नाशिकपासून ४५ कि. मी. उत्तरेकडे वणी येथे कळवण तालुक्यांत चांदवड डोंगराच्या रांगेत सप्तशृंग गड असून समुद्रसपाटीपासून ४६५९ फूट उंचीवर आहे. भारतातील ५२ शक्तीपीठांपैकी सप्तशृंग हे एक प्रमुख व प्राचीन पीठ होय. सप्तशृंगदेवीला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचे ॐ रुप समजतात. शुभं-निशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप साधनेसाठी देवीने गडावर वास्तव्य केले.
लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमंताने द्रोणागिरी आणला. त्याचे सात तुकडे खाली पडून सप्तशृंगीचा डोंगर तयार झाला असे म्हणतात. दिंडोरी तालुक्यातील वणी नामक एका गावी पोचल्यावर तिथून सप्तशृंगगडाच्या चढणीला आरंभ होतो. हे स्थान स्वयंभू मानले जाते. यासंबंधी एक दंतकथा प्रसिद्ध आहे ती अशी. फार पूर्वी हा परिसर जंगलांनी वेढला होता. एक धनगर आपली गुरे चारण्यासाठी डोंगरावर नेत असे.
मात्र एके दिवशी त्याला एका खडकावर मधमाश्यांचे मोठे असे पोळे दिसले. तो अत्यानंदित झाला. आणि त्याने पोळ्यात काठी खुपसली तेव्हा काठीच्या टोकाला शेंदूर लागलेला दिसला. मधाचे पोळे काढून झाल्यावर त्याला देवीचे रुप दृष्टीस पडले म्हणून या ठिकाणाला स्वयंभू असे म्हणतात. दुसरी कथा अशी सांगितली जाते की, गडावर गाई राखताना एका गुराख्याला शेंदराचा कोंब दिसला म्हणून त्याठिकाणी खणले असता देवीची मूर्ती दिसली. सप्तशृंग गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. पहिला वणीमार्ग, दुसरा पिंपरीमार्ग, व तिसरा सोपा मार्ग नांदुरीमार्ग.
नांदुरीगाव गडाच्या पायथ्यालाच आहे. येथून मोटारगाडीने वर जाता येते. डोलीसुद्धा मिळू शकते. गडाच्या मध्यसपाटीवर सप्तशृंग हा लोकवस्तीचा गांव आहे. गडावर पाणी विपुल आहे. येथे पाण्याने भरलेली व काळ्या दगडाने बांधलेली लहानमोठी आठ कुंडे आहेत. गावापासून १०० मीटर अंतरावर सिद्धेश्वर महादेवाचे हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर आहे. येथील कुंडात यात्रेकरु स्नान करतात.
यात्रेकरु येथे विश्रांती घेतात. गडापासून देवीपर्यंत जाण्यास ४७२ पायऱ्यांचा दुसरा टप्पा चढून वर जावे लागते. पायऱ्यांवर रामाचे मंदिर असून त्यास रामाचा टप्पा असे म्हणतात. यानंतर कासव टप्पा लागतो. त्याच्या थोडेसे पुढे औदुंबराचे झाड आहे. तेथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. सर्व पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे मंदिर लागते. सप्तशृंग निवासिनी देवीच्या मंदिराचा गाभारा डोंगराच्या कपारीच्या गुहेत आहे.
देवीची मूर्ती डोंगराच्या दर्शनी भागावर कोरलेली वाटते. आठ फुटाच्या मूर्तीस दोन्ही बाजूस नऊ नऊ हात आहेत व प्रत्येकात वेगवेगळे आयुध धारण केलेले दिसते. मुकुट, चोळी व साडी हा मातेचा वस्त्रालंकार, मूर्ती पूर्णपणे रक्तरंगी, नेत्र शुभ्र जागृतीची जाणीव दर्शनाने व्हावी. देवीने डाव्या बाजूचा एक हात कानावर टेकलेला आहे. जणू देवी भक्तांची गा-हाणी ऐकत आहे.
देवीची मूर्ती पूर्वाभिमुख असून सकाळी ती बाला, दुपारी तरुणी आणि सूर्यास्तकाळी वृद्धारुप भासते. देवी अत्यंत भव्य व मनोहारी दिसते. देवीला प्रतिदिन वेदोक्त मंत्रपूर्वक अभिषेक केला जातो. कपाळावरील ठसठशीत कुंकू दरदिवशी निरनिराळ्या रंगाचे असते. रोज महानैवेद्य असतो. नंदादीप तेवत असतो. वाद्यांच्या गजरात देवीची त्रिकाल आरती होते.
गुहेच्या माथ्यावर एक दुर्गम सुळका असून, त्यावर निशाणी चढवणे हा देवीच्या यात्रेतील महत्त्वाचा धाडसी कार्यक्रम असतो. निशाण चढवण्याचा मान बुरी गावच्या वतनी घराण्यातील माणसाकडे असतो. पौर्णिमेच्या रात्री सुळक्यावर चढून निशाण फडकवले जाते. चैत्री व आश्विनी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. नवरात्रोत्सव साजरा होतो.
नवनाथ भक्तीसार ग्रंथात श्रीशिव व श्रीदत्त प्रभूच्या आज्ञेने मत्स्येंद्रनाथांनी सप्तशृंग गडावर दुर्धर तपाचरण करुन श्री जगदंबेला प्रसन्न करुन घेतले व शाबरी कपित्व सिद्धी मिळविली. समर्थ रामदास स्वामी गडावर दर्शनास येत असत. त्यांची अश्विन शुद्ध पक्षी’ ही आरती प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराज, मराठा सरदार व पेशवे गडावर येऊन गेल्याचा उल्लेख आहे.