Site icon My Marathi Status

श्रीकृष्णाचे जन्मस्थान मथुरा

यमुना नदीच्या तीरावर वसलेली कृष्णजन्मामुळे पावन झालेली मथुरा.’ हे प्राचीन पुण्यक्षेत्र आहे आणि सप्तपुऱ्यांपैकी एक अत्यंत पवित्र भूमी आहे. मथुरा जिल्हा उत्तर प्रदेशाच्या पश्चिम सीमेवर आहे. या जिल्ह्यातील प्रमुख गाव मथुराच आहे. मथुरेला जंक्शन आणि मथुरा छावणी अशी दोन मुख्य स्थानके आहेत. मथुरा छावणीपासून मथुरानगरजवळ आहे.

मुंबईहून थेट मथुरेस सेंट्रल किंवा वेस्टर्न रेल्वेने जाता येते. त्यापैकी पश्चिम रेल्वेचा मार्ग जवळचा आहे. मथुरा गावाच्या पूर्वेला यमुना नदी वाहाते. तर उत्तरेला क्रमश: घाट आहेत. त्यात विश्रामघाट विशेष महत्त्वाचा आहे. त्याला कारण असे आहे की, कंसाचा वध केल्यावर भगवान श्रीकृष्णाने येथे विश्रांती घेतली होती. तेथून जवळच कृष्णजन्मभूमी आहे.

येथे राहाण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानावर असलेल्या मंदिराचा औरंगजेबाने सन १६६९ मधे विध्वंस करुन त्याजागी मशीद बांधली. त्यानंतर १८५० मध्ये एका धनिकाने द्वारकाधीश मंदिर बांधले. त्यात अलंकारयुक्त अशा श्रीकृष्णाची मूर्ती आहे.

सभामंडपाच्या छतावर कृष्ण लीलेच्या विविध प्रसंगांची सुंदर चित्रे आहेत. देवास श्रीमंती थाटाचे भोग चढवतात व नंतर प्रसाद म्हणून तो विकतात. मथुरेत अनेक मंदिरे आहेत. श्रीकृष्णाला जन्मत:च वासुदेवाने गोकुळात नेले. तेव्हापासून गोकुळाचा महिमा वाढला.

मथुरेपासून १० कि. मी. अंतरावर यमुनेच्या पैलतीरावर गोकुळ आहे. नंदाच्या वाड्याची जागा दाखवली जाते. गोकुळ हे वल्लभसंप्रदायाचे एक प्रमुख केंद्र आहे. या संप्रदायाच्या २४ हवेल्या आहेत. मथुरेच्या आग्नेयेला १८ कि. मी. अंतरावर यमुनेच्या दुसऱ्या तीरावर बलदेव मंदिर आहे. त्यात बलरामाची साडेसहा फूट उंचीची काळ्या रंगाची मूर्ती असून वज्रनाभाने ५००० वर्षापूर्वी स्थापन केली.

याचे नेत्र मोठे असून उजवा हात वर उचललेला आहे. डाव्या हातात वारुणी आहे. तर मथुरेच्या पश्चिमेला गोवर्धन पर्वत असून गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. याची उंची १०० फूट व लांबी ६ ते ८ कि. मी. आहे. गिरीश्रेष्ठ गोवर्धन हा लोकांना अभय देणारा आहे. त्याच्या दर्शनमात्रे मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो. या पर्वताच्या मध्यावर वसलेले गोवर्धन हे गांव छोटे नगरच आहे.

गोवर्धनावर दोन मोठे उत्सव दरवर्षी होतात. एक गोवर्धन पूजेचा व दुसरा अन्नकुटाचा. हे उत्सव कार्तिक महिन्यांत येतात. वृंदावन मथुरेच्या उत्तरेस १० कि. मी. अंतरावर आहे. वृंदावनातील इंच इंच भूमी श्रीकृष्णाच्या चरित्राशी निगडीत आहे. श्रावण मासाचा अविष्कार पहावा तर वृंदावनातच. येथील रासलीला व श्रावण सोहळा अतिशय लोभस असतो. अशा पवित्र भूमीचे दर्शन आवश्यक घ्यावे.

Exit mobile version