औरंगजेबाच्या कपटी कैदेतून सुटका करून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक उपाय करून पाहिले, पण कशाचा काहीही उपयोग झाला नाही. काहीही करून नवीन घरात जाण्यापूर्वी सुटकेचा बार उडवून देण्याचा महाराजांनी निश्चयच केला. खूप विचार केला. …आणि आता एक भयंकर, अतिभयंकर धाडसी बेत. खरोखर त्या धाडसाला जगाच्या इतिहासात तोड नाही. असला धाडसी विचार कोणीही, कधीही केला नसेल. असला धाडसी विचार महाराजांनीच करावा आणि त्यांनीच तो प्रत्यक्षात आणावा. एके दिवशी महाराज एकाएकी चक्क आजारी पडले.
काहीही होत नसताना आजारी पडले. प्रकृती बिघडली! महाराज कण्हू लागले. त्यांच्या भोवती असलेले विश्वासू लोक औषधोपचारासाठी धावपळ करू लागले. शहरातले वैद्य, हकीम येऊन उपचार करू लागले. ।फुलादखान, वझीर, सर्व सरदार यांच्या कानांवर ही बातमी आली. औरंगजेबालाही ही बातमी समजली. हळूहळू ही बातमी शहरात सर्वत्र पसरली. फुलादखान अधूनमधून आत यायचा व महाराजांची प्रकृती कशी आहे हे पाहून जायचा. मदारी मेहतर हा सोळासतरा वर्षांचा मुलगा महाराजांची सेवा करीत असायचा. दिवसेंदिवस महाराजांची प्रकृती बिघडत चालली.
दरम्यान महाराजांनी आपल्याबरोबरच्या सर्व लोकांना दक्षिणेत जाऊ देण्याची परवानगी औरंगजेबाकडे मागितली. औरंगजेबाने ती आनंदाने दिली. फटाफट परवाने मिळाले. महाराजांचे मावळे आग्ऱ्यातून बाहेर पडले व दक्षिणेत घराकडे निघाले. आपल्या जवळचे जडजवाहिरेही घरी रवाना करण्याची व्यवस्था महाराजांनी केली. महाराजांचे दुखणे वाढू लागले. आपल्याला गोरगरिबांचा, फकिरांचा, ब्राह्मणांचा व मायेच्या माणसांचा दुवा मिळावा व आपण दुखण्यातून लवकर बरे व्हावे यासाठी सर्वांना मेवामिठाई वाटण्याची परवानगी त्यांनी औरंगजेबाकडे मागितली.
औरंगजेबाने ती लगेच दिली. मग फकिरांना, गोरगरिबांना पेटाऱ्यातून मिठाई वाटावयास जाऊ लागली. पेटारे भरभरून आत जात व महाराजांनी त्यांना हात लावला की ते बाहेर जात. फुलादखानाला व पहारेकऱ्यांनाही मिठाई मिळू लागली. येता-जाता पेटारे तपासले जात. पाच-सहा दिवस गेले. आता तो राबताच सुरू झाला. मग मात्र तपासणीच्या कामात ढिलाई आली. पहारेकऱ्यांनी पेटारे तपासणे बंद केले. आता या ढिलाईचा फायदा घ्यायचाच असे महाराजांनी ठरविले. महाराजांचे दुखणे वाढले किंवा वाढविले. महाराज मृत्यूशीच झुंजत होते. महाराजांची प्रकृती ठीक नाही; म्हणून कोणाचीही ये-जा नव्हती.
महाराज परमेश्वराचे चिंतन करीत होते. आता महाराजांनी अगदी पक्के ठरविले. आता पळायचे. सर्वांना सूचना मिळाल्या. कुणी काय करायचे? कसे करायचे? सगळे ठरले. अगदी गुपचूप. या कानाचे त्या कानाला नाही. नेहमीप्रमाणे पेटारे आले. महाराज पलंगावर झोपले होते… हिरोजी फर्जंद जवळच होता… तो क्षण आला… दोन रिकामे पेटारे आले… हृदये धडधडू लागली… महाराजांनी आपल्या हातातले सोन्याचे कडे काढून हिरोजी फर्जंदच्या हातात घातले… महाराज उठले… एका पेटाऱ्यात बसले व दुसऱ्या पेटाऱ्यात शंभू राजे बसले… पेटारे बंद झाले.
महाराजांच्या पलंगावर हिरोजी फर्जंद झोपला. त्याने शेला पांघरला. तो अगदी शिवाजी महाराजांसारखा दिसत होता. मदारी मेहतर त्याचे पाय चेपत होता. हमालांनी ते दोन्ही पेटारे उचलले. त्यांच्यापुढे आणखी काही पेटारे जात होते. प्रवेशद्वारावर फुलादखानाने हटकले. दोन तीन पेटारे उघडून पाहिले. आत फक्त मिठाईच होती. फुलादखानाने हुकूम दिला. “जाने दो।’ सर्व पेटारे बाहेर पडले. महाराज निसटले! अगदी सहीसलामत सुटले!! अगदी फुलादखानाच्या देखत निसटले!!! तो दिवस होता १७ ऑगस्ट १६६६. दोन पेटारे गावाबाहेर आले. संकेतस्थळी आले. निराजीपंत, दत्ताजीपंत, राघो मित्र इ. सर्व जण आधीच वाट पाहत बसले होते. त्यांनी घोडे सज्ज ठेवले होते. महाराज व शंभूराजे पेटाऱ्यातून बाहेर पडले.
महाराज अगदी खडखडीत बरे झाले होते. बरे व्हायला आजारीच कधी पडले होते? आता प्रत्येक क्षण लाखमोलाचा होता. बोलायला वेळ नव्हता… गरजच नव्हती… सर्व काही अगोदरच ठरले होते… रात्र झाली होती… अंधार पडला होता… महाराज मथुरेस आले. तेथे मोरोपंतांचे मेहुणे कृष्णाजीपंत त्रिमल यांच्याकडे शंभूराजास विश्वासाने हवाली केले. मग सर्वांनी बैराग्याचा वेष धारण केला. भगवी वस्त्रे परिधान केली. जटा-दाढ्या वाढविल्या. सर्व जण अत्यंत वेगाने दक्षिणेच्या मार्गाला लागले. महाराजांजवळ औरंगजेबाचा परवाना सहीशिक्यानिशी होता; त्यामुळे वाटेत काहीच त्रास झाला नाही.
महाराज महाराष्ट्राच्या रस्त्याला लागले. ….आणि इकडे फुलादखान व त्याचे शिपाई पहारा देत होते. ‘हुश्शार! हुश्शाऽऽर!’ शिवाजी महाराज पेटाऱ्यातून पसार झाले. इकडे हिरोजी फर्जंद महाराजांच्या पलंगावर झोपला होता. मदारी मेहतर महाराजांचे पाय चेपीत होता. फुलादखानाने एकदा आत डोकावून पाहिले. महाराज शेला पांघरून झोपले आहेत. मदारी पाय चेपतो आहे हे पाहून तो स्वस्थ झाला. आता अंधार बराच पडला होता.
हिरोजी फर्जंद हळूच उठला. मदारीने व त्याने पलंगावरील उशागिरद्यांना माणूस झोपल्याप्रमाणे आकार दिला. जणू महाराजच झोपले आहेत असे वाटत होते. मग दोघेही बाहेर निघाले. पहारेकऱ्याने काहीतरी विचारले असता. हिरोजी म्हणाला, “महाराजांचे डोके फार दुखत आहे. आम्ही औषध घेऊन येतो. आत कोणालाही पाठवू नये.” असे सांगून ते दोघे बाहेर पडले. पसार झाले. आत रात्रभर महाराज शांत झोपले होते.
दुसरा दिवस उजाडला. सामसूम. शांत! शांत!! – महाराजांच्या खोलीत काहीही हालचाल दिसेना. शिपायांनी कानोसा घेतला. सारे कसे शिपायांना संशय आला. हे फुलादखानास समजताच तो धावतच महाराजांच्या खोलीत गेला. महाराज एकटेच शांत झोपलेले. खानाने महाराजांना हाका मारल्या. एक नाही दोन नाही! महाराज मेले की काय? त्याने जवळ जाऊन तोंडावरचे पांघरुण दूर केले आणि… …आणि काय? फुलादखान भीतीने टणकन वर उडाला व खाली कोसळला. त्याची भीतीने गाळण उडाली.
“शिवाजी भाग गया । पहारे मजबूत थे । जादुगिरी करके, छोटा बनके शिवाजी भगोडा हो गया।” हे ऐकताच औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो भयंकर संतापला. रागाने थयथय नाचू लागला. फुलादखानाला त्याने शिव्यांची लाखोली वाहिली. ताबडतोब दाही दिशांना घोडेस्वार दौडत निघाले. साधू, संन्यासी, फकीर यांना पकडून आणि त्यांचा छळ करून महाराजांचा तपास सुरू झाला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. महाराज आणि त्यांच्याबरोबरचे लोक राजगडाच्या मार्गावर होते. प्रत्यक्ष लढाईतील पराभवाने झाला नसता एवढा मोठा अपमान औरंगजेबाचा झाला होता.
