पन्हाळगडाचा वेढा

‘मी त्या काफर शिवाजीला पकडून आणतो. नाहीतर त्याला ठार मारून त्याचे मस्तक घेऊन येतो अशा वल्गना करणारा देवद्वेष्टा अफजलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीला शिवाजीमहाराजांना भेटावयास नव्हे; पकडावयास नाही, तर ठार मारावयास गेला. आता खानसाहेब शिवाजीला घेऊन विजापुरास येणार, बडीबेगम त्याला कैदेत टाकणार आणि एके दिवशी त्याचा कायमचा काटा काढणार!’ अशी रम्य स्वप्ने स्वत: आदिलशाह व त्याचे सरदार पाहत होते. …आणि एके दिवशी एक हेर धावत आला आणि आदिलशाहला कुर्निसात करून म्हणाला, ‘हजरत ! खानसाहेब गेले.’ हे ऐकताच आदिलशाह खेकसून म्हणाला, “मूर्खा, खानसाहेब गेले ? अरे, कोठे गेले? अरे, ते शिवाजीला पकडायला गेले आहेत ना?” “हजूर! क्षमा करा.

खानसाहेब अल्लाकडे गेले. कायमचे गेले. शिवाजीने खानसाहेबांचे पोट फाडून त्यांना ठार मारले!” तो हेर म्हणाला. हे ऐकताच बादशहावर व बड्या बेगमवर वज्राघात झाला. वीज कोसळली! बादशहा पलंगावर धाडकन कोसळला. बडीबेगम दुःखाने आक्रोश करू लागली. सगळ्या विजापुरावर प्रेतकळा पसरली. अफजलखानाचा पाडाव हा शिवाजी महाराजांच्या अद्भुत करामतीचा प्रचंड, अतिप्रचंड विक्रम होता. पाशवी शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ ठरली. ह्या पुरुषोत्तमाला परमेश्वर साहाय्यक आहे. हा म्हणेल ते सिद्धीस नेईल. ह्याच्याशी विरोध करून कोणाचाही निभाव लागणार नाही.

हीच भावना सगळीकडे पसरली. अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाहीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. सगळे भयभीत झाले होते. याचा फायदा उठविण्याचे महाराजांनी ठरविले. एका क्षणाचीही विश्रांती न घेता महाराजांचे सैन्य पळत सुटलेल्या आदिलशाही सैन्याचा पाठलाग करीत अक्षरश: लांडगेतोड करू लागले. याच वेळी विजापुरात आणखी एक भयंकर बातमी येऊन थडकली. ‘शिवाजीची फौज कोल्हापूरकडे दौडत सुटली आहे. वाईपासून कोल्हापूरपर्यंतचा सगळा प्रदेश ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता तो लवकरच कोल्हापुरात शिरेल.’ हे ऐकताच आदिलशाहला धडकीच भरली.

शिवाजी कोल्हापुरात घुसला की, तो नक्कीच पन्हाळागडावर हल्ला करणार. या विचाराने आदिलशाहला घाम सुटला. …आणि खरोखरच शिवाजी महाराज २५ नोव्हेंबर १६५९ रोजी कोल्हापुरात घुसले. ही बातमी ऐकताच आदिलशाहची छाती धडधडू लागली. महाराजांचा सरनौबत नेताजी पालकर याने गदग, तिकोटे, गोकाक इत्यादी ठाणी लुटली. आता तो विजापुरात घुसणार अशी बातमी येताच, आता काय करायचे? या विचाराने आदिलशाह बेचैन झाला. आता महाराजांचा रोख होता पन्हाळ्याकडे. महाराज आपल्या फौजेसह पन्हाळ्याच्या पायथ्याशी आले. त्यांनी गडाला वेढा घातला.

किल्लेदार बेसावध होता. त्याची कसलीच तयारी नव्हती. गडाला वेढा पडल्याचे समजताच तो गडबडला. वेढा शिवाजीने घातला आहे हे समजताच किल्लेदार आश्चर्यचकित झाला. शिवाजी? मग खानसाहेबांचे काय झाले? त्याला काहीच समजेना. शिवाजी महाराजांनी आज्ञा करताच मराठे तटाला भिडले… माळा करून भराभर तटावर चढले… मराठ्यांचा लोंढा गडात शिरला… भयंकर कापाकापी सुरू झाली… शत्रूचे असंख्य लोक ठार झाले… आणि पन्हाळगड ताब्यात आला. पायथ्याशी असलेल्या महाराजांना विजयाची बातमी समजली. महाराज गडावर गेले. त्या वेळी मध्यरात्र झाली होती.

