Site icon My Marathi Status

त्रावणकोरच्या राजघराण्याचे कुलदैवत पद्मनाभस्वामी मंदिर

केरळ म्हणजे एक चिंचोळी पट्टीच आहे. केरळ प्रांत हिरवाई निळाईचा आहे. तिरुअनंतपुरम् (त्रिवेंद्रम्) ही केरळची राजधानी असून प्राचीन काळी या प्रदेशाला भागविक्षेत्र म्हणत. येथील हिंदू शिव, विष्णू व देवीचे उपासक होते. पद्मनामस्वामी हे त्रावणकोरच्या राजघराण्याचे कुलदैवत. सन १७५० मध्ये मार्तंड वर्मा नामक राजाने आपले राज्य समारंभपूर्वक श्रीचरणी अर्पण केले. तेव्हापासून राजघराण्यातील राजे आपणास श्री पद्मनाभदास म्हणवून घेऊ लागले.

आपले राज्य हे देवाचे राज्य असून आपण केवळ त्याचे प्रतिनिधी आहोत, अशा समजुतीने ते राज्य करु लागले. . महाभारतात या क्षेत्राचा उल्लेख आहे. अनेक पुराणात या क्षेत्राच्या माहात्म्यकथा प्रसिद्ध आहे. त्यापैकी एक कथा अशी आहे. प्राचीन काळी इथे अनंतवन नावाचे अरण्य होते. तेथे पुलया आदिवासी राहात होते.

इथून जवळच्या नगरात एक दिवाकर नावाचा विष्णूभक्त राहात होता. त्याच्या भक्तीवर मोहित होऊन भगवान विष्णू बालकाच्या रुपाने त्याच्या घरी राहू लागले. काही दिवसान ते बालक अंतर्धान पावले. त्यावेळी त्याने दिवाकरला म्हटले की, “माझे पुनश्च दशन घ्यायचे असेल, तर अनंतवनात ये.’ आपल्या घरी साक्षात् भगवान विष्णू बालकाच्या रुपाने राहात होते, हे समजल्यावर तो अत्यानंदित होऊन त्याच्या शोधार्थ अनंतवनाकडे निघाला.

इकडे एका कनक वृक्षाखाली देव बालकाच्या रुपाने प्रकट झाले होते. तिथे एक पुलया स्त्री त्याला नारळाच्या करवंटीतून तांदूळाची खीर पाजीत असे. दिवाकर अनंतवनात पोहोचला. त्यावेळी ते बालक कनकवृक्षाच्या ढोलीत प्रवेश करताना दिसले. त्या बालकाने आत प्रवेश करताच तो वृक्ष कोसळून पडला. त्या कोसळलेल्या वृक्षाच्या जागी दिवाकराला शेषशायीची सहा कोस लांब अशी विराटमूर्ती दिसली.

दिवाकराने त्याला लघुरुप स्वीकारण्याची विनंती केली. दिवाकराला ज्या ठिकाणी विराट रुपाच्या नाभिकमळाचे दर्शन झाले तेथे त्याने मंदिर उभारले आणि कनक वृक्षाच्या लाकडाची मूर्ती तयार करुन तिची स्थापना केली. काही वर्षानंतर मूळचे हे मंदिर आणि काष्ठमूर्ती जीर्ण झाल्यावर, इ. स. १४०९ मध्ये विशाल मंदिर बांधले. याच वेळी बारा हजार शाळिग्राम आत ठेवून कटूशर्करा योगाने अनंत पद्मनाभाची मूर्ती बनविण्यात आली.

बालरुपी विष्णूला पुलया स्त्री करवंटीतून खीर पाजीत असे. अशी पुराणात कथा असल्यामुळे, आजही नैवेद्याची तीच प्रथा चालू आहे. त्रिवेंद्रम् हे समुद्रकिनाऱ्यापासून ३.२ कि. मी. अंतरावर असून तेथे एक किल्ला आहे. या किल्ल्याच्या परकोटच्या आत अनंतपद्मनाभाचे मंदिर आहे. मूळचे मंदिर जीर्ण झाल्यावर इ. स. १०४९ मध्ये सध्याचे विशाल मंदिर उभे राहिले. श्री विष्णूच्या १०८ दिव्यदेश मंदिरांपैकी ते एक आहे.

मंदिराभोवती असलेला ३६६ दगडी स्तंभांचा खुला प्रदक्षिणामार्ग हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर म्हणजे दक्षिण भारतीय शिल्पाचे उत्तम उदाहरण मानण्यात येते. गर्भगृह व देवता हे मंदिर विशाल असून, त्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमूख आहे. गर्भगृह काळ्या कसोटीच्या दगडांनी बांधलेला आहे. गर्भगृहात शेषशायी विष्णूची प्रचंड मूर्ती असून त्याच्या नाभीतून निघालेल्या कमळावर ब्रह्मा विराजमान आहेत. त्याची लांबी १८ फूट असून भगवान विष्णूची सर्वात मोठी मूर्ती आहे.

गर्भगृहात फक्त मंद दिवे प्रज्वलीत असतात. पहुडलेल्या मूर्तीचे तीन वेगवेगळ्या द्वारातून दर्शन घ्यावे लागते. या मंदिरात प्रतिदिनी सायंकाळी चार वाजता देवळाच्याभोवती विष्णूची मिरवणूक काढली जाते. या मंदिराच्या आवारात सीता-राम-लक्ष्मण व हनुमान यांची मंदिरे आहेत. याच आवारात श्रीकृष्णाचे मंदिरपण आहे.

इथे वर्षातून दोन वेळा देवाचा उत्सव साजरा होतो. उत्सवाच्या दिवशी गावातून मिरवणूक निघते. त्यावेळी येथील महाराज अर्थात् माजी संस्थानिक भाग घेतात. पुरुषांनी देवळात फक्त धोतर वा वेष्टी नेसून आणि उत्तरीय न पांघरता प्रवेश करावयाचा असतो. तर स्त्रियांना साडी नेसून प्रवेश करावयाचा असतो. हे एक वैष्णव क्षेत्रही आहे.

Exit mobile version