एकदा समर्थ रामदास महाबळेश्वरात असताना शिवाजी महाराज त्यांच्या दर्शनासाठी येत असल्याचे त्यांना समजले. समर्थांनी शिवरायांच्या गुरुनिष्ठेची परीक्षा पाहण्याचे ठरविले. ते एकाएकी उठले व रानात निघून गेले. शिवाजी महाराज इतर घोडेस्वारांसह महाबळेश्वरास आले, पण समर्थ कुठेतरी रानात निघून गेल्याचे त्यांना समजले. महाराज निराश झाले, पण समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नपाणी घ्यावयाचे नाही असा निश्चय करून ते समर्थांना शोधण्यासाठी रानात गेले. शोधता शोधता मध्यरात्र झाली. काळोखी रात्र. गडद अंधार.
महाराजांनी एका ओढ्यावर स्नान केले व मानसपूजा केली. भयाण रात्र. मशाल घेऊन महाराज समर्थांना शोधीत होते. त्या वेळी वाघाची एक डरकाळी महाराजांच्या कानांवर आली. त्या शांत वातावरणात… “आई गऽऽ देवा रे देवा! रामराया, सोडव रे मला या यातनांतून.” असे शब्द ऐकू आले. महाराज मशालीच्या प्रकाशात आवाजाच्या रोखाने जाऊ लागले. एका ठिकाणी समर्थ जमिनीवर गडबडा लोळत आर्तस्वराने रामरायाचा धावा करीत होते.
महाराज धावत त्यांच्या जवळ गेले व त्यांच्या अंगावर हात फिरवीत त्यांनी विचारले, “गुरुमहाराज, आपल्याला काय होते आहे? आणि आपण एकटेच इकडे का आलात? तुम्हाला काय होते आहे ते कृपा करून लवकर सांगा.” समर्थ म्हणाले. “अरे शिवबा, काय सांगू तुला? माझ्या पोटात फार दुखते आहे. तुला वाटेल, मी काही औषध का नाही घेतले? पण या दुखण्याला कसलेही औषध नाही.
एक आहे, पण ते फार फार दुर्मीळ आहे. ते आणायलाच मी निघालो होतो, पण पोटात फार कळा येऊ लागल्याने येथे पडून राहिलो.” “गुरुमहाराज, मला ते औषध सांगा. ते कितीही दुर्मीळ असले तरीही मी ते आणतो.” “अरे शिवबा, तुला राज्याचा गाडा सांभाळायचा आहे. उगीच जीव कशासाठी धोक्यात घालतोस?” शिवाजी महाराजांनी पुन:पुन्हा विचारले असता समर्थ म्हणाले, “यावर एकच औषध आहे. ते म्हणजे वाघिणीचे दूध.
ते आणावयास तुला कसे सांगू? अरे, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे.” त्यावर शिवराय म्हणाले. “गुरुदेव, छपन्न शिवाजी निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असता एखादा हा शिवाजी गुरुसेवेसाठी गेला, तर काय बिघडले? मी वाघिणीचे दूध घेऊन येतो.”गोणी शिवाजी महाराज एक भांडे घेऊन निघाले. खरोखरच वाघीण भेटली तर आपले काय होईल? हा विचारच त्यांच्या मनाला शिवला नाही.
नामस्मरण करीत ते वाघीण शोधीत होते. शोधता शोधता एका गुहेच्या तोंडाशी त्यांना वाघिणीची दोन पिल्ले दिसली. महाराज त्या पिल्लांजवळ गेले. ही पिल्ले गुहेच्या तोंडाशी आली आहेत त्याअर्थी यांची आई जवळच कोठेतरी असावी. असा विचार महाराज करीत होते. तोच वाघिणीची डरकाळी कानावर आली. ती वाघीण जवळ आली. आपल्या पिल्लांजवळ कोणीतरी आले आहे असे पाहून त्या वाघिणीने महाराजांवर एकदम झडप घातली व त्यांची मान पकडली.
आपली मान कशीबशी सोडवून घेऊन महाराजांनी तिला प्रार्थना केली. “माझ्या गुरुमाउलींचे पोट दखत आहे. त्यावर औषध म्हणून तुझे दुध मला हवे आहे. मी तुझ्या पिल्लांना जराही त्रास देणार नाही. मला तुझे दूध दे.” महाराजांची प्रार्थना त्या वाघिणीला समजली की, काय कोण जाणे, पण रागावलेली ती वाघीण एकदम शांत झाली. महाराजांनी वाघिणीचे दूध काढले व ‘जयजय रघुवीर समर्थ!’ अशी गर्जना करून व त्या वाघिणीची पाठ प्रेमाने थोपटून महाराज समर्थांकडे जाण्यास निघाले.
काही अंतर गेले तोच ज्या गुहेच्या तोंडाशी बसून त्यांनी वाघिणीचे दूध काढले तेथून ‘जय जय रघुवीर समर्थ!’ अशी गर्जना त्यांना ऐकू आली. आवाज समर्थांचाच होता, पण ते आता येथे कसे? शिवरायांनी मागे वळून पाहिले. तो प्रत्यक्ष समर्थच उभे असलेले दिसले. पराज अवाक झाले. ते मागे फिरून समर्थांजवळ गेले. दुधाचे भांडे समर्थांना देऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला.. “शिवबा, तू माझ्यासाठी खूप दमला आहेस.”
असे म्हणून समर्थांनी महाराजांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरविला. त्याच वेळी तेथे एक प्रशस्त मंडप निर्माण झाला. त्या मंडपात सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. सर्व जण स्नान करून भोजनाला बसले. ते वाघिणीचे दूध पिताना समर्थ महाराजांना म्हणाले, कि “शिवबा, हे दूध वाघिणीचे नाही. ते जिजाऊमातेचे आहे.” असे म्हणून समर्थांनी ते दुधाचे भांडे तोंडाला लावले. ” या प्रसंगाने गुरुशिष्यांच्या नात्याबरोबर ज्येष्ठ-कनिष्ठ बंधूंचेही नाते जोडले गेले. धन्य ते समर्थ! धन्य ते शिवराय!