?’ शिवाजी महाराज सिंहासनाधिष्ठित राजे नसल्यामुळे स्वराज्यातल्या लोकांनाही हे राज्य ‘खरे राज्य’ वाटत नव्हते. स्वराज्याबद्दल खातरी वाटत नव्हती. शिवाजीराजा चांगला असला, धर्मपरायण, प्रजापालन दक्ष असला, तरी तो खरा राजा नाही.

तो अधिकृत राजा नाही असेच लोकांना वाटत होते. शिवरायांना याची वारंवार जाणीव होत होती. आपण रक्ताचे पाणी करून स्वराज्य निर्माण केले, तरीसुद्धा लोक आपल्याबद्दल साशंक आहेत. बाहेरचे लोक आपणास गुंडपुंड समजतात. याची जाणीव शिवरायांना वारंवार होत होती. याच वेळी औरंगजेबाच्या उत्तरेतील हैदोसामुळे त्रस्त झालेला भूषण नावाचा कवी रायगडावर आला. तेथेच त्याने ‘शिवभूषण’ नावाचा ग्रंथ लिहिला.

शिवरायांचे अद्भुत चरित्र ऐकून प्रभावित झालेला तो म्हणाला, “पातशाह बावनो दिली के पातशाह जिती, पातशाह हिंदुपति पातशाह सेवाने’ दिल्लीच्या बादशहाने बावन्न पातशाह्या जिंकल्या, पण त्या दिल्लीपतीला हिंदुपती शिवाजीने जिंकले. या शिवाजीने आपल्या तलवारीच्या बळावर आपल्या स्वराज्याच्या सरहद्दीचे, देवळातल्या देवांचे आणि आपल्या स्वधर्माचे रक्षण केले. सगळ्या देवदेवता लपून बसल्या. सगळीकडे पीर, फकीर यांचे अवडंबर माजले. काशीची कळा गेली. मथुरेची मशीद झाली, पण याही स्थितीत शिवाजी आहे. तो नसता, तर एव्हाना सर्वांची सुंता झाली असती. समर्थ रामदासस्वामींसारखे विरक्त महायोगी तत्त्वज्ञ महर्षीसुद्धा शिवरायांच्या अलौकिक चरित्राने भारावून गेले. त्यांनी शिवरायांना एक पत्र पाठविले त्यात ते म्हणतात,

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधरू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।
यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
लाला पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा ।।
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकला ठाई ||
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि आदिशक्ति । पुष्टीभागी ।।
गारा धीर उदार सुंदर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
या भूमंडळाचे ठाई । धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हाकारणे ॥
कित्येक दुष्ट संहारिला । कितेकांसी धाक सुटला ।
कितेकांसी आश्रयो जाला । शिवकल्याण राजा ।।

शिवरायांनी एवढे राज्य निर्माण केले, तरी त्यांना अद्याप राज्याभिषेक झाला नव्हता; त्यामुळे स्वकीय जनतेला व परकीय सत्ताधीशांना शिवाजी हा मराठ्यांचा सार्वभौम राजा आहे व स्वराज्य हे मराठ्यांचे सार्वभौम राज्य आहे असे वाटत नव्हते. याच वेळी काशीक्षेत्राचे प्रकांडपंडित गागाभट्ट जणू दसरे ब्रह्मदेवच यांच्या कानांवर शिवरायांच्या अद्भुत, रामहर्षक पराक्रम कथा आल्या. शिवरायांची कीर्ती ऐकन गागाभट आश्चर्यचकित झाले.

सगळा समाज हताश, उदास, निराश, भेकड, स्वाभिमानशून्य झाला असताना स्वतःच्या कर्तृत्वाने ज्याने नवीन युग निर्माण केले. चार प्रबळ सत्तांशी प्रखर संघर्ष करून जो सदैव विजयी झाला असा हा महापुरुष, राजपुरुष असामान्यच आहे हे लक्षात घेऊन गागाभट्ट स्वत: शिवरायांना भेटावयास रायगडावर आले. शिवरायांनी अत्यंत आदराने स्वागत करून त्यांची पाद्यपूजा केली. गागाभट्टांनी शिवरायांचे संपूर्ण अंत:करण जाणले. प्रभू रामचंद्रांनी आणि श्रीकृष्णाने ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता’ आणि धर्मसंस्थापनार्थाय’ अद्भुत कार्य केले, तेच कार्य हा पुरुषोत्तम करीत आहे.

असे असताना या राजपुरुषाला अद्याप छत्रसिंहासन नाही, याला राज्याभिषेक झालेला नाही ही मोठी उणीव आहे. छत्रसिंहासनाशिवाय राज्याला पूर्णत्व येत नाही. शिवरायांना छत्रसिंहासन का नाही? शिवाजीला राज्याभिषेक झाल्याशिवाय त्याचे युगप्रवर्तक कार्य व त्याचे महत्त्व जगाला समजणार नाही. प्रजाजनांची मान्यता मिळणार नाही असा विचार करून गागाभट्ट शिवरायांना म्हणाले, “राजा, तुला राज्याभिषेक झालाच पाहिजे. तुला छत्रसिंहासन हवेच. तू सिंहासनारुढ हो.” ‘राजा, तुला राज्याभिषेक झालाच पाहिजे.’ साक्षात वेदोनारायण गागाभट्ट बोलले आणि महाराजानांही हे पटले.

महाराजांना राज्याभिषेक होणार ही बातमी ऐकून रायगड आनंदाने नाचू लागला. ही आनंदवार्ता रायगडावरून गडागडांवर गेली. महाराष्ट्रभूमी आनंदाने मोहरून गेली. माझ्या शिवबाला राज्याभिषेक होणार या कल्पनेने जिजामातांना किती आनंद झाला असेल याची कल्पनाच केलेली बरी. यादवांचा गरुडध्वज कोसळल्यानंतर साडेतीनशे वर्षे या भूमीत हिंदू राजाला राज्याभिषेक झाला नव्हता. शिवरायांना राज्याभिषेक होणार, त्यांना छत्रसिंहासन प्राप्त होणार; यामुळे सगळ्या सगळ्यांना फार फार आनंद झाला. शिवरायांना राज्याभिषेक म्हणजे जिजामातांच्या आयुष्यभरातील खडतर व्रताचे उद्यापनच होते.

रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. राजधानीचे स्थळ ठरले, किल्ले रायगड! गागाभट्टांनी सर्व पंडितांच्या व महाराजांच्या विचाराने राज्याभिषेकासाठी मुहूर्त निश्चित केला. शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शनिवार (६ जून १६७४) उष:काली राजश्री शिवाजी महाराज सिंहासनावर बसणार! शिवरायांना छत्रसिंहासन मिळणार!

Exit mobile version