Site icon My Marathi Status

मौल्यवान काय

तथागत बुद्धांच्या काळात ‘कपिलवस्तू’ व ‘कोलिय’ ही दोन नगरे अतिशय संपन्न व समृद्ध म्हणून प्रसिद्ध होती. कपिलवस्तु नगर शाक्यांची तर कोलिय नगर ही कोलिय लोकांची राजधानी होती. या दोन नगरांच्या मधून ‘रोहिणी’ नावाची एक मोठी नदी वाहत होती. नदीवरील धरणातील पाणी वापरून या दोन्ही नगरातील लोक शेती करायचे. धरणातील पाण्यामुळे दोन्ही बाजूंची शेतं वर्षभर हिरवीगार दिसायची. दोन्ही नगरातील शेतकऱ्यांना उत्पन्नही भरपूर मिळायचे.

अशाप्रकारे रोहिणी नदीच्या पाण्यामुळे दोन्ही नगरातील लोक अतिशय संपन्न व सुखी होते. जेष्ठ महिन्यातील ही गोष्ट. एकदा जेष्ठ महिन्यात पाण्याच्या कमतरतेमुळे दोन्ही बाजूंच्या शेतातील पिकं सुकायला लागली. धरणात साठविलेले पाणी सुद्धा अपुरे पडायला लागले. यावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही नगरातील शेतकरी, कामगार इ. धरणाजवळ एकत्र जमले.

सर्वांच्या मनात एकच विचार होता, आपली पिकं कशी वाचवायची? तेव्हा कोलिय नगरातील लोकांचा प्रमुख उभा राहिला. धरणातील पाण्याकडे बघत तो शाक्यांना म्हणाला, “धरणातील पाण्याचा साठा अतिशय कमी आहे. हे अत्यल्प पाणी दोन्ही नगरातील लोकांनी वापरले तर ते तुम्हालाही पुरणार नाही आणि आम्हालाही पुरणार नाही. आमच्या शेतातले पीक एका पाण्यावर येण्यासारखे आहे. तेव्हा हे पाणी आम्ही वापरतो आणि आमची पिकं जगवतो. तुम्ही हे पाणी आम्हाला वापरू द्या.” त्याचं हे बोलणं ऐकून शाक्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

शाक्यांचा प्रमुख ताडकन उभा झाला आणि रागानेच म्हणाला, “वा रे वा! धरणातील पाणी वापरून तुम्ही तुमची पिकं जगवाल आणि तुमची कोठारे धान्याने भरतील. पण मग आमचं काय? आम्ही का उपाशी मरायचं? आमच्या शेतातली पिकं सुद्धा एका पाण्यावर घेता येण्यासारखी आहेत. ते काही नाही. तम्ही हे पाणी आम्हाला वापरू द्या.” त्याचं हे बोलणं संपताच दोन्ही बाजूचे लोक प्रचंड अस्वस्थ झाले. प्रत्येक जण त्वेषाने आपलं म्हणणं मांडू लागला. शब्दाला शब्द भिडत गेले आणि भांडण वाढत गेले. या भांडणामध्ये दोन्ही बाजूचे लोक एकमेकांच्या राजांना उद्देशून अपशब्द वापरू लागले.

शाब्दिक भांडण वाढून धक्काबुक्कीला सुरुवात झाली. शेवटी दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना युद्धाचे आव्हान देऊन आपल्या-आपल्या नगरात परतले. त्यानंतर त्यांनी आपापल्या अमात्यांना आणि अमात्यांनी आपल्या राजांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. दोन्हीही बाजूचे राजे आपापल्या प्रजेला धरणातील पाणी मिळावे, म्हणून एकमेकांच्या विरोधात युद्धासाठी उभे राहिले. दोन्ही बाजूंचे सैन्य संपूर्ण तयारीसह युद्धास निघाले. शेकडो हत्ती, घोडे यांच्यासह कित्येक सैनिक धूळ उडवीत रोहिणी नदीच्या दिशेने चालायला लागले.

