एकदा तथागत बुद्ध राजगृह येथील वेळूवनात उपदेशासाठी गेले. तेथील लोकांना सदाचरणाचा उपदेश करण्यासाठी ते काही दिवस तेथेच थांबले. त्यांचा उपदेश, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून अनेक लोक प्रेरित व्हायचे. रोज अनेक लोक बुद्धांना भेटण्यासाठी तेथे यायचे आणि आपल्या मनातील शंका बुद्धांना विचारायचे, आपले दुःख त्यांना सांगायचे. बुद्ध अतिशय सोप्या शब्दांत त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे.
यामळे अनेकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा. त्याच नगरात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण आपल्या धनंजानी नावाच्या पत्नीसोबत रहायचा. धनंजानीला बुद्धांबद्दल प्रचंड आदर वाटायचा. तिचा पती मात्र सतत त्यांना दोष द्यायचा. रागाने आंधळा होऊन तो नेहमी बुद्धांविषयी अपशब्द बोलायचा, त्यांचे दोष सांगत फिरायचा. एके दिवशी तो थकून घरी आला. हातपाय धुवून जेवायला बसला.
मनात बुद्धांबद्दलचा राग खदखदत होताच. त्याची पत्नी धनंजानी जेवणाचे ताट घेऊन त्याच्यापुढे आली. तिच्या मनात बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याविषयी श्रद्धा होती. आपल्या पतीला जेवण वाढताना अचानकपणे तिने ‘बुद्धांना वंदन असो’ असे तीनदा म्हटले. आपल्या पत्नीने केलेले बुद्धांचे स्मरण, त्यांना केलेले वंदन त्या क्रोधी ब्राह्मणाला मुळीच रुचले नाही. तो रागाने लालबुंद झाला.
जेवणाचे ताट बाजूला सारत, तिच्यावर ओरडत तो म्हणाला, ”तू पापी, चांडाळीण आहेस, मूर्ख आहेस. त्या निर्बुद्ध व्यक्तीची स्तुती करतेस ? त्याला वंदन करतेस? अगं, मी गावभर त्याचे दोष सांगत फिरतो आणि तू त्याच्याविषयी श्रद्धा बाळगतेस?” धनंजानी शांतपणे म्हणाली, ”बुद्धांच्या मनात सर्वांविषयी प्रेम आहे, ते श्रेष्ठच आहेत. या पृथ्वीवर त्यांना दोष देऊ शकेल, असा मला कुणी दिसत नाही. तुम्ही स्वतः त्यांच्याजवळ जा आणि अनुभव घ्या.” आपली पत्नी धनंजानीचे बोलणे ऐकून तो अधिकच चिडला.
रागारागात तो बुद्धांकडे गेला. स्वतःवरचे नियंत्रण गमावलेला तो बुद्धांच्या शेजारी जाऊन बसला. बुद्धांनी त्याच्याकडे बघितले, तेव्हा तो म्हणाला, “बुद्धा, लोक तुझी स्तुती करतात. तुला ज्ञानी समजतात. हे जर खरे असेल तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे.’ बुद्ध शांतपणे उत्तरले, “होय नक्कीच. निःसंकोचपणे विचार.’ तेव्हा काहीशा रागानेच तो म्हणाला, “कशाचा नाश केल्यावर माणूस सुखी होतो? कशाचा नाश केल्यावर त्याला शांत झोप लागते? कोणत्या गोष्टीचा नाश करणे तुला आवडते?” बुद्ध म्हणाले, “हे ब्राह्मणा, क्रोधाचा नाश केल्यावर माणूस सुखी होतो.
क्रोधाचा नाश केल्यावर त्याला शांत झोप लागते. त्यामुळे मला क्रोधाचा नाश करणे आवडते.” बुद्धांचे हे उत्तर ऐकून तो थोडा शांत झाला. बुद्ध पुढे म्हणाले, ”अरे, क्रोध आधी माणसाला मधुर वाटतो. पण क्रोधामुळे माणूस आंधळा होतो. योग्य-अयोग्य यातील फरक त्याला कळत नाही. या क्रोधाच्या चक्रात माणूस कधी फसून जातो, हे त्याला स्वतःला सुद्धा कळत नाही, क्रोधाचा नाश केल्यावर मात्र माणूस डोळसपणे विचार करू शकतो.
यामुळे क्रोध सोडून माणूस सुखी होतो. म्हणून आपण सर्वांनी क्रोध सोडला पाहिजे.” बुद्धांचे हे उत्तर ऐकून त्या ब्राह्मणाला समाधान वाटले, त्याला आपली चूक कळली. बुद्धांना वंदन करत तो म्हणाला, “तथागत, मला क्षमा करा. तुम्ही मला योग्य वाट दाखविली आहे. मला माझी चूक कळली आहे.” त्याने बुद्धांची क्षमा मागितली आणि तो बुद्धांना शरण गेला. ही सारी हकिकत तेथील दुसऱ्या एका भारद्वाज ब्राह्मणाला समजली. त्यामुळे तो खूप चिडला, रागाने लालबुंद झाला.