महाराजांनी मशालीच्या प्रकाशात गड फिरून पाहिला. त्याच वेळी नेताजी पालकर याने आदिलशाहीचा सगळा मुलूख उघडा करून प्रचंड लूट मिळविली व ती लूट घेऊन तो गडावर आला. गडावर उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता. अफजलखानाला ठार मारल्यापासून केवळ अठरा दिवसांत वाईपासून पन्हाळ्यापर्यंतचा मुलूख शिवाजी महाराजांच्या हाती आला. वसंतगड, वर्धनगड, क-हाडचा कोट, मच्छिंद्रगड, कल्याणगड इत्यादी गड मराठ्यांच्या ताब्यात आले. अफजलखानाचा वध झाल्यामुळे त्याचा मुलगा फाजलखान भयंकर संतापलेला होता. त्याला शिवाजी महाराजांवर सूड उगवायचा होता.

शिवाजीचा नाश हे त्याचे स्वप्न होते. त्याच्या जोडीला मिळाला आणखी एक समदुःखी सरदार. त्याचे नाव रुस्तुमेजमान. रायबाग, कोल्हापूर, राजापूर व कारवार ह्या मुलखाची जाहगिरी रुस्तुमेजमानची होती. शिवाजी महाराजांनी त्याच्या या जहागिरीवरच हल्ला केला होता; म्हणून तोही संतापलेला होता. शिवाजीला नेस्तनाबूद करण्यासाठी त्याच्यावर स्वारी करण्याची परवानगी त्या दोघांनी आदिलशाहकडे मागितली. आदिलशहाने तशी परवानगी लगेच दिली. मग फाजलखान व रुस्तुम इतर सरदारांना बरोबर घेऊन दहाहजार फौज, हत्ती, तोफा, उंट इत्यादी घेऊन निघाले.

फाजलखान आणि रुस्तुम फार मोठी सेना घेऊन आपल्याला नेस्तनाबूद करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने निघाले आहेत हे महाराजांना हेरांकडून समजले. त्या वेळी महाराज पन्हाळगडावर होते. गडाला शत्रूचा वेढा पडला, तर आपण नाहक अडकून पडू त्यापेक्षा शत्रूला वाटेतच गाठावे व चोपून काढावे असा विचार करून महाराज आपले सैन्य व नेताजी यांच्यासह गडाबाहेर पडले आणि शत्रू कोल्हापूरला येण्यापूर्वीच त्यांनी लपत छपत जाऊन शत्रूला गाठले. दोन्ही सैन्ये समोरासमोर आली. स्वतः महाराज मराठी फौजेच्या आघाडीवर होते. त्यांची भवानी तलवार वाघिणीच्या जिभेप्रमाणे लवलवत होती.

महाराजांनी आदेश देताच मराठ्यांनी एकदम हाणामारी सुरू केली. दोन्ही सैन्यांचे घनघोर युद्ध सुरू झाले. धुळीचे ढग आकाशाला भिडले… जोरात खणाखणी सुरू झाली… शत्रूची मुंडकी चेंडूसारखी उडू लागली… शत्रूचे सैनिक शस्त्रे टाकून पळत सुटले… मराठ्यांच्या रेट्यांपुढे फाजलखानचा निभाव लागेना… भीतीने त्याची गाळण उडाली… शेवटी तो आपल्या सेनेसह युद्ध टाकून पळत सुटला. फाजलखान पळत सुटला हे पाहून रुस्तुमही युद्ध टाकून पळू लागला. ही लढाई महाराजाना मोठी फायद्याची ठरली. बादशाही फौजेचा साफ पराभव झाला.

