सात आंधळे आणि हत्ती
एकदा तथागत बुद्ध आपल्या भिक्खूसोबत ‘श्रावस्ती’ नावाच्या नगरात गेले. श्रावस्तीमधील लोकांना उपदेश करण्यासाठी ते भिक्खूसह काही दिवस तेथेच थांबले. भिक्खू पिंडपातासाठी, अन्न गोळा करण्यासाठी दररोज नगरात फिरायचे. नगरात फिरताना भिक्खूच्या असे लक्षात आले, की श्रावस्ती नगरात वेगवेगळ्या विचारांचे लोक राहतात. हे लोक विविध विषयांवर नेहमी एकमेकांशी वाद घालतात, भांडतात.
दुसऱ्यांचे म्हणणे न ऐकता आपलेच म्हणणे खरे आणि इतरांचे खोटे असे हे हट्टी लोक समजतात. विचार न करता, कडवटपणे बोलून ते एकमेकांना दुखावतात. नगरातील लोकांची एकमेकांशी नेहमी होणारी भांडणं, वादविवाद बघून एक भिक्खू सोबतच्या भिक्खूना म्हणाला, ”मला कळत नाही, हे लोक नेहमी एकमेकांशी असे का भांडतात ? आपलेच म्हणणे खरे, असा अनावश्यक हट्ट का धरतात?” यावर दुसरा भिक्खू म्हणाला, ”बरोबर आहे तुझं. या लोकांची सतत होणारी भांडणं बघून मला सुद्धा हा प्रश्न पडतो.
आपण याविषयी बुद्धांशी बोलायला हवं. त्यांचं म्हणणं ऐकायला हवं.” मग सर्व भिक्खू बुद्धांकडे गेले. त्यांनी सर्व हकिकत बुद्धांना सांगितली आणि यावर मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. आपल्याच म्हणण्याला चिकटून, दुसऱ्यांचे न ऐकता मत व्यक्त करणाऱ्यांची स्थिती कशी असते, हे स्पष्ट करताना बुद्ध म्हणाले, भिक्खूनो, याच श्रावस्तीमध्ये पूर्वी एक राजा होऊन गेला. एकदा तो आपल्या सेवकाला आदेश देत म्हणाला, ”आपल्या या नगरात जे लोक जन्मतः आंधळे असतील त्यांना शोधून एकत्र आण आणि माझ्यापुढे हजर कर.”
राजाच्या आज्ञेनुसार सेवकाने दुसऱ्या दिवशी नगरातील सात जन्मांध व्यक्तींना शोधून दरबारात राजासमोर हजर केले. सेवकाने शोधून आणलेल्या त्या सात जन्मांध व्यक्तींना बघून राजा खूश झाला आणि सेवकास म्हणाला, “आता तू या सात जणांना एक हत्ती दाखव.” माहूत हत्ती घेऊन दरबाराबाहेरील मोकळ्या जागेत आला. राजा, प्रधान, दरबारातील मंत्री आणि सातही आंधळे तेथे गेले. राजाच्या आज्ञेनुसार सेवकाने त्या सात जन्मांध व्यक्तींच्या मध्ये एक हत्ती उभा केला आणि त्यांना हत्तीला स्पर्श करायला सांगितले.
सातही आंधळ्यांनी त्या हत्तीच्या शरीराच्या केवळ एकेका अवयवाला स्पर्श केला. कुणी हत्तीच्या गोल डोक्याला, कुणी मोठ्या पायाला. कणी लांब सोंडेला तर कुणी शेपटीच्या गोंड्याला स्पर्श केला. हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करून सातही आंधळे एका बाजूला रांगेत जाऊन उभे राहिले. आपण केलेल्या स्पर्शाच्या आधारे हत्ती कसा असेल याची कल्पना त्या सर्वांनी आपापल्या मनात केली.
थोड्या वेळाने राजा त्या सात आंधळ्यांना म्हणाला, “आताच तुम्ही सर्वांनी हत्तीला स्पर्श केला. आता मला सांगा, हत्ती कसा आहे ?” राजाचा प्रश्न ऐकून प्रत्येक जण उत्तर द्यायला उतावीळ झाला. ज्याने हत्तीच्या गोलाकार डोक्याला स्पर्श केला तो पहिला आंधळा पुढे येऊन म्हणाला, “महाराज, मी हत्तीला स्पर्श केलेला आहे. हत्ती अगदी एखाद्या भल्यामोठ्या माठासारखा आहे.” त्याचे हे उत्तर ऐकून दरबारातील मंत्री आणि इतर सहा आंधळे मोठमोठ्याने हसायला लागले. सगळे लोक का हसत आहेत हे काही त्याला कळेना.
तितक्यात ज्याने हत्तीच्या दाताला स्पर्श केला होता, तो दुसरा आंधळा पुढे आला आणि म्हणाला, “महाराज, हा खोटं बोलतोय. मी हत्तीला स्पर्श केला आहे. हत्ती तर एखाद्या मोठाल्या खिळ्यासारखा आहे.” पुन्हा सारे जोरजोरात हसायला लागले. लगेच ज्याने हत्तीच्या सोंडेला स्पर्श केला होता, तो तिसरा आंधळा म्हणाला, ”वेडे आहात तुम्ही दोघं. महाराज, मी सांगतो. हत्ती हुबेहूब नांगराच्या दांड्यासारखा आहे.” त्याचं बोलणं संपताच चौथा आंधळा, ज्याने कानाला स्पर्श केला होता तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही यांचं ऐकू नका.
