हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी । Narali Purnima information in marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – रक्षाबंधन
नारळी पौर्णिमा मराठी । Narali Purnima information in marathi
श्रावण महिन्यातील पौर्णिमा हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. विशेषतः समुद्रकिनारी राहणारे लोक हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. वरुण ही समुद्रदेवता आहे. ज्यांचे जीवन सागरावर अवलंबून आहे, ते लोक या दिवशी वरुणदेवतेची पजा करून तिला प्रसन्न करतात. समुद्राला नारळ अर्पण केला जातो. त्या वेळी –
नमस्ते विश्वगुप्ताय नमो विष्णो अपांपते ।
नमो जलाधिरूपाय नदीनां पतये नमः ।।
अशी सागराची प्रार्थना करावयाची असते. समुद्रावर सत्ता असलेल्या वरुणदेवतेने समुद्रातून मालाची वाहतूक करणाऱ्या नावा, जहाजे समुद्रात बुडवू नयेत, त्यांचे नुकसान करू नये, यासाठी समुद्रदेवतेची पूजा करावयाची. समुद्रकिनाऱ्यावर नारळाचेच उत्पन्न मोठे असते म्हणून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. लोहाणा जातीचे लोक समुद्रालाच आपला देव मानून या दिवशी त्याची पूजा करतात. श्रावण पौर्णिमेअगोदर पावसाचा जोर मोठा असतो. समुद्राला उधाण येते. समुद्रात पर्वतप्राय लाटा उठत असतात. समुद्र खवळलेला असतो. या काळात कोणीही समुद्रात नावा घालीत नाहीत.
समुद्रमार्गे होणारा व्यापार बंद असतो. मच्छिमार कोळी लोक मासे पकडण्यासाठी समद्रात जात नाहीत. श्रावण पौर्णिमेच्या सुमारास सागर शांत होऊ लागतो. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तो बराच शांत होतो. मग गलबतांतून, नावांतून माणसांची, मालाची ने-आण पुन्हा सुरू होते. म्हणून सर्वप्रथम सागराची पूजा केली जाते. समुद्रदेवतेने आमच्यावर रागावू नये, आम्हाला संकटात टाकू नये, आमचा व्यापार चांगला चालावा.
समुद्रातून प्रवास करताना आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून मग नावा, गलबते, होड्या समुद्रात लोटल्या जातात. त्यामुळे नारळी पौर्णिमा हा समुद्रावरील साहसी व्यापाऱ्यांचा सण समजला जातो. अतिप्राचीन काळी भारतीयांनी समुद्रमार्गे अनेक देशांशी संबंध ठेवला होता. इजिप्त, ग्रीस, लंका, ब्रह्मदेश, चीन, जावा, सुमात्रा इत्यादी अनेक देशांत समुद्रमार्गे जाऊन भारतीय लोक व्यापार करीत असत व आपल्या देशाची संपत्ती वाढवीत असत. त्याचप्रमाणे अनेक लोक समुद्रमार्गे परदेशी जाऊन आपल्या कला, तत्त्वज्ञान, धर्म, देवता इत्यादींचा प्रचार-प्रसार करीत असत.
अशा साहसी, वीर भारतीयांची, दर्यावर्दीची स्मृती जागविण्यासाठी हा नारळी पौर्णिमा सण साजरा केला जातो. समुद्र हा तीर्थराज आहे. ‘सागरे सर्व तीर्थानि.’ सर्व नद्यांच्या प्रवाहातून येणारी घाण आपल्या पोटात घेणारा सागर स्थितप्रज्ञ आहे. संत-सत्पुरुष आहे. समुद्राच्या पोटात अनंत रत्ने आहेत. तो मर्यादापुरुष आहे. चंद्राला ज्याच्यापासून प्रकाश मिळतो त्या सूर्याला समुद्र आपली संपत्ती देतो. त्यामुळेच आपल्याला गोड पाणी मिळते. अशा या परोपकारी सागराचे आपल्या जीवनात फार मोठे स्थान आहे.
म्हणूनच श्रावण पौर्णिमेला समुद्राची पूजा करावयाची असते. या दिवशी मुंबई, रत्नागिरी, मालवण, गोवा, इत्यादी ठिकाणी मोठी जत्राच भरते. लोकांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. या दिवशी कित्येक लोक समुद्राला चांदीचा नारळसुद्धा अर्पण करतात. जेथे समुद्र नाही तेथील लोक या दिवशी नदीला नारळ अर्पण करतात. या दिवशी भोजनात नारळीभात हे पक्वान्न केले जाते. या दिवशी संस्कृत दिन साजरा केला जातो. संस्कृत ही आपली प्राचीन भाषा. सर्व भारतीय भाषांची ती जननी आहे. संस्कृत ही ज्ञानभाषा आहे.
आपले वेद, उपनिषदे, पुराणे, नाटके, काव्ये, महाकाव्ये, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. अनेक शास्त्रीय ग्रंथ संस्कृत भाषेत विपुल प्रमाणात आहेत. हे आपले फार मोठे धन आहे. ते जतन करणे, संवर्धन करणे आपले पवित्र कर्तव्य आहे. या भाषेचे महत्त्व सर्वांना कळावे, या भाषेचा अभ्यास करण्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळा-महाविद्यालयांत, विद्यापीठांत व अनेक सांस्कृतिक संस्थांत या दिवशी संस्कृत दिन साजरा केला जातो.
संस्कृतमधून भाषणे, कथाकथन, संवाद, नाट्यप्रयोग, परिसंवाद इत्यादी कार्यक्रम केले जातात. संस्कृत दिन हा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी राज्य शासनातर्फे व केंद्र शासनातर्फे वैदिक पंडितांचा सत्कार केला जातो. प्राचीन काळी याच दिवशी वेदाध्ययनाला प्रारंभ होत असे. म्हणून या शुभ दिवशी संस्कृत दिन साजरा केला जातो. ज्यांचे उपनयन म्हणजे मुंज झाली आहे, ते लोक या दिवशी विधिपूर्वक नवीन यज्ञोपवित धारण करतात व गायत्री मंत्राचा जप करतात. या विधीला श्रावणी असे म्हणतात. अशा अनेक कारणांमुळे भारतीय संस्कृतीत या नारळी पौर्णिमेला फार महत्त्व आहे.
काय शिकलात?
आज आपण नारळी पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी । Narali Purnima information in marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.