महाराजांना शत्रूचे दोन हजार घोडे, बारा हत्ती आणि अवांतर खूप मोठा माल मिळाला. फाजलखान आणि रुस्तुम शिवाजी महाराजांच्या हातचा चोप खाऊन पळून आले हे समजताच आदिलशाह अगदी हवालदिल झाला. आता पुढे काय करायचे या विचारात पडला. आदिलशाही विरुद्ध मराठ्यांनी अक्षरश: झंझावात सुरू केला होता. बघता बघता विशाळगडापर्यंतचा मुलूख मराठ्यांच्या ताब्यात आला. प्रचंड लूट हाती आली. शिवाजी! शिवाजी! आणि शिवाजी! आदिलशहाने ‘शिवाजी’ नावाचा धसका घेतला.

आता या शिवाजीला कोण रोखणार? याला पायबंद कोण घालणार? आणि… आदिलशाहला माणूस मिळाला, तेलंगणातील कर्नूळ येथील सरदार सिद्दी जौहर! सिद्दी जौहर म्हणजे मूर्तिमंत पराक्रम ! विलक्षण कर्तृत्वाचा सेनापती! आदिलशाहने सिद्दी जौहरला विजापुरात आणले. त्याचा मोठा गौरव करून त्याला सलाबतखान’ हा किताब दिला. त्याच्याकडे शिवाजीची मोहीम सोपविली. सिद्दी जौहर तीस-चाळीस हजार सैन्य, प्रचंड दारुगोळा आणि स्वतःचा जावई सिद्दी मसूद, सादतखान, मुधोळकर, बाजी घोरपडे, फाजलखान इत्यादी सरदारांसह शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी निघाला.

महाराजांना ही बातमी समजली त्या वेळी ते मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला वेढा घालून बसले होते. सिद्दी जौहरकडे प्रचंड सेना आहे. तिला उघड्या मैदानात तोंड देणे शक्य नाही असा विचार करून महाराज मिरजेचा वेढा उठवून पन्हाळगडावर दाखल झाले. सिद्दी जौहर आपली प्रचंड सेना घेऊन मजल-दरमजल करीत पन्हाळ्याकडे निघाला. शिवाजी पन्हाळगडावर आहे ही खबर त्याला होतीच तथापि, एकदम हल्ला करून गड जिंकणे शक्य नाही हे ओळखून त्याने गडाला वेढा घालून शिवाजी शरण येईपर्यंत झुंज देत राहावयाचे असे ठरविले.

गडावरील अन्नधान्य व चारा संपला की, शिवाजी शरण येईल तोपर्यंत वेढा चालूच ठेवायचा असे त्याने पक्के ठरविले. त्यातून त्याने युद्ध करावयाचे ठरविले, तर त्याला ठार मारावयाचे किंवा पकडायचे असा जौहरचा डाव होता. बघता बघता तीन महिने झाले. पावसाळा आला. मुसळधार पाऊस सुरू झाला, पण जौहरचा वेढा सैल होण्याचे लक्षण दिसेना. उलट, राजापूरचा इंग्रज हेन्री रेव्हिंग्टन तोफा व तोफगोळे घेऊन जौहरच्या मदतीला आला. शाहिस्तेखानानेही स्वराज्यात धुमाकूळ सुरू केला.

चार महिने झाले. गडावरील दाणागोटा संपत आला. घोड्यांची वैरणही संपत आली. जौहरने वेढा अधिकाधिक कडक केला होता. वेढ्यातून आत बाहेर जाणे येणे मुंगीलाही शक्य होत नव्हते. महाराज मोठ्या काळजीत पडले. शत्रूच्या वेढ्यातून बाहेर कसे पडायचे याचा विचार करू लागले. आणि एके दिवशी पहाटेच्या वेळी महाराजांना रामवरदायिनी भगवती तुळजाभवानीचा दृष्टान्त झाला.

महाराज जागे झाले. त्यांना एक विलक्षण, अद्भुत प्रेरणा मिळाली. गडावर फार काळ राहणे त्यांना धोक्याचे वाटले. आता काहीही करून गडातून बाहेर पडण्याचा त्यांनी पक्का निश्चय केला. यात मोठा धोका होता, पण तुळजाभवानीवर भरवसा ठेवून अत्यंत भयंकर धाडस करण्याचे त्यांनी ठरविले. शत्रूच्या वेढ्यातून सटकायचेच, पसार व्हावयाचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: