शिव चंद्राचा अस्त
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी रघुनाथपंत हणमंते यांच्या सूचनेवरून कर्नाटकाच्या स्वारीचा बेत केला. प्रथम त्यांनी गोवळकोंड्याच्या सुलतानाकडून खंडणी वसूल केली आणि मद्रास पर्यंतचा कर्नाटक प्रांत जिंकला. आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांच्यावर तंजावरचे राज्य सोपवून शिवाजी महाराज रायगडावर परत आले. कर्नाटकातील ही मोहीम यशस्वी झाली, पण महाराजांना दगदग फार झाली. त्यांची प्रकृती बिघडली. वैद्यांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. तशाही स्थितीत त्यांनी प्रतापराव गुजरांच्या मुलीशी राजारामचे लग्न लावले. खूप दान धर्म केला.
शिवरायांचे आयुष्य पन्नास वर्षांचे झाले होते. खरोखर, त्यांनी शन्यातून विश्व निर्माण केले होते. निष्कंटक हिंदवी स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्राला स्वतंत्र, सार्वभौम राजसिंहासन प्राप्त झाले. हाताशी काहीही नसताना स्वकीय आणि परकीयांशी दोन हात करून शिवरायांनी स्वराज्य उभे केले. स्वभाषेचे रक्षण केले. लोकांमध्ये महाराष्ट्रधर्माची जागृती केली. मराठी माणूस नुसतीच तलवार चालवीत नाही, तर तो राज्य स्थापन करू शकतो व ते उत्तम प्रकारे चालवून दाखवू शकतो हे जगाला दाखवून दिले.
इथल्या साध्या भोळ्या, लंगोटधारी शेतकऱ्यांच्या मनात आपण नुसते नांगरच चालवतो असे नाही, तर आपण तलवारही जोरात चालवू शकतो याचा विश्वास निर्माण केला. चाळीस वर्षे हिंदवी स्वराज्यासाठी हाडांची काडे केलेल्या, भगीरथ परिश्रम केलेल्या शिवरायांच्या देहाला कधी क्षणभर विश्रांती मिळाली नाही. त्या प्रमाणे त्यांच्या मनालाही कधी स्वास्थ्य लाभले नाही. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, पण ते निर्माण करीत असताना घरातील भाऊबंदकी मिटव शकले नाहीत. तशी त्यांना सवडही मिळाली नाही.
राजाराम लहान, संभाजी तापट, सोयराबाईंचा स्वभाव खटपटी, मोरोपंत पिंगळे व अण्णाजी दत्तो या दोघांत द्वेष. अशा परिस्थितीत स्वराज्याचे काय होणार? हे स्वराज्य टिकेल का? की, मोंगलांप्रमाणे आपल्या मागे स्वराज्याच्या सिंहासनासाठी मारामारी सुरू होईल? ज्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी अशांसारख्या शेकडो, हजारो वीरांनी आत्मबलिदान केले, तरण्याताठ्या मुलींनी वैधव्य पत्करले, ते सगळे व्यर्थ जाणार का? या विचारांने महाराज फार फार कष्टी झाले. महाराजांचे मन काळजीने पोखरू लागले.
महाराजांना ताप येऊ लागला. आयुष्याची मर्यादा झाली असे वाटू लागले. नेत्र पैलतीरी लागले. मग महाराजांनी रामचंद्र अमात्य, सूर्याजी मालुसरे, बाबाजी घाटगे इत्यादी मातबरांना बोलावून घेतले. महाराज त्यांना म्हणाले, “आम्हांला मृत्यूचे भय वाटत नाही; चिंता वाटते. आमच्या पाठीमागे स्वराज्याची कितीही वादळे उठली, तरी एकीने व विचाराने स्वराज्याचे रक्षण करा. पुढची व्यवस्था लावण्यासाठी वेळ आमच्या नशिबात नाही.”
महाराजांचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून सर्वांचे कंठ दाटून, फार दुःख झाले. त्या वेळी महाराज सर्वांना म्हणाले, “तुम्ही चुकार होऊ नका. जगणांगण जाताना हा मृत्युलोकच आहे. या मागे किती उत्पन्न झाले. तितके गेले. आता तुम्ही निर्मळ, सुखरूप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आम्ही श्रींचे स्मरण करतो.” मग सर्व जण बाहेर जाऊन बसले. महाराजांनी खुणेने काहीतरी सांगितले.
राजारामाने महाराजांच्या मुखात गंगाजल व तुळशीपत्र घातले. एवढे होताच महाराजांनी डोळे मिटले… ते पुन्हा कधीच उघडले नाहीत. तो दिवस होता ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती. त्या दिवशी दोन प्रहरी रायगडावर ‘शिवचंद्राचा’ अस्त झाला. राजारामाने यथासांग सर्व अंत्यसंस्कार केले. शिवरायांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबास समजली तेव्हा तो म्हणाला, “हा एक असा माणूस होता की, राज्य निर्माण करण्याची क्षमता त्याच्यात होती.
माझे सेनानी १९ वर्षे याच्याशी झुंजत होते, पण याचे राज्य वाढतच गेले. शरण आलेल्या शत्रूच्या स्त्रियांशी याने कधीही गैरवर्तन केले नाही.” शिवरायांच्या महानिर्वाणाची बातमी समर्थांना समजली. दःखाचा नि:श्वास सोडून ते म्हणाले,
“निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ।
यशवंत कीर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत जयवंत । जाणता राजा ।
कित्येक दृष्ट संहारिले । कित्येकास धाक सुटले ।
कित्येकांस आश्रय झाले । शिवकल्याण राजा ।।”