महिमा सत्संगाचा
एकदा काय झालं, भक्तराज नारदमुनी हे वैकुंठामध्ये गेले अन् त्यांनी विष्णूंना एक प्रश्न विचारला, “प्रभू, परमार्थामध्ये सत्संगाचा मोठा महिमा वर्णन केला आहे. प्रत्येक प्राणिमात्राने हा सत्संग करायला हवा, तो सहवास मिळवायला हवा, असं सांगितलं आहे. खरं ना? मग आपण मला त्या सत्संगाचा महिमा काय, ते सांगाल का?” तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, “नारदा, तुझी ही ज्ञानजिज्ञासा पूर्ण करायला मला खरंच खूप आनंद झाला असता, पण काय करू? सध्या मी फार कामात आहे. तू असं कर, तू नंतर ये.” “देवा, अहो, आपण जर तो महिमा सांगितला नाही, तर दुसरं कोण सांगेल?” नारदांनी विचारले.
तेव्हा देव म्हणाले, “हे बघ, तू ह्या वाटेने असाच पुढे जा. तिथे तुला एका कुंपणावर एक सरडा दिसेल. तू हा प्रश्न त्याला विचार. तो तुला त्याचा महिमा सांगेल.” “नारायण…. नारायण….” असा जप करीत अन् शोधक नजरेने इकडे-तिकडे पहात जाणाऱ्या नारदमुनींना खरोखरच एक सरडा दिसला. त्यांनी त्या सरड्याला सत्संगाचं महत्त्व काय हा प्रश्न केला….. आता तो सरडा नेमकं काय उत्तर देतोय, हे ऐकायला नारदांनी मन एकाग्र केलं. डोळे मिटले अन् कान टवकारले.. पण सरडा काहीच बोलेना, म्हणून जेव्हा त्यांनी डोळे उघडून समोर पाहिलं, तर काय- तो कुंपणावरचा सरडा तत्काळ मरून त्यांच्या पायपाशी पडलेला.
‘अरेरे! हे काय झालं? सरडा तर मेला; आता सत्संगाचा महिमा कोण सांगणार? नारदांना अति दुःख झालं. त्यांनी एक छोटा खड्डा केला आणि जड अंत:करणाने त्या सरड्याला मूठमाती दिली. त्यांचा तो प्रश्न तिथं तसा अनुत्तरितच राहिला. असेच काही दिवस गेले अन् पुन्हा एका भेटीत नारदांनी तोच प्रश्न विष्णूंना विचारला. ह्या वेळी पण ते म्हणाले, “नारदा! ह्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा केव्हातरी! पण काय रे, तुला त्या सरड्याने काहीच सांगितलं नाही का?” “अहो प्रभू ! कसलं काय, मी त्या सरड्याजवळ गेलो.
त्याला प्रश्न विचारला, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधीच तो मेला अन् माझ्याच पायाशी पडला. तो सरडा तर मेला; आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार?” नारदांनी विचारले. “असं का? बरं, मग तू असं कर, त्या समोरच्या आम्रवृक्षावर एक पोपट बसला आहे. तू त्याला सत्संगाचा महिमा विचार”, असं सांगून ह्या वेळी ही भगवान घाईघाईन निघून गेले. नारदमुनी पुढे गेले अन् खरंच त्या वृक्षावर पोपट दिसतो का, म्हणून पाहू लागले. तोच त्यांना समोरच्या फांदीवरच एका पोपटाचे दर्शन घडले.
त्याला हात जोडून नारद विचारू लागले. “गुरुराज, मला सत्संगाचा महिमा सांगा हो-” ते शब्द ऐकले मात्र अन् दुसऱ्याच क्षणी तो पोपटही गतप्राण होऊन नारदमुनींच्या पायाजवळच पडला. ‘अरे बापरे! हे असं काय होतंय? मी ज्याच्याजवळ जातोय, तो मला सत्संगाचं महत्त्व सांगण्याआधी माझ्याच पायाशी का बरं मरून पडतो आहे? याचा अर्थ काय? ‘नको, त्यापेक्षा तो प्रश्न उगाच कुणाला विचारायलाही ही नको अन् उगाच त्याच्या मृत्यूचं पाप आपल्या माथ्यावर यायला नको.’
असा विचार करून नारदांनी तो प्रश्नच कुणालाही विचारायचं सोडून दिलं. कालांतराने स्वत: नारदमुनींनासुद्धा त्या प्रश्नाचा विसर पडला. आणि एक दिवस दर्शनाला आलेल्या भक्त नारदांना मोठ्या प्रेमानं आपल्याजवळ बसवून घेत. विष्णू भगवंतांनी तो प्रश्न त्यांना विचारला. “काय नारदा, सत्संगाचं महत्त्व, त्याचा महिमा कळला का?” “नाही देवा, नाही! माझा तो प्रश्न मागे मी त्या दोघांना विचारला अन् काही उत्तर देण्याआधीच ते दोघंही मेले. मग खरं सांगतो देवा, मी तो प्रश्न कुणालाही विचारलाच नाही. तो प्रश्न अजून तसाच आहे.’ “नारदा, मग तू असं कर….” असं देव म्हणाले मात्र… आणि त्या प्रश्नाबद्दलची मुनीच्या मनातली जिज्ञासा परत जागी झाली.
