Site icon My Marathi Status

राजाचा व्याय

टाकीचे घाव सोसल्याशिवाय ज्याप्रमाणे दगडाला देवपण येत नाही; त्याचप्रमाणे अनेक परीक्षा, कसोट्या दिल्याशिवाय मोठेपण प्राप्त होत नाही, हेच खरं! फार फार वर्षांपूर्वी असाच एक न्यायी अन् दयाळू राजा होऊन गेला. त्याचं नाव होतं शिबीराजा! एकदा काय झालं शिबीराजा आपल्या महालात बसलेला असताना एक कबूतर जीव वाचवत, पळत-पळत जे सरळ आलं, ते त्या राजाच्या महालात.

खिडकीतून कबूतर आत आलं आणि ते पटकन् राजाच्या डाव्या हातावर बसलं. शिबीराजानं चमकून त्या कबुतराकडे पाहिलं, तर काय ! ते कबुतर पूर्णपणे घाबरले होते. भीतीने त्याचे सर्वांग थरथरत होते. त्याची नजरही भिरभिरत होती. शिबीराजा स्वभावत:च दयाळू, मायाळू होता. त्याच्या मनात पशू-पक्षी ह्यांच्याबद्दल विलक्षण कणव होती.

शिबीराजाने त्या कबुतराच्या अंगावरून प्रेमानं हात फिरवला. त्यामुळे ते थोडं निर्भय झालं. त्याला माहीत होतं की, आपण आता या राजाला शरण आलो आहोत; तेव्हा आता आपल्याला कुणाचीच भिती बाळगण्याचं कारण नाही. कारण शरणागताला अभय देणं, त्याचं रक्षण करणं, हे तर राजाचे ब्रीद आहे. असा मनात विचार आल्यामुळे ते कबूतर आता राजाश्रयाने थोडेसे सुखावले. तोच त्या कबुतराच्या मागावर असलेला बहिरी ससाणा- तो पण तिथे आला.

ससाण्याने पाहिले, तर कबूतर राजाच्या डाव्या हातावर बसलेलं होतं अन् राजा उजव्या हातानं त्याला आंजारत-गोंजारत होता. तेव्हा तो ससाणा शिबीराजाला म्हणाला, “राजा, सोडा त्या कबुतराला खाली. ते माझी शिकार आहे. माझी शिकार ही माझी मला मिळालीच पाहिजे.” शिबीराजा त्या ससाण्याला म्हणाला, “हे बघ, हे घाबरलेले, भ्यायलेले का मला शरण आले आहे. त्यानं माझ्याकडे आश्रय मागितला आहे. तेव्हा शरणागा अभय देणं, हा माझा धर्म आहे. ते माझं कर्तव्य आहे.

तेव्हा मी त्याला देणार नाही ठाऊक आहे; मी त्या कबूतराला सोडले, तर तू त्याला खाणार अन् तुझी भूक भागवणार मी जर तसं होऊ दिलं तर मला पाप लागेल.” तेव्हा ससाणा म्हणाला, “राजा, तुला जीवो जीवस्य जीवनम् , हा न्याय पण ठाऊक आहे ना, मला भूक लागली आहे. माझं भक्ष्य मी शोधलं आहे, ते मला मिळालं पाहिजे, नाहीतर शिबीराजा, मी इथं तुझ्या दारात उपाशी राहून मरेन आणि त्याच पापही तुझ्याच माथ्यावर लागणार नाही का? म्हणून म्हणतो, राजा मला माझे अन्न दे, माझे भक्ष्य दे- मला माझी भूक भागवू दे.” तेव्हा राजा म्हणाला, “हे बघं तुला जर दुसरे काही अन्न हवे असेल, तर ते माग. मी ते तुला आनंदाने देईन.

पण आता हे कबुतर मात्र तुला मिळणार नाही.” तेव्हा ससाणा म्हणाला, “हे राजा , तुझा जर हा निर्णय पक्का असेल, तर मग तू एक कर, तू त्या कबुतराच्या वजनाएवढे मांस मला तुझ्या शरीरातून काढून दे.” शिबीराजाने ससाण्याचा तो प्रस्ताव लगेच मान्य केला. राजाने सेवकाला आज्ञा देऊन एक तराजू मागवला. अभय दिलेल्या त्या कबुतराला तराजूच्या एका पारड्यात बसविले.

राजाने एक धारदार सूरी घेतली आणि ती त्याने खसकन् आपल्या मांडीत खुपसली. आणि तिथलं मांस काढून ते दुसऱ्या पारड्यात टाकलं. पण कबुतराचं पारडं जडच होतं. मग शिबीराजाने हाताचे, पायाचे, दंडाचे असे विविध ठिकाणचे मांस काढून ते दुसऱ्या पारड्यात टाकले, तरी पण कबुतराचे पारडे काही वर जाईना किंवा तुला होईना.

क्षणभर हा प्रकार पाहून शिबीराजा पण आश्चर्यचकित झाला. त्यानं क्षणात त्या पारड्यातल्या कबुतराकडे पाहिलं. एक नजर त्या ससाण्यावरही टाकली. अन् दुसऱ्याच क्षणी तो राजा म्हणाला, “हे ससाण्या, ह्या कबुतराच्या वजनाइतक माझ्या शरीरातलं मांस तुला हवं आहे ना, मग हे पाहा मी माझा सर्व देहच ह्या दुसऱ्या पारड्यात अर्पण करतो’, असे नुसते बोलून राजा थांबला नाही, तर त्याने लगेच हातात उदक सोडून आपला सर्व देहच त्या ससाण्याला भक्ष्य म्हणून अर्पण केला.

शिबीराजाचा न्याय, त्याचा दयाळूपणा अन् शरणागताच्या रक्षणासाठी देहार्पण करणाऱ्या राजाची तयारी पाहिली आणि…. त्याच कबुतराचे झाले अग्निदेव आणि ससाण्याचे झाले इंद्रदेव! दोघांनी शिबीराजाला आशीर्वाद देत म्हटले, “राजा, तुझ्या दातृत्वाची आम्ही परीक्षा घेत होतो. तू खरंच न्यायी आहेस, दयाळू आहेस; हे आम्हालाच नव्हे तर आज उभ्या जगाला पटलं आहे. तू धन्य आहेस. राजा, तू धन्य आहेस.’

तात्पर्य : शरणागताला अभयदान देणं, हा राजाचा धर्म आहे.

Exit mobile version