नृसिंहवाडी नरसोबाचीवाडी

श्री भगवंतांनी नाना अवतार धारण करुन भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत. सर्व अवतारात श्रीदत्त अवतार श्रेष्ठ आहे. अत्री महामुनीच्या पोटी ब्रह्मा, विष्णू, महेशश्वराने एकरुप होऊन श्रीदत्त रुपाने अवतार धारण केला. त्यातील नरसिंह सरस्वती दत्त नरसोबावाडीत गुप्त रीतीने राहून देवताकडून सेवा घेत राहिले.

वाडी म्हणजे दत्ताची राजधानी, श्री नरसोबाचीवाडी एक परमपावन सुंदर महाक्षेत्र असून हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागृत दत्तस्थान आहे. मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरच्या जयसिंगपूर स्थानकापासून १२ कि. मी. वर आहे. कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर हे क्षेत्र वसले आहे. या ठिकाणी नरसिंह सरस्वतीचा बारा वर्षे मुक्काम होता. गुरुचरित्रांमध्ये अमरापूर या नावाने या स्थानाचा महिमा वर्णिला आहे.

या ठिकाणी स्वयं दत्तात्रयांचे वास्तव्य आहे. कृष्णेच्या एक्कावन्न पायऱ्यांच्या भव्य घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षातळी सुंदर शिलामय मंदिर असून तेथे भगवंतांनी स्वयंभू श्यामसुंदर पादुकांचे स्वरुपाने वास्तव्य केले आहे. रोज माध्यान्हकाळी या पादुकांची पूजा होते. मंदिराच्या मागे औदुंबराचा एक पार आहे. घाटाच्या शेवटच्या टप्प्यावर टेंबेस्वामी यांचे स्मृतीमंदिर आहे. त्यामागे श्रीरामयोगी यांची समाधी आहे. तसेच गोपाळस्वामी, मौनीस्वामी, काशिकर स्वामी यांची स्मारके असून कृष्णेचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला असे सांगतात.

चार्तुमासाचा अपवाद वगळता येथे दर शनिवारी श्रींची पालखी निघते. तेथे शनिवार हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण श्री गुरु नृसिंह सरस्वती (नरसोबा) यांचा शनिवार हा जन्मदिवस आहे. तसे पाहिले तर या ठिकाणी वर्षभर यात्रा सुरुच असते. वर्षातील प्रत्येक पौर्णिमेला दत्तदर्शनाला येणाऱ्या वारकरी भक्तांची संख्या पुष्कळ असते. या दत्तक्षेत्रांत पुजारी वर्गाने परंगरागत अशी एक सर्वोपकारक वहिवाट चालू ठेवली आहे.

श्री दत्त महाराजांच्या त्रिकाळ पूजा काळीच मंदिरात झांजा व घंटा वाजवावयाची असते. त्यामुळे या परिसरात बसून जप, ध्यान, पूजन, वाचन करणाऱ्या भक्तांना स्वस्थ चित्ताने चिंतन करता येते. भाविक लोक आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून गुरुचरित्राची पारायणे किंवा सप्ताह करतात. मनोकामना विषयी काही कथा आहेत.

विजापूर बादशहाचे डोळे काही कारणामुळे जाऊन तो आंधळा झाला होता. त्याला बिदरच्या बादशहाने सुचविले की तुम्ही जाऊन वाडीत नवस करा, म्हणजे नृसिंह सरस्वती तुमची इच्छा पूर्ण करील. त्याप्रमाणे त्याने वाडीस येऊन नवस केला की, ‘प्रभूनी मला डोळे दिल्यास मी दोन गांवे प्रभूना अर्पण करीन.’ चमत्कार असा की, दत्तापुढील अंगारा बादशहाने कपाळी लावताच त्यांना दिव्य दृष्टि प्राप्त झाली.

श्री गुरुंचे स्मरण करुन नवस केल्याप्रमाणे औरवाड व गौरवाड ही गावे इनाम दिली. पुजारी हे त्या गावाचे वहिवाटदार झाले व त्यांनी देवाचे दगडी मंदिर बांधले. पायऱ्या बांधून नदीचा घाट बांधला. त्या अरण्यात हळूहळू वस्ती होऊ लागली. पुढे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी म्हणून नांव पडले. पुष्कळ लोकभूतबाधा झालेल्या लोकांना येथे श्रीगुरुच्या ठिकाणी सेवेसाठी आणतात.

संध्याकाळी आरतीच्यावेळी धुपाचा वास दरवळला की, भूतबाधा झालेली माणसे घुमू लागतात. दत्तजयंती, गुरुद्वादशी इत्यादी सांप्रदायिक उत्सव मोठ्या प्रमाणात होतात. यात्रेकरु दत्ताला पेढा, खव्याची बर्फी व कवठाची बर्फी इत्यादी जिन्नस अर्पण करतात. श्री नरसिंह सरस्वती माघ वद्य प्रतिपदेला श्रीशैलला गेले. त्यादिवशी गुरुप्रतिपदेचा उत्सव सर्व क्षेत्रांतून होत असतो. येथेही तो होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: