शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले!
शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्याशिवाय त्यांचे युगप्रवर्तक कार्य व त्यांचे महत्त्व जगाला समजणार नाही. प्रजाजनांची मान्यता मिळणार नाही असा विचार करून काशीचे पंडित गागाभट्ट शिवरायांना म्हणाले, ‘राजा, तुला राज्याभिषेक झालाच पाहिजे. तू तख्तावर बसावेस.’ शिवरायांनाही हे पटले. शिवरायांना राज्याभिषेक होणार ही सुवार्ता ऐकताच रायगडासह अवघी महाराष्ट्रभूमी आनंदाने नाचू लागली. साडेतीनशे वर्षांनंतर या भूमीत शिवरायांना राज्याभिषेक होणार; म्हणून सगळ्या सगळ्यांना आनंद झाला. खूप खूप आनंद झाला आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली.
या नव्या राज्याची राजधानी ठरली दुर्भेद्य, दुर्गम असा रायगड. हिरोजी इंदुलकर स्वराज्याची राजधानी घडवू लागले. रायगडाच्या विस्तीर्ण पठारावर राजधानीला आवश्यक सर्व सोयी, दारुगोळ्यांची व धान्यांची कोठारे, तलाव, सुमारे तीनशे इमारती, राजवंशाच्या निवासासाठी सर्व सोयींनी युक्त राजवाडे व सिंहासनाधीशाला शोभेसा दरबार, महाल आणि जगदीश्वराचे भव्य देवालय बांधून स्वतंत्र राज्याच्या राजधानीचे वैभव निर्माण केले. गंगासागराच्या दक्षिण काठावर सुंदर मनोरे बांधले. या मनोऱ्यांत मध्यभागी पाण्याचे कारंजे तयार करण्यात आले.
राजसभेच्या प्रवेशद्वारावर भव्य नगारखाना तयार झाला. नगारखान्याच्या व महाद्वाराच्या वर दोन्ही बाजूस सिंहाची शिल्पे बसविण्यात आली. हे सिंह आपल्या पंजाखाली हत्तींना मारीत असल्याचे दाखविले होते. शिवरायांना राज्याभिषेक व्हावयाचा म्हणजे काय साधीसुधी गोष्ट? युगायुगांनी असा सोनियाचा दिवस उगवणार होता. राज्याभिषेकासाठी पाहुणे आणि प्रजाजन यांची गडावर गर्दी जमू लागली. शिवबाचा राज्याभिषेक पाहण्यासाठी आईसाहेब पाचाडाहून रायगडावर आल्या. शिवरायांच्या कुटुंबातील सर्व मंडळी गडावर होती.
राज्याभिषेकाचा मुहूर्त निश्चित झाला होता. शालिवाहन शक १५९६. आनंदनाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शनिवार दि. ६ जून १६७४ ची भली पहाट. गागाभट्टांनी शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी राज्याभिषेकप्रयोग’ नावाचा ग्रंथ तयार केला. सप्तसरितांचे व सागरांचे जलकुंभ आणले. रत्नशाळेचे अधिकारी रामाजी दत्तो यांनी शिवरायांसाठी ३२ मण सोन्याचे सिंहासन तयार केले. शाहीर, भाट-चारण, कीर्तनकार, गोंधळी, पाहुणेरावळे, पुरोहित, भटभिक्षुक, सरदार, दरकदार यांची गर्दी रायगडावर वाढू लागली. राज्याभिषेक समारंभाचे वातावरण रायगडावर समारे महिनाभर गजबजले होते.
धार्मिक विधींना आता लवकरच आरंभ होणार होता, पण या अगोदर महाराज प्रतापगडावर गेले. कशासाठी? सिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी भवानीदेवीची पूजाअर्चा करण्यासाठी! पहाराजांनी देवीची यथासांग पूजा करून तिला सव्वामण वजनाचे सोन्याचे रत्नजडित छत्र अर्पण केले. तो दिवस होता १९ मे १६७४. शिवरायांनी हात जोडून भवानी देवीला प्रार्थना केली, “जगन्माते, तू जातीने येऊन हे कार्य सिद्धीला ने. आठ हातांनी तडीस ने.” २९ मे रोजी महाराजांची पूर्वी राहून गेलेली मुंज झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० मे रोजी महाराजांचा सोयराबाईशी समंत्रक विवाह झाला व त्यानंतर सकवारबाई व पुतळाबाई यांच्याशी विवाह झाले.
