सद्गुरु सेवा
फार प्राचीन काळी गोदावरी नदीच्या तीरावर अंगीरस नावाच्या ऋषींचा एक आश्रम होता. त्या आश्रमात वेदधर्म नावाचे एक महान ऋषी आपल्या शिष्यवर्गाला ज्ञान देत होते. त्यांनी चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, काव्य, व्याकरण इ. अनेक गोष्टी आपल्या शिष्यांना अगदी मनापासून शिकवल्या होत्या. त्यांच्या त्या आश्रमातील शिष्यवर्गामध्ये एक शिष्य होता. त्याचं नाव दीपक! एके दिवशी वेदधर्मऋषींनी आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले. सगळे शिष्य जमा होताच, वेदधर्म गुरू त्यांना म्हणाले, “हे पाहा माझ्या लाडक्या शिष्यांनो, मी आजपर्यंत माझ्याकडे जेवढे ज्ञान होते, ते सर्व मी तुम्हाला दिले आहे.
मला अजूनही न लाभलेली पूर्ण मन:शांती मिळविण्यासाठी मी आता काशीयात्रेला जाणार असून, त्या पवित्र स्थानावर काही वर्षे तप करण्याचा माझा मानस आहे. खरं तर ह्या काळात माझ्याबरोबर तिथे कुणी तरी असणं फार आवश्यक आहे. तरी माझ्याबरोबर त्या पवित्र क्षेत्री येऊन वास्तव्य करायला कोण तयार आहे?” गुरुजी असे म्हणताच खरंतर जवळजवळ बरेच शिष्य बरोबर जायला तयार झाले. पण…. पण जेव्हा गुरू वेदधर्म ह्यांनी सर्वांना हे सांगितलं की, “तिथे गेल्यावर मला एक असाध्य रोग होईल. माझ्या अंगाला दुर्गंधी येईल.
अंगावर जागोजाग जखमा होतील. त्यातून रक्त, पू वाहील, अपार वेदना-कष्ट होतील. तेव्हा त्या परिस्थितीत माझ्या बरोबर राहून ज्याची माझी सेवा करण्याची तयारी असेल, त्यानेच पुढे यावे.’ गुरू वेदधर्म ह्यांनी हे सांगितले मात्र… पुढे आलेले सर्वच शिष्य भराभर सरकले. पुढे आला तो फक्त एकच दीपक! त्याला पुढे आलेला पाहून गुरूंना फार आनंद झाला. पुढे खरोखरच दीपकला घेऊन वेदधर्म हे काशीक्षेत्री गेले.
तिथे त्याचे तपाचरण सुरू असतानाच खरोखरच वेदधर्म ह्यांना त्या शारीरिक व्याधीने ग्रासले. त्यांच्या अंगावर अनेक ठकाणा जखमा झाल्या. त्यातून दुर्गधीमय रक्त, पू वाहू लागला. तरीही त्यांच्याकडे पाठ न फिरविता दीपकने त्याही परिस्थितीत आपल्या गुरूंची निष्ठापूर्वक सेवा केली. त्याना औषध-पाणी केलं. त्याची ही सेवा-चाकरी करीत असताना त्याने कधीच टाळाटाळ केली नाही.
नाक मुरडले नाही किंवा सेवेत कधी कसलीच कुचराई केली नाही. तो मन लावून आपली सेवा करीत राहिला. आणि एक दिवस भगवान शंकर त्या दीपक शिष्यावर प्रसन्न झाले. त्याला दर्शन देत शंकर म्हणाले, “बाळ दीपका, तू आपल्या गुरूंची जी सेवा करतो आहेस; ती तुझी निष्ठा पाहून मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा काय हवं ते मागून घे.” त्यावर दीपक म्हणाला, “प्रभू, तुमचे दर्शन झाले ह्यातच मला माझ्या गुरुसेवेचं फळ मिळाले, असं मी मानतो.
आता जर काही मागायचं असेल, तर ते मला माझ्या गुरूंनाच विचारून येऊ दे.” दीपकने अशा प्रकारे ३१ वर्षे गुरुसेवा केली. त्यांना रोगमुक्त करवले अन् मग त्यांना घेऊन तो आश्रमात परत आला. धन्य तो शिष्य अन् धन्य त्याची गुरुसेवा!
तात्पर्य : आपल्या गुरूंची सेवा करणे, हे प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे. तो त्याचा शिष्यधर्म आहे. तो त्याने पाळायलाच हवा.