Site icon My Marathi Status

महिषासुरमर्दिनी

‘महिषासुरमर्दिनी’ हे त्या आदिशक्ती देवतेचं एक रूप आहे, हे तर आपण सर्व जण जाणतोच. पण हा महिषासुर कोण? त्याला मारण्यासाठी देवीने हा अवतार का घेतला? त्याला कसा मारला, ह्याबद्दल देवी पुराणांत जी कथा सांगितलेली आहे, ती अशी आहे. देवांचा राजा इंद्र आणि राक्षसांचा राजा महिषासुर ह्यांचं युद्ध हे अनेक वर्षे होते. महिषासुराला भू-लोक, पाताळलोक ह्या दोन्हींवर विजय मिळाल्यानंतर आता त्याचं लक्ष होतं ते स्वर्गलोक आणि इंद्रपुरीवर.

राक्षसांचे अफाट सैन्य, त्यांची मायावी शक्ती, कपटनीती ह्यामुळे देवगणांची मोठ्या प्रमाणात हार होत होती. त्यांना वारंवार पराभव पत्करावा लागत होता. त्यामुळे पराभूत, निराश अन् हतबल झालेले सर्व इंद्रादिक देव हे भगवान विष्णूंना शरण गेले. त्यांनी विष्णूंना आपल्या पराभवाची व उन्मत्त महिषासुराचा अन्याय, अत्याचार, अराजकता, त्याची वारंवार होणारी आक्रमणे,ह्याबद्दल सर्व माहिती दिली. त्या वेळी श्री विष्णूंना राग आला. त्यांनी एक जळजळीत निःश्वास टाकला. त्यामधून एक दिव्य तेजज्योत प्रगट झाली.

त्यामागोमागच इतर सर्व देवतांच्या शरीरातून अनेक तेजशलाका निघाल्या आणि त्या दिव्य तेजज्योतीत जाऊन मिसळल्या. त्या सर्वांची एक महाज्योत तयार झाली आणि एका अतिशय सुंदर स्त्रीरूपात त्या तेजाचे परिवर्तन झाले. _सर्व देव, मानव, भक्त, भाविक ह्यांच्या कल्याणासाठी अवतरलेल्या त्या शक्तीदेवतेला अनेकांनी आपापल्याकडील दिव्य अस्त्रे शस्त्रे दिली.

भगवान शंकरांनी तिला त्रिशूल दिला. विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले. अग्नीने शक्ती अस्त्र, इंद्राने वज्र अन् ऐरावत हत्ती दिला. यमाने दंड, पाश दिले. प्रजापतीने देवीला स्फटिक मण्यांची माळ दिली. क्षीरसागराने देवीला मणिमाला, दिव्य वस्त्रे, अलंकार, आभूषणे दिली. विश्वकाने परशू, अपराजित शस्त्रे अन् अभेद्य कवचं दिली. हिमालयाने ह्या देवीला वाहन म्हणून सिंह दिला. सर्व देवदेवता आणि ऋषीमुनी, जपी-तपी, भक्त आणि भाविक ह्यांनी ह्या नव्या आदिशक्ती देवी अवताराचा जयजयकार केला.

स्तुती करून त्यांनी ‘हे माते! महिषासुराचा वध कर, आमचे रक्षण कर,अशी तिला प्रार्थना केली. देवदेवतांच्या स्तुतिस्तवनाने प्रसन्न झालेल्या देवीने जेव्हा सर्वांना असुरमर्दनाचे अभिवचन दिले. तेव्हा साऱ्यांना आनंद झाला. त्यांनी तिचा जयजयकार केला. तो ध्वनी कानी पडताच महिषासुराने हे ओळखले की, देवांच्या रक्षणासाठी नक्कीच कोणत्या तरी शक्तीनं अवतार घेतला आहे. देवांच्या रक्षणासाठी प्रगटलेली देवी… तिचं सुंदर रूप पाहून महिषासुराने मनात विचार केला की, ‘अरे, ही तर स्त्री आहे.

