शहाजीराजांना कैद
शिवाजी महाराजांनी तोरणा व राजगड ताब्यात घेतला. कोंढाणाही कबजात घेतला. हे समजताच आदिलशाह भयंकर भडकला. शहाजीराजाचा हा मुलगा एवढे धाडस कसे काय करू शकतो? याचे आदिलशाहला मोठे आश्चर्य वाटले. शिवरायांनी कोंढाणा ताब्यात येताच त्याचा पुरा बंदोबस्त केला व न थांबता एकदम शिरवळच्या ठाण्यावर झडप घातली. एका झपाट्यात सुभानमंगल गडही घेतला. बादशहाला हे समजताच त्याच्या अंगाचा अगदी तिळपापड झाला. तो मोठ्या काळजीत पडला.
एखाद्या सरदाराला मोठ्या फौजेसह शिवाजीवर पाठवावे व शिवाजीचा बंदोबस्त करावा का? असा तो विचार करीत होता, पण त्याला भीती वाटत होती शहाजीराजांची. शिवाजीवर फौज पाठविली आहे हे जर कर्नाटकातील शहाजीला समजले, तर तो बंड करून उठेल आणि हे मोठे महागात पडेल. त्याच्या हाताखाली पंधरा हजार फौज आहे आणि त्याला मानणारे दक्षिणेत काफर राजे बरेच आहेत; म्हणून शिवाजीचे बंड मोडण्यापूर्वी शहाजीचा काहीतरी विचार करावयास हवा. आदिलशाहकडे बरेच सल्लागार सरदार होते. बाजी घोरपडे हा त्यातलाच एक.
हा घोरपडे म्हणजे उठताबसता बादशहाची धुंकी झेलण्यात स्वत:ला धन्य समजत होता. आपल्याच धर्मसंस्कृतीचा जराही अभिमान नसलेला व हिंदवी स्वराज्याच्या, म्हणजे आपल्याच लोकांच्या नरडीला नख लावण्यात धन्यता मानणारा होता. बाजी घोरपडे बादशहाला म्हणाला, ‘शहाजी सध्या कर्नाटकात असून जिंजीचा किल्ला घेण्यासाठी युद्ध करीत आहे. त्याचा मुक्काम युद्धभूमीजवळच त्याच्या छावणीत आहे. रात्रीच्या वेळी तो झोपेत असताना त्याच्या छावणीवर अचानक झडप घालायची व त्याला पकडून तुरुंगात डांबायचे.
असे केले की, शिवाजी दाती तृण धरून बादशहांना शरण येईल. त्याला दुसरा मार्गच उरणार नाही.” बाजी घोरपड्याचा हा सल्ला आदिलशाहला एकदम पसंत पडला. मग लगेच मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान, बाजी घोरपडे, बहलोलखान, मंबाजी भोसले, बाळाजी हैबतखान इ. सरदार प्रचंड फौज घेऊन जिंजीकडे निघाले. सगळा डाव अत्यंत गुप्तपणे रचलेला होता. इकडे शिवाजी महाराज राजगडाची बांधणी अत्यंत नेटाने करीत होते. त्यांना तो गड नुसता देखणा करावयाचा नव्हता, तर तो झुंजताही करावयाचा होता. नव्या राजधानीच्या आणि स्वराज्याच्या बांधणीत राजे व त्यांचे राजमंडळ रंगून गेले होते.
आपल्यावर एक भयंकर संकट कोसळणार आहे याची पुसटशीही कल्पना कर्नाटकात शहाजीराजांना आणि मावळात शिवाजी महाराजांनाही नव्हती. मुस्तफाखान जिंजीच्या जवळ आल्याचे समजताच शहाजीराजे त्याला सामोरे गेले. तो केवळ शिष्टाचार होता. त्यात प्रेम, आदर यातले काहीच नव्हते. खानानेही खोटेखोटे हसत शहाजीराजांची भेट घेतली. तो शहाजींना म्हणाला, “राजे, जिंजीचा किल्ला तुम्ही अत्यंत जिद्दीने जिंकण्याचा प्रयत्न करीत आहात याची कल्पना आम्हालाच काय पण बादशहांनाही आहे. यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आलो आहोत.”
शहाजी राजांनाही ते खरे वाटले असावे. खानाने आपल्या छावणीचा मुक्काम शहाजीराजांच्या जवळच ठेवला होता. २५ जुलै १६४८ ची रात्र! मुस्तफाखानाने आपल्या सर्व सहकाऱ्यांना एकांतात गोळा करून गुप्त मसलत केली. शहाजी गाढ झोपला की, एकदम छापा घालून त्याला पकडायचे. हीच ती गुप्त मसलत. शहाजीराजे बराच वेळ जागे होते. इतक्यात त्यांचा एक हेर गुपचूप तंबूत आला व शहाजींना म्हणाला, “सरकार, मुस्तफाखानाने आपल्या सरदारांशी गुप्त मसलत केली आहे. आपणास छापा घालून पकडण्याचा त्यांचा पक्का बेत आहे.” ….पण शहाजीराजांचा हेराच्या बोलण्यावर मुळीच विश्वास बसला नाही.