मी सांगतो, हत्ती मोठाल्या सुपासारखा आहे.” लगेच हत्तीच्या पायाला स्पर्श करणारा पाचवा आंधळा पुढे आला आणि म्हणाला, “महाराज, हे सगळे मूर्ख आहेत. ह्यांना काय कळतंय? मी हत्तीला स्पर्श केला आहे. हत्ती अगदी मोठ्या खांबासारखा आहे.” त्याचं बोलणं पूर्ण होत नाही तोच हत्तीच्या पोटाला स्पर्श करणारा सहावा आंधळा रागारागात सर्वांवर चिडून बोलला, “पुरे झालं आता. खोटं बोलणं थांबवा. मी सांगतो, माझं ऐका. हत्ती हा धान्य भरलेल्या पोत्यासारखा आहे.” शेवटी हत्तीच्या शेपटीच्या गोंड्याला स्पर्श करणारा सातवा आंधळा मोठ्याने ओरडत म्हणाला, ”हत्तीविषयी वाटेल ते बोलू नका.
मी हत्तीला स्पर्श केलेला आहे. अरे, तो तर केरसुणीसारखा आहे.” अशाप्रकारे प्रत्येकाने आपले म्हणणे उतावीळपणे आणि आग्रहाने राजापुढे मांडले. त्यानंतर सर्वजण एकमेकांशी जोरजोरात भांडायला लागले. सातही आंधळे एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले. मी म्हणतोय तसाच हत्ती आहे, इतरजण सांगत आहेत तसा नाही, असे प्रत्येक जण म्हणायला लागला. प्रत्येक जण राजाला आपलेच म्हणणे खरे असल्याचे आग्रहाने सांगू लागला.
दरबारातील त्यांचा हा गोंधळ बघून राजा आपल्या प्रधानाला म्हणाला, “प्रधानजी, या सात जणांपैकी कोण खरं बोलतोय आणि या सर्वांचा हा गोंधळ का उडाला हे तुम्ही स्पष्ट करा.” प्रधान हळूच पुढे आला. राजाला नमस्कार करून तो सातही आंधळ्यांना म्हणाला, ”तुम्ही सातही जण चुकलात. तुम्ही प्रत्येकाने हत्तीच्या केवळ एकेकाच अवयवाला स्पर्श केला.
आपण स्पर्श केलेला एक अवयव म्हणजे जणूकाही संपूर्ण हत्ती आहे, असे तुम्हाला वाटले. त्यामुळे हत्तीच्या डोक्याला स्पर्श करणाऱ्याल हत्ती माठासारखा, दाताला स्पर्श करणाऱ्याला खिळ्यासारखा, सोंडेला स्पर्श करणाऱ्याला नांगराच्या दांड्यासारखा, कानाला स्पर्श करणाऱ्याला सुपासारखा, पायाला स्पर्श करणाऱ्याला खांबासारखा, पोटाला स्पर्श करणाऱ्याला धान्य भरलेल्या पोत्यासारखा तर शेपटीच्या गोंड्याला स्पर्श करणाऱ्याला केरसुणीसारखा वाटला. म्हणून तर हा गोंधळ उडाला.
तुम्ही दुसऱ्याचे म्हणणे न ऐकता, न समजून घेता हट्टीपणे वागलात, इथच तुमची सर्वात मोठी चूक झाली.” प्रधानाचे बोलणे ऐकून सातही आंधळ्यांना आपली चूक लक्षात आली. हा प्रसंग सांगितल्यावर तथागत बुद्ध भिक्खूना म्हणाले, “भिक्खूनो, बघितलं? केवळ एकच बाजू विचारात घेणारे, दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेणारे कसे फसलेत! उतावीळपणामुळे इतरांचे म्हणणे न ऐकणारे, विचार न करता बोलणारे सातही आंधळे स्वतः चूक असताना इतरांना दोष द्यायला लागले.
आपण स्पर्श केलेला हत्तीचा एक अवयव म्हणजे जणूकाही संपूर्ण हत्ती असे प्रत्येक आंधळ्याला वाटले. त्यामुळे आपलेच खरे, इतरांचे खोटे असे त्यांना वाटायला लागले. हीच त्यांची सर्वात मोठी चूक झाली. आपली चूक समजून न घेता इतरांना चुकीचं ठरविण्यासाठी सगळेच जण एकमेकांवर तुटून पडले. जे लोक इतरांचे न ऐकता, सर्व बाजू लक्षात न घेता आपलेच म्हणणे खरे आहे असा अनावश्यक हट्ट धरतात, ते डोळे असूनही आंधळे असल्यासारखेच वागतात. त्यामुळे आपली कुठे चूक होते आहे का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे.
भिक्खूनो, सत्यापर्यंत पोहचण्यासाठी वस्तूच्या, प्रसंगाच्या जास्तीत जास्त बाजू लक्षात घ्या. इतरांचं म्हणणं आंधळेपणाने धुडकावून लावू नका, नाकारू नका. आपले मत व्यक्त करताना सर्व बाजूंनी विचार करा. उतावीळपणे न वागता, इतरांचे म्हणणे शांतपणे ऐका. घाईघाईने, आंधळ्यांसारखे आपलेच म्हणणे खरे असा अनावश्यक हट्ट करू नका.’ बुद्धांचं मार्गदर्शन ऐकून भिक्खूना त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली. सर्व भिक्खूनी त्यांना वंदन केले आणि उतावीळपणे न वागण्याचे कबूल केले.
तात्पर्य/बोध – घाईघाईत, अपुऱ्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढू नये. आपलेच म्हणणे खरे असा दुराग्रह करू नये, हट्टीपणे वागू नये. इतराच्या मताचा सुद्धा आदर करावा.