ज्येष्ठ शुद्ध एकादशीला ४ जून रोजी महाराजांची सुवर्णतुला व इतर अनेक प्रकारच्या तुला झाल्या. ह्या तुला करण्यासाठी १७ हजार होन लागले. महाराजांनी सर्व धनाचा दानधर्म केला. ५ जून रोजी इंद्रिय शांतीचा विधी पार पडल्यावर मुख्य राज्याभिषेकाच्या विधींना सुरुवात झाली. गणेशपूजन, नांदीश्राद्ध इत्यादी झाल्यानंतर राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले. मंडपपूजन झाले. सप्तसरितांच्या जलकुंभाची यथाविधी पूजा झाली. औदुंबर वृक्षाची आसंदी स्थापन केली. महावेदीवर अग्नीची आणि ग्रहांची प्रतिष्ठापना झाली. सर्व प्रथम होम झाला.
वेदांच्या सर्व शाखांच्या ब्राह्मणांनी वेदमंत्रांचा घोष केला. पूर्णाहुतीनंतर शिवरायांना अभिषेकशालेत नेण्यात आले. त्यांच्या शरीराला सुगंधी तेले, चूर्णे लावून उष्णोदकांनी त्यांना समंत्रक स्नान घालण्यात आले. मग वेदमंत्रांच्या घोषात शिवरायांनी औदुंबराच्या आसंदीवर विधिपूर्वक आरोहण केले. सर्व आचार्य आणि पुरोहित यांनी मंत्रघोषात अभिषेकाला सुरुवात केली. अभिषेकानंतर महाराज आसंदीखाली उतरले. अग्निनारायणाची प्रार्थना करून त्यांनी आशीर्वाद घेतले. राज्याभिषेकासाठी सर्व पवित्र उदके आतुर झाली होती.
गागाभट्टांच्या आज्ञेप्रमाणे महाराज, महाराणी सोयराबाई व राजपुत्र संभाजीराजे सोन्याच्या चौरंगावर बसले. अष्टदिशांना अष्टप्रधान कलश घेऊन उभे राहिले. पूर्व दिशेस घतपर्ण कलश भरतप्रधान मोरोपंत पिंगळे उभे होते. अग्नेयेस अनाजीपंत पंतसचिव छत्र घेऊन उभे राहिले. रशियोस हंबीरराव मोहिते दधाने भरलेला रौप्य कलश घेऊन, नैर्ऋत्येस त्र्यंबकपंत समंत पंखा और पशिम दिशेस रामचंद्रपंत अमात्य दह्याने भरलेला कलश घेऊन, वायव्येस दत्ताजीपंत मंत्री लियेऊन उत्तरेस रघुनाथपंत पंडितराव मधाने भरलेला सुवर्णकलश घेऊन आणि ईशान्येस गाजीपंत न्यायाधीश हे दसरे मोर्चेल घेऊन उभे होते. याशिवाय बाळाजी आवजी चिटणीसही तेथे उभे होते. गागाभट्टांच्या सूचनेनुसार सर्वांनी कुंभातील पवित्रजलाने महाराज, महाराणी व युवराज यांना अभिषेक केला.
सतत तीस वर्षे अथक धडपड करून हिंदवी स्वराज्याचे सिंहासन स्थापन करणाऱ्या शिवरायांना आज राज्याभिषेक होत होता. सप्तसरितांनी शिवरायांच्या मस्तकावर अभिषेक धारा धरल्या होत्या. निजामकाजाक कान गिर और मंगलवाद्ये निनादू लागली… सुवासिनींनी सर्वांना ओवाळले.. ६ जूनची पहाट झाली… मुहूर्त जवळ आला… शिवरायांनी राजसभेतील सुवर्ण सिंहासनावर आरोहण करण्याचा क्षण जवळ आला… हजारो लोक डोळ्यात प्राण आणून त्या क्षणाची वाट पाहत होते… राजसभेत मुंगी शिरावयास जागा नव्हती…
राजसभेच्या प्रवेशद्वारावर भगवा ध्वज डौलाने फडकत होता… प्रवेशद्वाराशी शृंगारलेले दोन हत्ती झुलत होते…तालिया निजी शिवाजीराजे सुवर्ण सिंहासनाजवळ आले… ते सिंहासन महाराजांची आतुरतेने वाट पाहत होते… शिवरायांनी आपला उजवा गुडघा भूमीवर टेकवून सिंहासनाला वंदन केले… त्या वेळी नगारे, चौघडे, शिंगे, कर्णे इत्यादी वाद्ये सुसज्ज झाली… सर्वांचे डोळे महाराजांवर खिळले… हिंदवी स्वराज्याचा तो सुवर्णक्षण, सौभाग्यक्षण उगवला… शिवरायांनी गागाभट्ट, बाळभट्ट इत्यादी विद्वानांना, जिजाऊमातांना नमस्कार केला… जिजाऊमातांच्या कठोर व्रताची आज सांगता होत होती.
