हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला नागपंचमी माहिती, इतिहास मराठी । Nag Panchami Information in Marathi मराठीत सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – मंगळागौरी
नागपंचमी मराठी | Nag Panchami Information in Marathi
श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी असे म्हणतात. हा सण मुख्यतः स्त्रियांचा आहे. भारताच्या सर्व भागात या दिवशी नागाची पूजा करतात. आपल्या महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळे या गावात तर हा सण फार मोठा असतो. खूप मोठी यात्रा भरते. नाग विषारी असला तरी आपण त्याला देव मानले आहे.
नाग शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतीचे रक्षण करतो. म्हणून त्याच्याविषयी आदर दाखविण्यासाठी नागपंचमीच्या सणाची थोर परंपरा सांगणारी प्रथा सुरू झाली. फार वर्षांपूर्वी येथे नाग नावाचे लोक होते. या नाग लोकांचे व भारतातील आर्य लोकांचे सारखे झगडे होत असत.
युद्धे होत असत. मग आस्तिक ऋषींनी नाग व आर्य यांचे भांडण मिटविले. सगळ्यांना आनंद झाला. या आनंदाचे स्मरण म्हणून नागपंचमी साजरी करण्यात येते. या दिवशी मातीच्या नागमूर्तीची किंवा आपल्या देवघराच्या बाहेरच्या भिंतीवर काही भाग गोमयाने-गाईच्या शेणाने सारवून त्यावर पिवळ्या मातीने किंवा चंदनाने नागाची आकृती काढून तिची पूजा करावयाची असते.
काही लोक गहू आणि तांदूळ यांच्या पिठाची नागमूर्ती तयार करतात. किंवा पाटावर रक्तचंदनाने नागमूर्ती काढतात व तिची पूजा करतात. महाराष्ट्रात मात्र चिखलापासून तयार केलेल्या नागमूर्तीची पूजा करतात. नवनागदेवता किंवा अनंतादिनागदेवता असे या देवतेचे नाव आहे. दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी नागाची पूजा करावयाची असते. नागाला दुर्वा, आघाडा, दूध व लाह्या या वस्तू आवडतात. म्हणून पूजेत या वस्तू असाव्या लागतात. नागाला दूध, लाह्याचा नैवेद्य दाखवितात. पूजा झाल्यावर नागदेवतेची
श्रावणे शुक्ल पंचम्यां यत्कृतं नागपूजनम् ।
तेन तृप्यन्तु मे नागा भवन्तु सुखदाः सदा ।।
अशी प्रार्थना करावयाची असते. घरात नागपूजा केल्यावर ज्या ठिकाणी सर्प राहण्याचा संभव असतो अशा घराजवळच्या वारुळाला गंध, फुले वाहून तेथे दुधाचा नैवेद्य ठेवण्याची चाल पुष्कळ ठिकाणी आहे. नागपूजा केल्यामुळे सर्पबाधा होत नाही, अशी लोकांची श्रद्धा आहे.
नागपंचमीच्या दिवशी नागपूजा का करतात याविषयी एक कथा आहे. ती अशी एका गावात एक व्यापारी होता. त्याला सापांचा अतिशय राग येत असे. म्हणून त्याने दिसेल त्या सापाला ठार मारण्यास सुरुवात केली. त्याने अनेक साप ठार मारले. त्यामुळे शेषनागाची बहीण मनसादेवी हिला त्या व्यापाऱ्याचा अतिशय राग आला.
त्या व्यापाऱ्याच्या सहा मुलांना सापांनी दंश करून ठार मारले. त्यानंतर त्या व्यापाऱ्याला आणखी एक सातवा मुलगा झाला. हा मुलगासुद्धा सर्पदंशाने मरेल असे एकाने भविष्य सांगितले. तो मुलगा मोठा झाला. त्याचे लग्नही झाले. त्या व्यापाऱ्याने त्या मुलाच्या रक्षणासाठी लोखंडी महाल बांधला. बाहेर रक्षक ठेवले. परंतु एक दिवस सर्वांना चकवन एक साप त्या लोखंडी महालात शिरला. त्याने त्या मुलाला दंश करून ठार मारले.
