पंढरपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील कुडुवाडी या गावापासून ५० कि. मी. अंतरावर आहे. याला पंढरी, पंढरपूर, पांडुरंगपूर, पांडुरंगपल्ली अशी नांवेसुद्धा आहेत. हे क्षेत्र चंद्रभागा नदीतीरावर आहे. या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ देव पांडुरंग मूर्तीरुपात राहात आहे. म्हणून पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्तीसंप्रदायाच्या आद्यपीठाने गौरविले.
विठ्ठलभक्त ज्ञानेश्वर, नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, कान्होपात्रा, बहिणाबाई, एकनाथ, तुकाराम, सेना न्हावी इत्यादी संतांनी पंढरीचा महिमा काव्यातून वर्णिला असून संत तुकाराम पंढरीचे माहात्म्य थोडक्यात वर्णन करताना म्हणतात की, ‘तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला !’ फक्त एकदाच पंढरीनाथाचे दर्शन घेतल्यामुळे मोक्ष मिळतो ही केवढी अपार श्रद्धा.
हीच श्रद्धा प्रत्येक वारकऱ्याजवळ असते. कारण भक्ताला उराउरी भेटणारा असा हा एकच देव आहे. या देवाला सारेजण माऊली’ म्हणतात. अशा या विठ्ठलाचे-माऊलीचे मंदिर पंढरपूर क्षेत्री गावाच्या मध्यावर उंचभागी पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी ३५० फूट असून दक्षिणोत्तर रुंदी १७० फूट आहे. पूर्वद्वाराला नामदेव दरवाजा किंवा महाद्वार म्हणतात.
या दरवाजाच्या पहिल्या पायरीला नामदेवाची पायरी म्हणून ओळखतात. तेथे एक मोठा वटवृक्ष असून त्याच्या बाजूला तेहतीस कोटी देवांचे मंदिर आहे. त्यापुढे मंडप असून तो कमानींवर आधारलेला आहे. मंडपाच्या अखेरीस डाव्या बाजूला गणेशाची मूर्ती पाहावयास मिळते. या मंडपावर देवाचा नगारखाना आहे. तेथे एक मोठा फरसबंदी मंडप उतरल्यावर संत प्रल्हादबुवा बडवे व कान्होबा हरिदास यांच्या समाध्या असून दोन दीपमाळा दृष्टीस पडतात. या मंडपात गरुडाचे व समर्थ स्थापित उभा मारुती आहे.
या मंडपातून वर गेलात की, एक दालन लागते. याच दालनांतून आत जायला तीन दरवाजे आहेत. मधला दरवाजा पितळी पत्र्याने मढवला आहे आणि त्याच्या डाव्या-उजव्या बाजूंना जय-विजयाच्या मूर्ती आहेत. चौखांबी मंडपातून पुढे गेल्यावर कमानीजवळ गर्भागाराचा दरवाजा लागतो. या गर्भागाराची दर्शनी भिंत चांदीच्या पत्र्याने मढविली असून दरवाजातून आत गेलो म्हणजे भिंतीला लागून एक रुपेरी प्रभावळ आहे. त्या प्रभावळीच्या आत विटेवर विठ्ठलमूर्ती उभी आहे.
रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यानजीकच्या दालनात प्रवेश करताना सत्यभामा व राही यांची छोटी मंदिरे लागतात. रुक्मिणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. तेथे मंदिराचा गाभारा, मध्यगृह, मुख्यमंडप व सभामंडप असे भाग आहेत. मध्यगृहाच्या उत्तरेकडील भिंतीत एक खोली असून ते रुक्मिणीचे शेजघर आहे.
श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या उपचारांचे नित्य व नैमित्तिक असे दोन भाग आहेत. त्यापैकी नित्योपचारात काकड आरती, पंचामृतपूजा, मध्यान्हपूजा, अपरान्हपूजा, धुपारती व शेजारतीचा भाग येतो. देवाला बुधवारी व शनिवारी अभ्यंग स्नान घालतात. एकादशीला फराळाचा नैवेद्य देवीला असतो. त्यादिवशी शेजारती नसते. धर्नुमासात देवाला खिचडीचा नैवेद्य असतो.
उन्हाळ्यात उपहाराकरीता फळे, पन्हे व तांबूल देतात. थंड पाणी असते. गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव करतात. वद्य प्रतिपदा आणि कार्तिक वद्य प्रतिपदेला काला असतो. त्यावेळी हरिदास उपनामक सेवकाच्या डोक्यावर देवाच्या पादुका बांधतात. दहीहंडी फोडली जाते. गुढीपाडवा, नवरात्र, दसरा, बलिप्रतिपदा या दिवशी हिरा-माणकांचे दागिने घातले जातात. पंढरपूरी आषाढी-कार्तिकी या मोठ्या यात्रा भरतात. टाळ-मृदुंगाच्या गजरात अलोट भक्तीचा महापूर उसळलेला पहावयास मिळतो.