संत श्री ज्ञानेश्वर महाराज बद्दल माहिती मराठीत – Sant Dnyaneshwar Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला संत श्री ज्ञानेश्वर महाराज बद्दल माहिती मराठीत – Sant Dnyaneshwar Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – संत श्री एकनाथ

संत श्री ज्ञानेश्वर – Sant Dnyaneshwar Information in Marathi

१] नाव – संत श्री ज्ञानेश्वर महाराज
२] जन्म – इसवी सन १२७५
३] आई – रुक्मिणी
४] वडील – विठ्ठलपंत
५] मृत्यू (समाधी) – इसवी सन १२९६

संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज (भागवत धर्माचे प्रचारक) इसवी सन १२७५ ते इसवी सन १२९६ ज्ञानेश्वरांचा जन्म शके ११९७, श्रावण वद्य अष्टमी ह्या दिवशी मध्यरात्री महाराष्ट्रात पुण्याजवळील आळंदी येथे झाला.

ज्ञानेश्वरांना तीन भावंडे होती. त्यांचे मोठे भाऊ निवृत्तिनाथ हे त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे होते आणि तेच ज्ञानेश्वरांचे गुरूही होते. ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ हे ज्ञानेश्वरांपेक्षा दोन वर्षांनी लहान होते आणि त्या वेळच्या संतमंडळात ते सोपानकाका म्हणून प्रसिद्ध होते.

ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण मुक्ताबाई ही ज्ञानेश्वरांपेक्षा चार वर्षांनी लहान होती. ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत होते आणि आईचे नाव रुक्मिणी होते. विठ्ठलपंत हे विरक्त वृत्तीचे होते.

एके दिवशी ‘मी गंगेवर अंघोळ करण्यास जातो’ असे सांगून ते घराबाहेर पडले आणि सरळ काशी येथे गेले. त्यांनी रामानंद ह्यांच्याकडून संन्यास-दीक्षा घेतली.

बारा वर्षांनंतर जेव्हा रामानंदांना कळले की, विठ्ठलपंतांनी आपल्या बायकोच्या संमतीशिवाय संन्यास घेतला आहे, तेव्हा त्यांनी विठ्ठलपंतांना परत गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा केली.

विठ्ठलपंतांनी गुरुआज्ञा प्रमाण मानून परत गृहस्थाश्रम स्वीकारला. पण संन्यासाश्रमातून परत गृहस्थाश्रमात येणे, हे धर्मशास्त्राने पाप मानले होते. आळंदीच्या ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना वाळीत टाकले.

पण विठ्ठलपंत लोकांचा अन्याय सहन करत आपल्या संसाराचे पालन करत राहिले. त्यांना चार मुले झाली. ती चार अद्वितीय भावंडे म्हणजेच निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई.

यथावकाश मुले मोठी झाली. त्यांच्या मुंजी केल्या पाहिजेत, असे रुक्मिणीबाईंना वाटले. विठ्ठलपंत आळंदीच्या ब्रह्मसभेला शरण गेले. ते म्हणाले, “माझ्या मुलांच्या मुंजी करण्यासाठी मी कोणतेही प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे.”

तेव्हा तेथील ब्रह्मवृंदाने त्यांना ‘देहान्ताचे प्रायश्चित्त घ्या’, असे सांगितले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई ह्यांनी देहान्त प्रायश्चित्त घेण्याचे नक्की केले. त्यांनी प्रयाग येथील त्रिवेणी संगमात आपला देह अर्पण केला.

आपल्या मुंजी व्हाव्यात म्हणून आळंदीच्या ब्रह्मवृंदाने सांगितलेले देहान्ताचे प्रायश्चित्त आपल्या आई-वडिलांनी घेतले आहे, हे निवृत्तिनाथांना कळले; मग ते आपल्या भावंडांना घेऊन परत ब्रह्मवृंदाकडे गेले.

ब्रह्मवृंदाने त्यांना ‘पैठणच्या ब्राह्मणांची शिफारस आणा’, असे सांगितले. पैठण हे त्या वेळी दक्षिणेतील काशी म्हणून प्रसिद्ध होते. निवृत्तिनाथ आपल्या भावंडांना घेऊन पैठणला गेले.

तिथे ह्या भावंडांसाठी धर्मशास्त्र्यांची सभा भरली. शास्त्राच्या आधारासाठी शोध घेतला गेला. पण संन्याशांच्या मुलांची मुंज ह्यासाठी आधार मिळाला नाही.

धर्मशास्त्र्यांनी ह्या भावंडांना ‘परमार्थाचा मार्ग धरा’, असे सांगितले. आता आपली मुंज होणे शक्य नाही आणि यापुढील काळ आपल्याला विठ्ठलभक्तीतच घालवायचा आहे, हे ज्ञानेश्वरांना समजले.

सर्वाच्या ठायी एकाच आत्म्याचे वास्तव्य असते, हे दाखवण्यासाठी ज्ञानेश्वरांना पैठणमधील टवाळखोर मंडळींसमोर ज्ञानेश्वर नावाच्या रेड्याच्या तोंडून वेद वदवून दाखवावे लागले. तो चमत्कार पाहताच पैठणच्या ब्राह्मणांचा गर्व उतरला.

तिथून ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसह नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या तीरावरील नेवासे ह्या गावी गेले. काही दिवसांनंतर निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितले की, “गीता हा महत्त्वाचा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे.

सामान्य माणसाला त्या ग्रंथातील ज्ञानाचा आनंद घेता येत नाही. तू हे ज्ञान सामान्य माणसाच्या मराठी भाषेत आणि ओवीस्वरूपात लिही. त्या ओव्या वाचून सर्वसामान्यांनाही अध्यात्माची वाट सोपी होईल.”

ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूची, निवृत्तिनाथांची आज्ञा मानली आणि तिथल्या शिवमंदिरात बसून गीतेचा अर्थ ओवीरूपात सांगितला. हा अर्थ सच्चिदानंदान नावाच्या गृहस्थाने लिहून घेतला.

९००० ओव्यांच्या ह्या ग्रंथाचे नाव ‘भावार्थदीपिका’ असे ठेवण्यात आले. पण ज्ञानेश्वरांनी लिहिलेला म्हणून तो ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ ह्या नावानेच प्रसिद्ध झाला. ज्ञानेश्वरीतील शब्दांचे सौंदर्य रसिकांना रमवते.

ज्ञानेश्वरीमध्ये परमार्थ आणि प्रपंच ह्यांचा सुंदर मेळ घातला आहे. ज्ञानेश्वरांनी सिद्धान्तांतून परमार्थ आणि दृष्टान्तांतून प्रपंच शिकवला आहे.

ह्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरांनी गुरूची थोरवी सांगितली आहे, मराठी भाषेचे गुण गाईले आहेत आणि ग्रंथाच्या शेवटी सर्व विश्वासाठी पसायदानही मागितले आहे.

ह्या साऱ्या वैशिष्ट्यांमुळे आज सातशे वर्षांनंतरही ज्ञानेश्वरीचे महत्त्व कमी झालेले नाही. ज्ञानेश्वरीच्या रचनेनंतर ही भावंडे पंढरपूर येथे गेली. तिथे त्यांची भेट नामदेवांशी झाली.

नामदेव ज्ञानेश्वरांचा भक्त झाला. गोरा कुंभार, चोखामेळा, नरहरी सोनार अशी संतमंडळी ज्ञानेश्वरांच्या भोवती गोळा झाली. मग ही संतमंडळी तीर्थयात्रेसाठी निघाली.

काशी, प्रयाग अशी उत्तरेची तीर्थयात्रा करून ते पश्चिमेस द्वारका, गिरनार ह्या क्षेत्रीही गेले आणि मग पंढरपूर येथे आले. तीर्थयात्रा झाल्यानंतर ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसह आळंदी येथे परत आले.

तापी नदीच्या काठी राहणाऱ्या आणि चौदा विद्या आणि पासष्ट काला अवगत असणाऱ्या चांगदेवांच्या कानावर ज्ञानेश्वरांचे नाव गेले. ज्ञानेश्वरांना भेटावे, असे त्यांना वाटू लागले.

त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहावयास घेतले, पण ज्ञानेश्वरांना मायना काय लिहावा, हे त्यांना कळेना म्हणून त्यांनी आपल्या शिष्याकरवी कोरे पत्र पाठवले.

ते कोरे पत्र पाहून निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितले की, “अहंकारामुळे ह्या योग्याला ब्रह्मज्ञान नाही. तू त्याला निजबोध होईल असे सुंदर पत्र लिही.”

ज्ञानेश्वरांनी ६५ ओव्यांचे एक पत्र चांगदेवांना लिहिले. ते पत्र पाहून चांगदेवांना ज्ञानेश्वरांची थोरवी कळली. ह्याच ६५ ओव्या आज ‘चांगदेव पासष्टी’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

असाच काही काळ गेल्यानंतर ज्ञानेश्वरांना वाटले की, आपले जीवनकार्य आता संपले आहे. त्यांनी जिवंत समाधी घेण्याचे निश्चित केले. शके १२१८, कार्तिक वद्य त्रयोदशी ह्या दिवशी समाधी घेण्याचे नक्की झाले.

ही बातमी नामदेवादी संतमंडळींना कळली, तेव्हा त्यांना खूप दुःख झाले. त्या वेळची सर्व संतमंडळी ज्ञानेश्वरांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आळंदी येथे गोळा झाली.

सिद्धेश्वरमंदिराजवळच समाधीची जागा खोदून तयार करण्यात आली होती. समाधीच्या पायऱ्यांवरून ज्ञानेश्वर आत उतरले. ते उत्तर दिशेला तोंड करून पद्मासन घालून बसले. मग समाधीवर शिळा बसवण्यात आली.

सर्व संतमंडळाने ज्ञानेश्वरांचा जयजयकार केला आणि समाधीवर पुष्पवृष्टी केली. ज्ञानेश्वर परब्रह्मस्वरूपात विलीन झाले. पण ज्ञानेश्वरीच्या रूपाने महाराष्ट्रातल्या घराघरांत ते आजही चिरंजीव आहेत.

काय शिकलात?

आज आपण संत श्री ज्ञानेश्वर महाराज बद्दल माहिती मराठीत – Sant Dnyaneshwar Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: