हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला मंगळागौरी माहिती, इतिहास मराठी । Mangala Gauri Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – राम नवमी
मंगळागौरी मराठी । Mangala Gauri Information in Marathi
श्रावण महिना आला की लग्न झालेल्या मुली आपल्या माहेरी येतात. निदान जुन्या काळी तरी ही पद्धत होती. आजही खेड्यापाड्यात ही पद्धत आहेच. नवविवाहित मुलींच्या दृष्टीने अतिशय आनंद देणारा हा काळ असतो. माहेरची सगळी माणसे भेटतात. माहेरी आलेल्या मैत्रिणींचीही भेट होते. अशा वेळी गप्पागोष्टी, थट्टामस्करी इत्यादींत दिवस कसे जातात ते समजतही नाही. याच वेळी म्हणजे श्रावण महिन्यात लग्न झालेल्या मुलींनी करावयाचे एक आनंददायक व्रत असते. त्याचे नाव श्री मंगळागौरी पूजन. हे व्रत असले तरी ते उत्सवासारखेच असते.
श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी विवाहित मुलींनी मंगळागौरीची पूजा करावयाची असते. सर्व सौभाग्य देणाऱ्या या देवीचे नाव श्री शिव मंगलागौरी आहे. लग्नानंतर किमान पाच वर्षे व शक्य असल्यास आठ किंवा सोळा वर्षे ही व्रतपूजा करावयाची असते. पहिल्या वर्षी पहिल्या मंगळवारी माहेरी पूजा करावयाची असते. पुढे ती सासरी केली तरी चालते. पाचव्या वर्षी व्रताचे उद्यापन करावयाचे असते. त्या वेळी आपल्या सुवासिनी आईला वायन म्हणजे वाण द्यावयाचे असते. किंवा माहेरच्या कोणत्याही सुवासिनीस द्यावे. या वेळी मुलीने म आईवडिलांची पूजाही करावयाची असते.
ही पूजा एकटीने न करता बरोबरीच्या इतर स्त्रियांच्या बरोबर करावयाची असते. प्रातःकाळी स्नानानंतर मौन धारण करावयाचे असते. ही व्रतपूजा सर्व सौभाग्यदायक, पुत्रपौत्रादींची प्राप्ती, पतीला दीर्घायुष्य व आरोग्य देणारी, सर्व कामना पूर्ण करणारी आहे. भगवान शंकरांना दीर्घायुष्य मिळावे, संतती प्राप्त व्हावी म्हणून दक्षकन्या सतीने ही व्रतपूजा केली होती. त्याचप्रमाणे इंद्रपत्नी शची हिने इंद्राला दीर्घायुष्य लाभावे म्हणून ही पूजा केली होती. या गोष्टीचे स्मरण म्हणून ही पूजा करावयाची असते.
रात्री जागरण करून झिम्मा, फुगड्या, उखाणे, नाव घेणे इत्यादी आनंददायक, मनोरंजक गोष्टी करावयाच्या असतात. दुसऱ्या दिवशी पहाटे देवीची आरती करून पूजासमाप्ती होते. “पूर्वी कुंडिनपुरात धर्मपाल नावाचा एक व्यापारी होता. तो मोठा श्रीमंत होता. परंतु पुत्रसंतान नसल्याने तो अतिशय दुःखी होता. अनेक नवससायास केले पण पुत्रप्राप्ती नाही. त्यामुळे धर्मपाल व त्याची पत्नी अतिशय काळजीत पडली होती.
एके दिवशी एक साधू धर्मपालाकडे आला. धर्मपालाने त्याचे उत्तम स्वागत करून पूजा केली व आपले दुःख सांगितले. तेव्हा तो साधू म्हणाला- ‘तू घोड्यावर बसून वनात जा. जेथे घोडा अडखळेल तेथे थांब व जमीन उकर. त्या जमिनीत देवीचे मंदिर आहे. त्या देवीची मनोभावे पूजा कर म्हणजे तिच्या कृपेने तुला संतती प्राप्त होईल.’ “त्या साधूने सांगितल्याप्रमाणे धर्मपाल घोड्यावर बसून वनात गेला. जेथे घोडा अडखळला तेथे त्याने जमीन उकरली. त्या जमिनीत देवीचे मंदिर होते. धर्मपालाने त्या देवीची मनोभावे पूजा करून प्रार्थना केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेली देवी प्रकट झाली व त्याला म्हणाली, ‘तुझ्या नशिबात संतती नाही. परंतु मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे.
तुला कन्या हवी असेल तर ती मिळेल, पण ती विधवा होईल. पुत्र हवा असेल तर दीर्घायुषी परंतु जन्मांध असेल किंवा अल्पायुषी, पण अत्यंत ज्ञानी असेल. तुला काय हवे असेल ते माग. तेव्हा धर्मपाल म्हणाला – ‘मला अल्पायुषी पुत्र असला तरी चालेल पण तो शहाणा असावा.’ देवीने धर्मपालाला एक फळ दिले व सांगितले, ‘हे फळ तुझ्या पत्नीला खावयास दे म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल.’ असे सांगून देवी गुप्त झाली. “धर्मपालाने घरी परत येऊन ते फळ आपल्या पत्नीस दिले. तिने ते फळ खाल्ले असता काही दिवसांनी तिला एक सुंदर तेजस्वी पुत्र झाला. त्याचे शिव असे नाव ठेवले.
शिव दहा वर्षाचा झाला तेव्हा याचा आता विवाह करावा असे त्याच्या आईला वाटले. तेव्हा धर्मपाल म्हणाला – ‘मी याला काशीयात्रा घडवीन असे बोललो आहे.’ मग धर्मपाल शिवाला बरोबर घेऊन काशीयात्रेला निघाला. यथासांग काशीयात्रा झाली. काशीविश्वेश्वराचे दर्शन घेऊन दोघे परत निघाले. वाटेत त्यांना काही मुली दिसल्या. त्या कसलातरी खेळ खेळत होत्या व भांडत होत्या. त्या मुलींत सुशीला नावाची एक अत्यंत सुंदर गोरीपान मुलगी होती. भांडत असलेल्या त्या मुलींपैकी एक मुलगी सुशिलेला म्हणाली, ‘तू बोडकी म्हणजे विधवा होशील.’ तेव्हा सुशीला अगदी शांतपणे म्हणाली, ‘तुझा शाप कधीच खरा ठरणार नाही.
आमच्या घरातील कोणतीही स्त्री विधवा होत नाही. माझ्या आईने शिवमंगलागौरीचे व्रत केले. त्यामुळे आमच्या घरातील सर्व स्त्रिया सौभाग्यवती, सुवासिनीच असतात. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली असता घरात सुखसमृद्धी व सौभाग्य नांदते.’ “सुशिलेचे हे बोलणे ऐकून धर्मपालाला वाटले, या मुलीला आपली सून करून घेतली तर आपला हा मुलगा-शिव दीर्घायुषी होईल. असा विचार करून धर्मपालाने सुशिलेच्या वडिलांना भेटून आपल्या पुत्रासाठी सुशिलेची मागणी घातली.
शिव आणि सुशीला यांचा विवाह झाला. त्या दिवशी रात्री सगळे झोपले असता मंगळागौरी सुशिलेच्या स्वप्नात आली व म्हणाली, ‘ऊठ लौकर. एक विषारी साप तुझ्या पतीला चावण्यासाठी येत आहे. त्या सापाला दूध पाज व एक रिकामा कलश ठेव, तो साप दूध पिऊन त्या कलशात शिरला की त्या कलशाचे तोंड बंद कर.’ सुशिलेने जागे होऊन पाहिले तो खरोखरच एक काळा साप आला होता. देवीने सांगितल्याप्रमाणे सुशिलेने केले व त्यामुळे तिच्या पतीचे-शिवाचे प्राण वाचले. त्या दिवशी श्रावणातला मंगळवार होता.
सुशिलेने मंगळागौरीची मनोभावे पूजा केली. “मग धर्मपाल आपल्या पुत्राला व सुनेला घेऊन घराकडे परत निघाला. वाटेत शिवाला एकाएकी बरे वाटेनासे झाले. त्याचा मरणकाल जवळ आला. तो बेशुद्ध पडला. त्या वेळी यमाचे दूत शिवाचे प्राण हरण करण्यासाठी आले. त्या वेळी मंगळागौरी तेथे प्रकट झाली. मंगळागौरीचे व यमदूतांचे युद्ध झाले. मंगळागौरीने यमदूतांचा पराभव करून शिवाचे प्राण परत दिले. शिव जागा झाला. त्याने स्वप्नात पाहिलेले सगळेकाही सांगितले. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. सर्वजण आपल्या घरी परत आले.
धर्मपालाने आपल्या पत्नीला सगळी हकीकत सांगितली. तिने सुशिलेला जवळ घेऊन विचारले, ‘तू काय केलेस, ज्यामुळे माझा मुलगा दीर्घायुषी झाला?’ तेव्हा सुशीला म्हणाली, “हा सगळा प्रताप मंगळागौरीचा. तिची मी श्रावणातल्या मंगळवारी पूजा केली त्यामुळे हे सर्व घडले.” ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला – “मंगळागौरीचे माहात्म्य हे असे आहे. श्रावणातल्या मंगळवारी प्रातःकाळी स्नान करून मंगळागौरीची षोडशोपचारे पूजा करावी. मातेला वायन द्यावे. त्या दिवशी मिठाशिवाय अन्न खावे. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी मंगळागौरीचे विसर्जन करावे. असे पाच वर्षे केले असता पतीला दीर्घायुष्य लाभते. आरोग्य, पुत्रपौत्र, सुखसमृद्धी या गोष्टी प्राप्त होतात.”
काय शिकलात?
आज आपण मंगळागौरी माहिती, इतिहास मराठी । Mangala Gauri Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.