एका ब्राह्मणाने बुद्धाला शरण जाणे त्याला मुळीच रुचले नाही. तो लगेच तथागतांकडे गेला. क्रोधाने आंधळा झालेला तो ब्राह्मण असभ्य भाषेत, कठोर शब्दांत बुद्धांना शिवीगाळ करू लागला. तो इतका चिडूनही बुद्ध मात्र शांत राहिले. बुद्धाना शात बघून तो आधिकच चिडला आणि त्याना दोष देतच राहिला. बुद्धांनी मात्र मनाची शांतता न गमावता त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
आपण इतके कठोर अपशब्द बोलूनही बुद्धांना शांत बघून त्याला आश्चर्य वाटले. काही वेळाने तो ब्राह्मण शांत झाला आणि खाली बसला. तो बुद्धांना म्हणाला, ”गोतमा, मी तुझ्यावर चिडलो, तुला अपशब्द बोललो, दोष दिले तरी तू शांत कसा?” बुद्धांनी शांतपणे त्याला विचारले, “तुझ्याकडे कुणी मित्र, नातेवाईक, पाहुणे म्हणून येतात का?” यावर तो ब्राह्मण म्हणाला, ”होय, कधीकधी असे पाहुणे येतात.”
बुद्ध त्याला म्हणाले, ”मग तू त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचे काही पदार्थ घरी तयार करतोस का?’ यावर तो ‘होय’ असे उत्तरला. त्यावर बुद्ध त्याला म्हणाले, “तुझ्या घरी आलेल्या पाहुण्यांनी जर ते पदार्थ स्वीकारले नाहीत तर ते कुणाचे होतात?” तो ब्राह्मण लगेच म्हणाला, ”असे झाले तर ते पदार्थ माझेच होतात.’ बुद्ध म्हणाले, ”अगदी बरोबर. तू मला उद्देशून शिवीगाळ केलीस, अपशब्द बोललास, रागावलास. मी मात्र यापैकी काहीच स्वीकारले नाही. त्यामुळे जे तुझे होते, ते तुझ्याकडेच राहिले.
मी जर प्रत्युत्तर म्हणून तुझ्यावर चिडलो असतो, रागावून शिवीगाळ केली असती तर तुझे अपशब्द मी स्वीकारल्यासारखे झाले असते. मात्र मी तसे न करता शांत राहून तुझे काहीच स्वीकारले नाही. याचा अर्थ तुझा राग, तुझे अपशब्द, तुझी शिवीगाळ तुझी होती, तो तुझ्याकडेच राहिला. म्हणून हे ब्राह्मणा, मी शांत राहिलो.” हे ऐकून त्या ब्राह्मणाला आपली चूक लक्षात आली. त्याला समजावत बुद्ध शांतपणे म्हणाले, “क्रोधामुळे माणूस आंधळा होतो. आपली विचार करण्याची शक्ती हरवून बसतो. त्यामुळे तो इतरांवर चिडून अपशब्द बोलतो.
रागारागात त्यांच्याशी भांडतो, शत्रुत्व ओढवून घेतो. या सर्वांमुळे तो दुःखी होतो. ज्ञानी माणूस मात्र हे सर्व जाणतो. त्यामुळे तो क्रोध करणाऱ्यावर चिडत नाही, अपशब्द बोलल्याने दुःखी होत नाही. क्रोध करणाऱ्यावर तो प्रेमाने मात करतो. ज्ञानी माणसाची सहनशीलता हाच त्याचा विजय असतो. त्यामुळे तो अपशब्द, शिवीगाळ सहन करून शांत राहतो. म्हणून हे ब्राह्मणा, कोणतेही कारण असो माणसाने चिडू नये, दुसऱ्यांबद्दल अपशब्द बोलू नये.
संयम गमावू नये. तुझे कल्याण होवो.” हे सर्व ऐकल्यावर त्या ब्राह्मणाने बुद्धांना वंदन केले आणि त्यांना शरण गेला. अशाप्रकारे प्रत्येक वेळी बुद्धांनी शांतपणे अज्ञानाला ज्ञानाच्या आधारे, द्वेषाला प्रेमाच्या आधारे आणि उतावीळपणाला संयमाच्या आधारे जिंकले.
तात्पर्य/बोध – क्रोध हा माणसाचा शत्रू आहे. क्रोधामुळे माणूस आंधळा होऊन इतरांवर चिडतो, वाईट बोलतो. इतरांना शत्रू समजायला लागतो. या सर्वांमुळे तो दुःखी होतो. त्यामुळे कोणतेही कारण असले तरी माणसाने क्रोधित होऊ नये, इतरांना अपशब्द बोलू नये.