एके दिवशी काही बैरागी राजगडावर आले. दारावर असलेल्या रक्षकांनी त्यांना रोखले व चौकशी सुरू केली. त्या बैराग्यांनी सांगितले, .. “आम्हाला मांसाहेबांची भेट हवी आहे.” मांसाहेबांनी सेवकांना आज्ञा केली, “त्या बैराग्यांना आत पाठवा.” बैरागी राजवाड्यात आले. मांसाहेब थकलेल्या दिसत होत्या. काळजीने त्यांचा चेहरा काळवंडलेला होता. त्या बैराग्यांना नमस्कार करण्यासाठी वाकल्या. तोच त्या बैराग्यांपैकी एक बैरागी पुढे आला व त्याने मांसाहेबांच्या चरणांना मिठी मारली व मांसाहेब’ अशी हाक मारली. अहो, मांसाहेबांवर, साऱ्या महाराष्ट्रावर शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव प्रसन्न झाला होता.
आई भवानीने पूर्ण कृपा केली होती. मांसाहेबांनी बैराग्याचा तो आवाज ओळखला. त्या एकदम म्हणाल्या, “हा तर माझा शिवबा! शिवबा! शिवबा!” मांसाहेबांनी महाराजांना उठवून पोटाशी घट्ट घट्ट धरले. राजगडावर आनंदाचे मेघ बरसू लागले. सर्वांच्या डोळ्यांतून आनंदाच्या कृष्णा, कोयना, गोदा खळाळून वाहू लागल्या. राजगडावर एकच आवाज घुमू लागला. “महाराज आले! महाराज आले!” तोफांचा धडाका सुरू झाला. प्रत्येक तोफ आग्ऱ्याकडे तोंड करून गर्जत होती. ‘अरे औरंग्या, पाप्या! आला, आला! आमचा राजा परत आला! तुला चारी मुंड्या चीत करून आला! महाराष्ट्राचा सिंह परत आला! आता कितीही बोटं मोडलीस, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही!’ तो दिवस होता १२ सप्टेंबर १६६६.
मांसाहेबांनी महाराजांना विचारले, “माझा शंभूबाळ कोठे आहे ?” महाराज म्हणाले “शंभूबाळ गेले! वारले!” महाराज असे मुद्दामच म्हणाले. शंभू राजे वाटेतच मरण पावले अशी खोटी बातमी महाराजांनी अगोदरच दिली होती. औरंगजेबाचे सैनिक गाफील राहावे, म्हणूनच महाराजांनी ही अफवा पसरविली होती. मग मांसाहेबांना एकांतात नेऊन महाराजांनी सांगितले, “शंभूराजे सुखरूप आहेत. मथुरेला कृष्णाजीपंत त्रिमल यांच्याकडे त्यांना ठेवले आहे. जरा वातावरण निवळले की, ते शंभूराजांना अगदी सुखरूपपणे इकडे घेऊन येतील.” काही दिवसांनी हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर राजगडावर परत आले.
महाराजांचे जिवलग, स्वामिनिष्ठ रघुनाथपंत कोरडे व त्र्यंबकपंत डबीर मात्र पकडले गेले. औरंगजेबाने त्यांचा खूप छळ केला, पण काही दिवसांनी सुटका झाल्यावर तेही परत आले. कवींद्र परमानंदही आले. सर्व जण सुखरूप परत आल्यामुळे महाराजांना अतिशय आनंद झाला. जा महाराजांची ही सगळी माणसे म्हणजे स्वामिनिष्ठ, प्रामाणिक देशभक्त होती. श्रींचे राज्य टिकावे, वाढावे यासाठी सर्व जण आत्मबलिदान करावयास निघाली होती.
महाराज आग्ऱ्याहून पळून जाणार आहेत ही गोष्ट एखाद्याने जरी औरंगजेबाला सांगितली असती, तरी औरंगजेबाने त्याचे कोटकल्याण केले असते; परंतु महाराजांनी निवडलेली ही माणसे बावनकशी सोने होती. महाराजांनी सर्वांचे पोटभरून कौतुक केले. सन्मान केला. सर्वांना बक्षिसे दिली. अर्थात, ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ अशी प्रतिज्ञा केलेल्यांना लौकिक बक्षिसांची आवश्यकताच नसते.
महाराजाच्या ह्या अदभुत सुटकेची बातमी हा हा म्हणता देशभर पसरली. लोकाना त्यांच्याबद्दल फार मोठे कुतूहल निर्माण झाले. प्रत्यक्ष परमेश्वराची महाराजांना साथ आहे असे लोक म्हणू लागले. औरंगजेबाला त्याच्या कपटनीतीचे योग्य फळ मिळाले याबद्दल सर्वांना आनंद झाला. महाराजांच्या कीर्तीने व जयघोषाने महाराष्ट्र दुमदुमून गेला. आग्ऱ्यातील ह्या सुटकेने शिवाजी महाराज हे अखिल हिंदूंचे आधार बनले.