Site icon My Marathi Status

संत श्रीपुरंदरदास बद्दल माहिती मराठीत – Sant Purandar Das Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला संत श्रीपुरंदरदास बद्दल माहिती मराठीत – Sant Purandar Das Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – संत श्री तुलसीदास

संत श्रीपुरंदरदास – Sant Purandar Das Information in Marathi

१] नाव – संत श्रीपुरंदरदास
२] जन्म – इसवी सन १४८४
३] आई – लक्ष्मक्का
४] वडील – वरदप्पा
५] मृत्यू – इसवी सन १५६४

संत श्रीपुरंदरदास (थोर संतकवी, कर्नाटक संगीत पितामह) इसवी सन सुमारे १४८४ ते इसवी सन सुमारे १५६४ पुरंदरदास ह्यांचा जन्म कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हंपीजवळील पुरंदरगड नावाच्या गावात झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव वरदप्पा होते आणि आईचे नाव लक्ष्मक्का किंवा कमलांबा होते. वरदप्पा नायक हे मोठे सराफ होते. तिरुपती किंवा श्रीनिवास ह्याच्या कृपेमुळे वरदप्पांना जो मुलगा झाला, त्याचे नाव त्यांनी श्रीनिवास किंवा तिरुमलैयप्पा असे ठेवले. त्याला तिम्मप्पा किंवा शिवप्पा असेही म्हणत.

तिम्मप्पा लहान असतानाच त्याचा संस्कृत आणि कन्नड भाषांचा उत्तम अभ्यास झाला. त्याला संगीताचेही शास्त्रशुद्ध ज्ञान मिळाले होते. तिम्मप्पा सोळा वर्षांचा असताना त्याचे लग्न सरस्वती नावाच्या एका सुशील मुलीशी झाले.

वडिलांच्या पश्चात तिम्मप्पाने सराफीचा व्यवसाय खूप वाढवला. कुशल रत्नपारखी म्हणून त्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती. विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय ह्याच्या दरबारात त्याला फार मान होता.

लवकरच तो खूप श्रीमंत झाला. श्रीमंत असूनही तो खूप कंजूस होता. पण त्याची पत्नी सरस्वती मात्र खूप उदार आणि दयाळू होती. कंजूस असलेला तिम्मप्पा विरक्त कसा झाला, ह्याबद्दल एक आख्यायिका सांगतात, ती अशी- एके दिवशी पांडुरंग एका वृद्ध आणि गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन तिम्मप्पाच्या पेढीवर गेला आणि त्याच्याजवळ द्रव्य मागू लागला.

पण तिम्मप्पाने त्याला वाटेला लावले. मग तो ब्राह्मण त्याच्या घरी गेला आणि त्याने सरस्वतीकडे मदत मागितली. तिला त्या ब्राह्मणाची दया आली आणि तिने आपली नथ काढून तिम्मप्पाला दिली.

ती नथ घेऊन तो ब्राह्मण परत तिम्मप्पाच्या पेढीवर गेला आणि त्याने ती नथ तिम्मप्पाला विकली. तिम्मप्पाने ती नथ विकत घेऊन तिजोरीत ठेवली. पण ती नथ हाताळताना तिम्मप्पाला संशय आला की, ही नथ आपल्याच पत्नीची असावी.

घरी गेल्यावर तिम्मप्पाने सरस्वतीकडे तिची नथ मागितली. सरस्वती खूप घाबरली आणि आता आपला पती आपल्याला अजिबात क्षमा करणार नाही, असे समजून तिने विष घेऊन प्राणत्याग करायचा असे ठरवले.

तिने विषाचा प्याला आपल्या ओठांजवळ आणताच त्यात तिला तिची नथ अचानक दिसली. सरस्वतीने ती नथ तिम्मप्पाला नेऊन दाखवली.

तिम्मप्पा चकित झाला. तो पेढीवर गेला आणि तिजोरी उघडून ब्राह्मणाकडून विकत घेतलेली नथ शोधू लागला. पण तिजोरीमध्ये ती नथ नव्हती. तिम्मप्पा परत घरी आला, तेव्हा त्याला घडलेला सर्व प्रकार सरस्वतीने सांगितला.

तिम्मप्पाने त्या ब्राह्मणाचा खूप शोध घेतला, पण तो ब्राह्मण त्याला सापडला नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, प्रत्यक्ष परमेश्वरच ब्राह्मणाच्या रूपाने याचक म्हणून माझ्या पेढीवर आला होता आणि मी मात्र त्याला विन्मुख परत पाठवले.

माझ्या ह्या संपत्तीचा काय उपयोग? त्याला आपल्या कंजूस वृत्तीचा पश्चात्ताप झाला. त्याच्यात विरक्ती निर्माण झाली. मग त्याने आपली सर्व संपत्ती गोरगरिबांना दान करून टाकली आणि भिक्षेची झोळी खांद्याला लावून तो हिंडू लागला.

काही दिवसांनंतर पांडुरंगाने तिम्मप्पाला स्वप्नात येऊन विजयनगरला जाण्याचा आदेश दिला. तिम्मप्पा आपल्या परिवारासह हंपी येथे गेला.

तिथे त्याने व्यासरायांकडून वैष्णव पंथाची दीक्षा घेतली. व्यासरायांनी त्याचे नाव पुरंदर विठ्ठल असे ठेवले. व्यासरायांच्या मठातील एका संताने त्याला पुरंदरदास असे म्हटले आणि पुढे तेच नाव रूढ झाले.

विजयनगर येथे राहत असताना पुरंदरदास आपल्या मुलांसह गोड आवाजात भक्तिगीते गात आणि त्या दिवसाला पुरेल एवढी भिक्षा गोळा करीत.

पुरंदरदास जी भक्तिगीते गात, ती ते स्वतःच रचत असत. ती पदे अतिशय रसाळ आणि हृदयस्पर्शी असल्यामुळे लोकांना ती खूप आवडत. थोड्याच कालावधीत ती कर्नाटकभर लोकप्रिय झाली. त्यांची भक्तिगीते ऐकून कृष्णदेवरायाही त्यांचा भक्त झाला.

त्याने तिरुपती येथील मंदिरात पुरंदरदासांसाठी एक वेगळा मंडप बांधला. तो मंडप दासमंडप म्हणून आजही प्रसिद्ध आहे. अस्पृश्य लोकांबद्दल पुरंदरदासांना खूप कळवळा होता.

जन्मजात अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती. पुरंदरदासांनी आपल्या आयुष्याचे अखेरचे दिवस हंपी येथे ईश्वरसेवेत घालवले. त्यांनी कन्नड भाषेत विपुल काव्यरचना केली, पण त्यांतील काही हजार पदेच आज उपलब्ध आहेत.

पुरंदरदासांनी दक्षिणेत, विशेषत: कर्नाटकात, भक्तिपंथास लोकप्रियता मिळवून दिली. कर्नाटक संगीत शिकवण्यासाठी त्यांनी पाठ तयार केले.

म्हणून त्यांना कर्नाटक संगीताचे आदिगुरू किंवा कर्नाटक संगीत पितामह असे मानतात. त्या पदांमुळे कर्नाटक संगीताची अवकळा नष्ट होऊन त्याला शास्त्रशुद्ध रूप प्राप्त झाले.

काय शिकलात?

आज आपण संत श्रीपुरंदरदास बद्दल माहिती मराठीत – Sant Purandar Das Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version