Site icon My Marathi Status

नेपाळचे पशूपतिनाथ मंदिर

पूर्वी भारतात असलेला पण आता स्वतंत्र झालेला हा नेपाळ देश. नेपाळ राज्याच्या उत्तरेकडे तिबेट आणि उरलेल्या तीनही दिशांना हिंदुस्थानची भूमी आहे. या राज्याची लांबी ८०० कि.मी. असून रुंदी १८० ते २२० कि.मी. आहे. ‘माऊंट एव्हरेस्ट’ हे सर्वात उंच शिखर तेथे आहे. त्यात उगम पावलेल्या नद्या ही सर्व तीर्थक्षेत्रेच होय.

निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांप्रमाणेच अनेक प्राचीन मंदिरे येथे आहेत. त्यातील पशुपतिनाथ मंदिर बागमती नदीच्याकाठी वसले आहे. पशूपतिनाथाला ज्योर्तिलिंगात स्थान नसले तरी त्याची यात्रा महापुण्यप्रद मानली जाते. नेपाळमध्ये प्रवेश करण्याचे दोन मार्ग आहेत. एक हवाईमार्ग दुसरा रोडद्वारे जाता येते. नियमित बससेवा पण उपलब्ध आहेत. नेपाळ हे स्वतंत्र राष्ट्र असल्याने तेथे प्रवेश करण्यासाठी सरकारी शिक्याचे ओळखपत्र लागते.

पशूपतिनाथ मंदिर उंच चौथऱ्यावर बांधलेले असून त्याला सर्व बाजूंनी पायऱ्या आहेत. हे मंदिर पितळी पत्र्याने मढवलेले असून देवादिकांच्या मूर्तीनी सजवलेले आहे. सभोवती विस्तीर्ण आवार आहे. मंदिराच्या महाद्वारासमोर चौथऱ्यावर खूप मोठा नंदी आहे. या सर्व परिसराला ‘देवपाटण’ असे नांव आहे.

कांजीवरमच्या धर्मदत्त नावाच्या राजाने हे मंदिर निर्माण केले. त्यानंतर बरीच वर्षे होऊन गेली. पूर्वीचे पशुपतिनाथ मंदिर भग्न होऊन जमिनीत लुप्त झाले होते. ते या काळात पुन्हा प्रकट झाले व त्यावर नवीन मंदिर बांधण्यात आले. चतुर्मुख शिवलिंग आहे. व पाचवे मुख शिरोभागी आहे. चार मुखांवर मुखवटे बसवलेले असून मधले मुख शुभ मानले जाते. हे शिवस्थान स्वयंभू म्हणून प्रसिद्ध आहे.

मंदिराचे दरवाजे चांदीचे असून त्यावर विपुल कोरीव काम आढळते. पशपतीने महिषाचे रुप घेतले होते, अशी कथा आहे ती अशी. पांडव शंकराच्या . दर्शनास केदारनाथाला निघाले, पण कुलहत्त्येचे पातक घडलेल्या पांडवांना दर्शन देणे नको, असे वाटन शंकरांनी महिषाचे (रड्याचे) रुप धारण केले व ते जमिनीत जाऊ लागले. भीमाने शेपूट धरले, तेव्हा पांडवांची निष्ठा पाहून शंकरांनी त्यांना दर्शन दिले.

पृथ्वीच्या पोटात घुसलेले महिषाचे मुख नेपाळात पशूपतिनाथ म्हणून प्रगट झाले. श्री पशुपतिनाथाचे दर्शन करण्याचा क्रम दक्षिण मुखापासून प्रारंभ होतो. येथे देवाची नित्य त्रिकाल पूजा होते. अभिषेकानंतर देवाच्या मस्तकावर श्रीयंत्र लिहून त्याची पूजा करतात. प्रत्येक पौर्णिमेला विशेष पूजा असते.

पशूपतिनाथाच्या पुजाऱ्यांना रावळ असे म्हणतात. या पुजाऱ्याची निवड राजगुरुकडून केली जाते. त्यांना उपजिविकेसाठी शेतजमिनी दिल्या जातात. या मंदिराचे शिखर पॅगोडा पद्धतीचे आहे. केदारनाथाच्या नंतर पशूपतिनाथाचे दर्शन केल्याने ती यात्रा संपूर्ण होते. १५ ते १६ सप्टेंबर या काळात साधारणपणे ही यात्रा करतात. महाशिवरात्रीस येथील यात्रेचे विशेष महत्त्व आहे.

Exit mobile version