त्यांना वाटलं की, प्रभू स्वत:च आता त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देणार, असं वाटून ते पुढे सरकले. देव म्हणाले, “नारदा, ह्या वेळी मात्र तुला तुझ्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर मिळेल. ते उत्तर तुला अष्टवर्षीय राजकुमार देईल.” “काय? एक छोटा अष्टवर्षीय राजकुमार अन् तो ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देणार?” अशी शंका नारदांच्या मनात येत असतानाच, ‘बरं मी येतो’, असं म्हणून नारायण लगेच दुसऱ्या ठिकाणी निघून गेले… नारदांना आता आणखीनच एक नवा प्रश्न पडला. आता नेमकं कोणाच्या नगरात जायचं? कुठल्या राजपुत्राला हा प्रश्न विचारायचा? बरं, मागच्या त्या दोन वेळेचा तो तसा विचित्र अनुभव.
न जाणो, ह्या तिसऱ्या वेळी तर…? तसंच काही विचित्र घडलं तर मग आली का फट म्हणता ब्रह्महत्या घडल्याची पंचाईत. नको बाबा, नको! ह्या आधी तो प्रश्न माझ्या तोंडून ऐकला आणि तो सरडा, तो पोपट हे दोघंही क्षणात गतप्राण होऊन नेमके माझ्याच पायाशी पडले. तेव्हा आता हे आणखी तिसरं पाप माथ्यावर घ्यायचं म्हणजे- नको त्यापेक्षा तो आपला प्रश्न हा जरी कायमचा अनुत्तरित राहिला, तरी चालेल; असं पक्क मनाशी ठरवून नारदमुनी सरळ स्वर्गलोकातून भूलोकी आले. असेच काही दिवस आले अन् गेले. ‘नारायण…. नारायण….’ जप करीत नारदमुनी एका नगरीत येऊन पोहोचले.
महर्षी नारदांचं आगमन आपल्या नगरीत झालं आहे, महर्षी दरबारात आले आहेत, हे कळताच राजा पुढे झाला. त्यानं नारदांना विनम्रभावे वंदन केलं. त्यांना आसनावर बसवून राजा-राणी ह्यांनी त्यांचे पाद्यपूजन केले. कपाळी चंदनाचा टीळा लावला. गळ्यात मोगरीच्या फुलांचा हार घातला. उत्तम फळे अन् केशरमिश्रित गोड दुधाचा पेला त्यांच्यापुढे केला. राजा-राणीच्या त्या भावपूर्ण स्वागत-सत्काराने नारदमुनी भारावून गेले. त्यांनी राजा-राणीला ‘सुखी भव’ असा आशीर्वाद दिला.
मग आपल्या अष्टवर्षीय राजपुत्राला महर्षी नारदांच्या पायावर घालीत राजा म्हणाला, “मुनिराज, हा आमचा पुत्र! ह्याला बालपणापासूनच ‘नारायण…. नारायण’ ह्या नामाची अवीट गोडी आहे. राजगुरू तर म्हणतात की, गतजन्मी त्याला कुणा महातपस्व्याचा सत्संग लाभला असावा. गतजन्म….. सत्संग हे शब्द ऐकले मात्र आणि नारदांच्या मनात तो प्रश्न पुन्हा जागा झाला. पण त्यांनी तो प्रश्न काही त्या राजपुत्राला विचारला नाही.
मात्र तो राजपुत्र पुढे आला. त्याने एकवार नारदांकडे पाहिले मात्र अन् त्यांच्या पायावर नतमस्तक होत तो राजपुत्र म्हणाला, “गुरूदेव! मागील दोन जन्मांत मला आपला सत्संग मिळाला. प्रथम सरड्याच्या योनीतून, नंतर पोपट ह्या योनीतून मुक्त झालो. आता मला परम सत्संग भाग्याने हा मानवजन्म मिळाला आहे. तुमचा ‘नारायण…. नारायण’ हा नाममंत्र तर मला मिळालेला आहेच; आता फक्त कृपा- वरदहस्त मस्तकी ठेवा, म्हणजे झालं.” त्या बालकाच्या ह्या बोलण्यातूनच नारदांना सत्संगाचा महिमा कळाला. ‘कल्याणमस्तु असे म्हणत त्यांनी आनंदाने राजपुत्राच्या मस्तकी वरदहस्त ठेवला.
तात्पर्य : प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थान कल्याण होण्यासाठी खऱ्या सत्संगाची गाठ होणे महत्त्वाचे आहे.