ती माझ्याशी असं काय युद्ध करणार? ती माझ्यासमोर काय अन् कशी टिकणार? तिला मारण्यासाठी मला रणांगणात उतरण्याची काय गरज आहे? ते काम तर माझा सेनापतीच करेल!’ असा विचार करून महिषासुराने आपल्या सेनापतीला बोलावले. त्याला सैन्य देऊ केले अन् ‘त्या देवरक्षिणी शक्तिदेवतेचा पराभव करून ये’ म्हणून त्याला आज्ञा दिली. आज्ञा मिळताच असुरसेना घेऊन तो सेनापती देवीवर चाल करून गेला. देवी आवेशाने पुढे सरसावली. देवीच्या सामर्थ्यापुढे असुरसेनेचा निभाव लागेना.

देवीचे कित्येकांच्या गळ्यांत पाश अडकवले. कुणावर शस्त्राघात केला, कुणाला त्रिशूलाने मारले, तर; कुणाचे हात, पाय, मुंडकी कापून काढली. तेवढ्यात सेनापती चिक्षूर ह्याने देवीवर अनेक बाणांचा वर्षाव केला. देवीने आपल्या अमोघ शक्तीबळाने ते बाण गवताच्या पात्याप्रमाणे मोडून काढले. आपले योद्धे, महावीर सेनापती ह्यांना देवीने अगदी सहजपणे मारले आणि त्यांची रक्षणफळी तोडून देवी आता आपल्याकडे येत आहे, हे कळताच महिषासुर स्वतः युद्धास पुढे आला.

पण कसा….? पाहता-पाहता त्या असुरसैन्यातून एक मोठा रेडा देवीच्या सैन्यावर धावून आला. त्याने आपल्या टोकदार शिंगांनी अनेकांना भोसकले. कुणाला आकाशात भिरकावले, तर कुणाला प्रचंड धडका दिल्या. त्या रेड्याने जेव्हा आपला जळजळीत नेत्रकटाक्ष देवीवर टाकला, त्या क्षणीच देवीने ते महिषासुराचे मायावी रूप आहे, हे ओळखले. त्या रेड्यारूपी महिषासुराने देवी सैन्यात एकच हलकल्लोळ माजवला. देवीने त्या रेड्याला पाहून एक मोठी सिंहगर्जना कला.

देवीने आपल्या हातातला पाश त्या रेड्याच्या गळ्यात टाकला. आता देवी तो पाश आवळणार तोच त्याने एका सिंहाचे रूप धारण केले. त्या मायावी रूपावर देवी बाणांचा वर्षाव करीत असातानाच त्याने परत एकदा रेड्याचे रूप घेतले. तेव्हा देवीने चपळाईने त्याचे केस धरून त्याला पायाखाली ओढले. देवी त्याच्या अंगावर उभी राहिली. देवीने त्याच्या छातीवर त्रिशूलाचा प्रहार केला. तसा तो परत मानवी महिषासुराचे रूप घेऊ लागला. तेवढ्यात देवीने त्याचे मस्तक कापून काढले.

अर्धा मानव अन् अर्धा रेडा असतानाच महिषासुराचा वध झाला. महिषासुर मेला, आणि उरलीसुरली राक्षससेना वाट फुटेल तिथे पळत सुटली. असुरराज महिषासुराच्या वधाने सर्वांनाच अपूर्व आनंद झाला. सर्वांनी देवीच्या नावाचा जयजयकार केला. सर्वांनाच प्रचंड आनंद झाला. सारा परिसर, अवघा आसमंत हा देवी ‘महिषासुरमर्दिनी की जय’ म्हणून दणाणून गेला. त्या देवरक्षिणी आदिशक्तीच्या रूपाचं, त्या अवताराचं सर्वांनी एकमुखाने अन् मोठ्या कृतज्ञतापूर्वक नाव ठेवलं – ‘महिषासुरमर्दिनी’

तात्पर्य : स्त्री ही अबला नाही, तर ती त्या आदिशक्ती देवतेचं एक रूप आहे. आपली संस्कृती ही स्त्रीला देवता मानून तिचे पूजन, आदर अन् सन्मान करायलाच आपल्याला शिकवते.

Exit mobile version