भयंकर युद्ध होऊन मोठा रक्तपात व नुकसान होणार, अशी चिन्ह दिसायला लागली. दोन्ही नगरातील सर्वसामान्य लोक प्रचंड घाबरलेले होते. ही सर्व हकिकत तथागत बुद्धांना समजली. आपण तेथे गेलो नाही, तर घनघोर युद्ध होईल आणि या युद्धात अनेक निष्पाप लोक विनाकारण मारले जातील. त्यामुळे हे युद्ध थांबविण्यासाठी आपण तेथे गेलं पाहिजे, असा विचार त्यांनी केला. ते लगेच रोहिणी नदीच्या दिशेने निघाले.

काही अंतर चालून ते रोहिणी नदीच्या जवळ पोहोचले. नदीच्या एका बाजूला शाक्यांचे तर दुसऱ्या बाजूला कोलियांचे सैन्य युद्धासाठी सज्ज झाल्याचे त्यांना दिसले. पटापट पावले उचलत दोन्ही सैन्यांच्या मधून वाहणाऱ्या रोहिणी नदीच्या पात्रात पाणी नसलेल्या खडकाळ भागात जाऊन ते शांतपणे उभे राहिले. दोन्ही नगरातील राजे आणि सर्व लोक बुद्धांचा आदर करायचे. नदीच्या पात्रात बुद्ध दिसल्याबरोबर सर्व सैनिकांनी आपल्या हातातील शस्त्रे लगेच खाली ठेवली. दोन्ही राजे बुद्धांच्या जवळ गेले आणि आपल्या हातातील तलवारी खाली ठेवून त्यांनी अतिशय नम्रपणे बुद्धांना वंदन केले.

बुद्ध दोन्ही राजांना म्हणाले, ”महाराज, हे कसले भांडण आहे? तुम्ही हे युद्ध कशासाठी करीत आहात?” यावर राजे म्हणाले, ”पन्ते, हे पाण्यामुळे उद्भवलेले भांडण आहे. रोहिणी नदीतील पाण्यासाठी आम्ही हे युद्ध करत आहोत.” तसेच त्यांनी घडलेला सारा प्रसंग बुद्धांना सांगितला. बुद्ध म्हणाले, ”महाराज, पाण्याची किंमत किती आहे?” राजे म्हणाले, ”पाणी महत्त्वाचे असले तरी पाण्याची किंमत थोडी आहे.” त्यावर बुद्ध पुन्हा म्हणाले, “योद्ध्यांची, लोकांच्या जीवांची किंमत किती आहे? अधिक मौल्यवान काय? धरणातील पाणी की लोकांचे प्राण ?’ क्षणाचाही विचार न करता राजे लगेच म्हणाले, ‘योद्ध्यांचे, लोकांचे जीव अनमोल आहेत.

निश्चितच, लोकांच्या प्राणांची किंमत पाण्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.” तेव्हा बुद्ध त्यांना समजावत म्हणाले, ‘अगदी बरोबर. महाराज, अल्प किंमतीच्या पाण्यासाठी अनमोल अशा जीवांचा, योद्ध्यांचा नाश करणे तुम्हाला शोभत नाही. एकदा गेलेले प्राण आपल्याला परत आणता येत नाहीत. शुल्लक कारणासाठी असा विनाश योग्य नाही. लक्षात ठेवा, वैराने वैर कधीच नष्ट होत नाही.

युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. उलट एका युद्धामुळे दुसऱ्या युद्धाची बीजं रोवली जातात. म्हणून उतावीळपणे न वागता विचार करून निर्णय घ्या.” तथागत बुद्धांचं बोलणं ऐकल्यावर दोनही राजे आणि त्यांच्या सैन्याला आपली चूक लक्षात आली. सर्वांनी बुद्धांची क्षमा मागितली आणि शांततेने सारे जण आपापल्या नगरात परतले. अशाप्रकारे बुद्धांनी एक घनघोर युद्ध प्रेमाने टाळले. रक्ताने लाल होऊ पाहणारा रोहिणी नदीचा प्रवाह बुद्धांमुळे चैतन्याने खळखळून वाहू लागला.

तात्पर्य/बोध – हिंसेने कुठलाही प्रश्न सुटत नाही. संघर्ष, युद्ध, हिंसा जितके टाळता येईल, तितके टाळले पाहिजे. द्वेषाला केवळ प्रेमाने जिंकता येते.

Exit mobile version