शिवरायांनी राजसभेत प्रवेश करताच सारी सभा आदराने उभी राहिली… शिवरायांनी पूर्वेकडे तोंड करून सिंहासनास पदस्पर्श न करता त्यावर आरोहण केले आणि एकच महाकल्लोळ उडाला… वाद्यांचा धडाका सुरू झाला… गडागडावर तोफा दणाणू लागल्या… सारे स्वराज्य अत्यानंदाने धुंद झाले… राजसभा देहभान विसरली. सोळा सुवासिनी व सोळा कुमारिका यांनी पुढे येऊन महाराजांना कुंकुमतिलक लावून ओवाळले… आणि गागाभट्टांनी उच्च स्वरात घोषणा केली, “महाराज शिवाजीराजे आज छत्रपती झाले.”
क्षत्रियकुलावतंस महाराज, सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती यांचा त्रिवार जयजयकार झाला… भाट चारण गाऊ लागले…शाहिरांचे डफ कडाडू लागले… गोंधळ्यांच्या संबळी तडाडू लागल्या… अष्टप्रधानांनी शिवरायांच्या मस्तकावर मोहरा उधळून त्यांना नजराणे दिले… महाराजांनी सर्वांना भरभरून दिले… महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली… महाराज शिवाजीराजे आज छत्रपती झाले.
अवघ्या जगाला कळले. शिवनेरीवर जन्मास आलेला शिवाचा अंश आज रायगडावर छत्रपती झाला. आता स्वराज्य हे शिवराज्य आणि स्वराज्याचं राजकारण हे शिवकारण! दरितांचे तिमिर संपले. चारी पातशाह्यांना शह देऊन सह्याद्रीच्या कुशीत एक नवी शाही, शिवशाही निर्माण झाली. या महाराष्ट्रदेशी शतकाशतकांनंतर एक स्वकीय राजा छत्रपती झाला. ‘क्षत्रियकुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक’ हे बिरुद अभिमानाने मिरवू लागला.
या वेळी समर्थ रामदास सह्याद्रीच्या पठारावर उभे राहून रायगडावरील आनंद सोहळा मनोनमी निरखीत होते. त्यांच्या अंगावर पूर्णानंदाचे रोमांच उभे राहिले. तीर्थाटनाच्या वेळी एका पहाटे पाहिलेलं अलौकिक स्वप्न साकार झालं. प्रभू रामचंद्र दैत्यांचा नाश करून शिवरूपाने सिंहासनाधिष्ठित झाले. समर्थ आनंदाने बेहोश झाले व हात उंच करून गर्जू लागले –
स्वप्नी जे देखिले रात्री । ते ते तैसेचि होतसे ।
मालामाल बुडाला औरंग्या पापी । म्लेंछ संहार जाहला ।
मोडिली मांडिली क्षेत्रे । आनंदवन भुवनी ।
बुडाले भेदवाही ते । नष्ट चांडाळ पातकी ।
ताडिले पाडिले देवे । आनंदवनभुवनी ।
गळाले पळाले मेले । जाले देशोधडी पुढे ।
निर्मळ जाहली पृथ्वी । आनंदवनभुवनी।
उदंड जाहले पाणी । स्नानसंध्या करावया ।
जपतप अनुष्ठाने । आनंदवनभुवनी ।
या प्रसंगी शिवाजी महाराजांनी सगळ्यांना जे हवे ते भरभरून दिले. सर्वांना संतुष्ट केले. गागाभट्टांना एक लक्ष रुपये दक्षिणा व बहमोल वस्त्रभूषणे दिली. त्याच प्रमाणे गोसावी, तापसी, गोरगरीब यांनाही योग्यतेनुरूप जे हवे ते दिले. या समारंभाचा सगळा खर्च पन्नास लाखांपेक्षाही अधिक झाला. स्वभाषेचा प्रचार व्हावा; म्हणून रघुनाथ पंडितांकडून ‘राज्यव्यवहारकोश’ नावाचा कोश मुद्दाम करवून घेतला.
कृष्णज्योतिष्याकडून ‘करणकौस्तुभ’ लिहून घेतला. या अलौकिक महत्त्वाच्या सोहाळ्याचे स्मरण युगानुयुगे राहावे; म्हणून राज्याभिषेक शक’ सुरू केले. या शकाला त्यांनी स्वतःचे नाव दिले नाही. ‘प्रतिपच्चंद्रलेखेव’ ही संस्कृत राजमुद्रा निश्चित केली. पाच सहा शतके पारतंत्र्यात रगडून निघालेले हिंदराष्ट्र स्वतंत्र झाले. महाराष्ट्रात पुन्हा एकदा अयोध्या अवतरली. न्यायाचे, सद्धर्माचे, सुसंस्कृतीचे छत्रसिंहासन पुन्हा प्रकटले.