त्याची पत्नी अतिशय शोक करू लागली. शेवटी आपला पती परत मिळावा म्हणून तिने मनसादेवीची पूजा करून तिची प्रार्थना केली. त्यामुळे मनसादेवी प्रसन्न झाली. तिचा पती जिवंत झाला तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी. त्या दिवसापासून नागपूजा सुरू झाली. नाग घरी-दारी, शेतात, कुठेही असू शकतो. म्हणून नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतात नांगर कुळव घालत नाही.
जमीन उकरत नाही. गवत वगैरे काहीही कापत नाही. नाग ही क्षेत्रदेवता आहे. म्हणून त्याला त्रास होईल असे काहीही करावयाचे नसते. यासंबंधी एक कथा आहे. मणिपूर नावाच्या एका गावात एक शेतकरी होता. एकदा नागपंचमीचा दिवस असताना त्याने आपल्या शेतात नांगर घातला. त्या शेतात एक वारूळ होते. नांगर त्या वारुळावरून गेला. त्यामुळे त्या वारुळातील सर्पाची पिले मारली गेली. त्या वेळी त्या पिलांची आई-सीण बाहेर गेली होती. काही वेळाने ती परत आली.
आपली पिले शेतकऱ्याच्या नांगराने मारली गेली आहेत हे पाहताच संतापलेल्या त्या नागिणीने त्या शेतकऱ्यावर सूड उगवायचे ठरविले. ती त्या शेतकऱ्याच्या घरी गेली व तिने सर्वांना दंश करून ठार मारले. त्या शेतकऱ्याची एक मुलगी परगावी होती. तिलाही ठार मारण्यासाठी ती सीण तिच्या घरी गेली. त्या दिवशी नागपंचमी असल्यामुळे शेतकऱ्याची मुलगी घरात नागाची पूजा करीत होती. ती नागपूजा पाहून सीण शांत झाली. तिने त्या मुलीला सर्व काही सांगितले. त्या मुलीला फार वाईट वाटले.
आपले सर्व लोक पुन्हा जिवंत व्हावेत यासाठी तिने उपाय विचारला. त्या मुलीची नागभक्ती पाहून त्या सर्पिणीचा राग गेला. ती प्रसन्न झाली. तिने त्या मुलीला अमृताचा कुंभ दिला. मरण पावलेल्या माणसांवर ते अमृत शिंपडण्यास सांगितले. तिने तसे केल्यावर सर्वजण जिवंत झाले. त्या दिवसापासून तो शेतकरी नागपूजा करू लागला. मग इतरांनीही नागपूजा स्वीकारली. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया गावाबाहेर वारुळाची पूजा करण्यासाठी समारंभपूर्वक गाणी म्हणत जातात.
वारुळाची पूजा करतात. नागोबाला दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. या सणाच्या वेळी नवविवाहित मुली माहेरी येतात. झाडांच्या फांद्यांना दोरीचे झोपाळे बांधतात. त्यावर झोके घेतात. फुगड्या-झिम्मा खेळतात. निदान खेड्यात तरी ही चाल अद्याप आहे. मंगळागौरीप्रमाणे या दिवशी नाचगाणी, झोपाळे, उखाणे इत्यादीची धमाल असते. या दिवशी भाजी चिरणे, कुटणे, कापणे या गोष्टी करीत नाहीत. या सणाला दिंडे, मोदक असे उकडलेले मिष्टान्न करतात. महाराष्ट्रात या दिवशी पुरणाची दिंडे करतात. असा आहे हा नागपंचमीचा सण. सर्वांना सुख देणारा, आनंद वाढविणारा.
काय शिकलात?
आज आपण नागपंचमी सणाविषयी माहिती मराठीत पाहिली आहे | Nag Panchami Information in Marathi पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.