मीनाक्षी मंदिराइतके सुंदर आणि कलापूर्ण मंदिर भारतात अन्यत्र नाही. मदुराई या नगराची मीनाक्षी ही देवता आहे. मंदिराभोवती तट असून मंदिराने १४ एकर जागा व्यापली आहे. चारी द्वारावर चार कलापूर्ण गोपुरे व तटाच्या आत अनेक सभामंडप, छोटी मोठी मंदिरे, तलाव आणि एक सहस्त्रस्तंभी मंडप आहे. पांड्य राजा कुलशेखर याने या शहराची व मीनाक्षी मंदिराची स्थापना केली. मंदिरासमोरच सुवर्णध्वजस्तंभ असून पितळी द्वारपाल आहेत.
मंदिरांत देवी मीनाक्षीची विलोभनीय मूर्ती आहे. ती द्विभुज आहे. तिचे पाय कमळात आहेत. डावा हात खाली सोडलेला असून उजव्या हातात लहानशा चवरीवर पोपट आहे. मूर्ती सदैव अलंकराविभूषित असते. मंदिराचे शिखर सुवर्ण पत्र्याचे असून प्रदक्षिणेच्या मार्गावर ज्ञान, बल, क्रियाशक्ती यांच्या मूर्ती आहेत. जवळ तिचे शयन मंदिर आहे.. मीनाक्षी मंदिरासमोर गणेशाची विशाल मूर्ती बसविली आहे. मंदिरात सहस्त्र स्तंभ असलेले सभागृह आहे.
येथे कलादालन व संग्रहालय आहे. हे मंदिर दुपारी १ ते ४ बंद असते. मंदिरात रोज नाट्यपूर्ण समारंभ असतो. मीनाक्षी विषयी कथा आहे. मीनाक्षी ही मलयध्वज पांड्य राजाची कन्या. तिचा जन्म यज्ञकुंडातून झाला. योग्य पती युद्धात पारखून घेण्यासाठी ती कैलासावर चाल करुन गेली. शिव एकाएकी तिच्या पुढे प्रगट झाले. ते दिव्य पुरुषत्व पाहून ती लजित झाली. मग शिवाशी (सुंदरेश्वर) तिचे लग्न झाले.
श्री शंकराचार्याने एका श्लोकात मीनाक्षीचे स्तवन करताना म्हटले आहे, ‘नाना योगी व मुनिश्रेष्ठांच्या हृदयात निवास करणारी, नाना अर्थ व सिद्धी देणारी, नाना पुष्पांनी जिची चरणकमळे विराजित आहेत. अशा नारायणाने पूजिलेल्या मीनाक्षीला मी नमस्कार करतो.’ येथे दरवर्षी चैत्रई उत्सव साजरा होतो. या उत्सवात मीनाक्षी आणि सुंदरेश्वर (पार्वतीशिव) यांचा विवाह साजरा केला जातो.
रत्नाचे मुकुट दोघांना घातले जातात आणि शहरभर मिरवणूक काढली जाते. भगवान विष्णूशृंगारलेल्या रथातून बहिणीच्या (मीनाक्षी) विवाहाला येतात. मीनाक्षी विष्णूची बहिण समजलीज जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येथे तरंगता उत्सव साजरा करतात. तेव्हा मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्ती सुशोभित केलेल्या बोटीतून मरिअम्मास तेप्पकुलम् तलावात नेल्या जातात. हा तलाव मोठा आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अवनी मूल उत्सव साजरा केला जातो. त्याप्रसंगी मंदिरातील रथांची शहरातून मिरवणूक काढली जाते. मदुराई हे शहर तलम कपडे व साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. लाकडावर कोरीव काम करणारे कुशल कारागीर आहेत.