ते शांत, निश्चिंतपणे गाढ झोपले. शहाजीराजे गाढ झोपले होते. त्यांचे सैनिकही झोपलेले होते …आणि अचानक शत्रूचे सैनिक तलवारी परजत शहाजीराजांच्या छावणी जवळ आले. त्यांनी छावणीला वेढा घातला… आरडाओरडा सुरू झाला… शहाजीराजांचे सैनिक जागे झाले. शत्रूच्या सैनिकांनी वेढा घातलेला पाहून ते क्षणभर गोंधळून गेले, पण काय प्रकार आहे हे लक्षात येताच ते शस्त्रे घेऊन शत्रूवर तुटून पडले. मोठी धुमश्चक्री सुरू झाली… बाजी घोरपडे, खंडोजी, अंबाजी व मानाजी हे घोरपड्याचे भाऊ एकदम छावणीत घुसले… गडबड गोंधळ ऐकून शहाजीराजे जागे झाले.
ते ढाल-तलवार घेऊन शत्रूवर तुटून पडले. बाजी घोरपडे शहाजींच्या रोखाने धावत निघाला… खंडोजी पाटलाला हे दिसताच तो भाला घेऊन घोरपड्याच्या रोखाने धावत गेला… शत्रूच्या सैनिकांनी त्याला गराडा घातला… त्या सर्वांशी खंडोजी पाटील एकटाच लढत होता… त्याच वेळी बाजी घोरपड्याने एक धारदार हत्यार खंडोजी पाटलावर फेकले… घाव वर्मी लागला. खंडोजी पाटील घोड्यावरून जमिनीवर फासळला… आणि ठार झाला. बाजी घोरपड्याला हवे होते शहाजीराजे. काय दुर्दैव पाहा! हा घोरपडे म्हणजे प्रत्यक्ष भोसल्यांचा भाईबंद! एकाच वंशाचा, एकाच रक्ताचा.
तोच स्वकीयांचा शत्रू झाला होता. शहाजीराजांच्या मदतीला त्यांचे खासे खासे सैनिक धावून आले. तुंबळ युद्ध सुरू झाले… दोन्हीकडील अनेक सैनिक ठार झाले… जोरात कापाकापी सुरू होती… बघता बघता उजाडले… शहाजीराजे दमले होते… थकले होते… त्यांच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या… लढतां लढतां त्यांना चक्कर आली… ते घोड्यावरून खाली कोसळले व बेशुद्ध झाले. शहाजीराजे बेशुद्ध पडलेले दिसताच बाजी घोरपडे याने धावत जाऊन त्यांना कैद केले. यि राजांना तंबूत नेण्यात आले. त्यांच्या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या. बाजी घोरपड्याने त्यांच्या हातात व पायात बेड्या ठोकल्या.
केवढी ही मर्दुमकी! शहाजीराजे शुद्धीवर आले तेव्हा त्यांना कळले की, आपण कैद झालो आहोत. कोंढाणा आणि सुभानमंगल गड स्वराज्यात आल्यामुळे राजगडावर आनंदाला उधाण आले होते. आता पुढच्या योजना कोणत्या आखायच्या, कोणते नवीन किल्ले जिंकायचे, बादशाही किल्लेकोटातून गुप्त बातम्या कशा मिळवायच्या याबद्दल सर्व जण खल करीत होते. नवीन मोहिमा, नवीन साहसे, नवीन पराक्रम करण्यासाठी व शिवाजी महाराजांच्या मनातील मनसुबे ऐकण्यासाठी सर्व जण अगदी आतुर झाले होते आणि याच वेळी गडावर एक भयंकर दुःखद बातमी आली. सर्वांच्या उत्साहावर, आनंदावर पाणी पडले.
शहाजीराजांचा एक सैनिक धावत गडावर आला व म्हणाला, “बाजी घोरपडे व मुस्तफाखान यांनी महाराज शहाजींच्या छावणीवर रात्रीच्या वेळी छाप। घातला व महाराजांना कपटाने कैद केले.” ही बातमी ऐकताच सर्व जण अगदी सुन्न झाले. ‘वज्राघात झाला होता. जिजामातांच्या कुंकवालाच आदिलशाहने हात लावला होता. स्वराज्यावर, शिवाजी महाराजांवर हे मोठेच संकट आले होते. …आणि त्याच वेळी आणखी एक बातमी आली की, आदिलशाहचा वजीर मुस्तफाखान हा बंगळूरच्या किल्ल्यात असलेल्या संभाजीराजांना म्हणजे महाराजांच्या मोठ्या बंधूंना ताब्यात घेण्यासाठी मोठी फौज घेऊन निघाला आहे आणि खुद्द शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी फत्तेखान निघण्याच्या तयारीत आहे.
आता या संकटातून बाहेर कसे पडायचे? शहाजीराजांची सुटका कशी करायची? याची सर्वांना काळजी लागून राहिली होती. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, “संकटे तर मोठीच आहेत, पण धीर खचू देता कामा नये, कारण हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी एक उपाय म्हणजे स्वराज्यावर पाणी सोडणे आणि आदिलशाहला आयुष्यभर सलाम करीत राहणे. दुसरा उपाय म्हणजे मोगल सत्ताधीशांना काहीतरी आमिष दाखवून त्यांच्या करवी आदिलशाहावर दडपण आणणे; पण त्यासाठी आपली ताकद दाखवून देण्यासाठी फत्तेखानाचाच पराभव करणे.” महाराजांचा हा राजकारणी डावपेच ऐकून सर्व जण आश्चर्यचकित झाले. सर्वांना ते मान्य झाले.