हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला महावीर जयंती माहिती, इतिहास मराठी । Mahavir Jayanti Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – रामनवमी
महावीर जयंती मराठी । Mahavir Jayanti Information in Marathi
“कोणत्याही प्राण्यास मारू नका. खरे बोला. कोणालाही त्रास देऊ नका. खोटा अभिमान बाळगू नका. सर्वांवर प्रेम करा. आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवा. जातिभेद मानू नका.” असा अखिल मानव जातीला उपदेश करणारे जैन संप्रदायाचे २४वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचा जन्म इ. स. पूर्व ५९९, चैत्र शुद्ध त्रयोदशी, सोमवारी सकाळी झाला. महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ व आईचे नाव त्रिशलादेवी. यांच्या जन्मानंतर राज्याची भरभराट झाली, म्हणून याचे नांव वर्धमान असे ठेवले.
वर्धमानाच्या जन्माच्या आधी त्रिशलादेवीला एक स्वप्न पडले होते. स्वप्नात तिने चार दातांचा पांढरा हत्ती, कमळात बसलेली लक्ष्मी, पौर्णिमेचा चंद्र, मंदार पुष्पाचा हार, सोन्याचा कलश व प्रकाशमान अग्नी या वस्तू पाहिल्या. त्या स्वप्नाचा अर्थ ज्योतिषाने असा सांगितला की राणीसाहेबांच्या पोटी कोणीतरी महान अवतारी पुरुष जन्मास येणार आहे.
वर्धमानाने एकदा एका पिसाळलेल्या हत्तीला शांत केले व एका भयंकर सापाला ठार न मारता त्याच्यातील हिंस्रत्व नाहीसे केले. त्यामुळे लोक त्याला महावीर व अवतारी पुरुष मानू लागले. महावीर राजपुत्र असला तरी लहानपणापासूनच अत्यंत विरक्त होता. संसारसुखात, राजवैभवात त्याचे मन रमत नसे. लोकांचे अज्ञान आणि दुःख पाहून त्यास वाईट वाटे.
आपण त्यांना दुःखमुक्त केले पाहिजे. त्यांना खऱ्या ज्ञानाची ओळख करून दिली पाहिजे असे त्याला वाटू लागले. केवल ज्ञान-कैवल्यज्ञान मिळविण्याची त्याला ओढ लागली. त्यासाठी त्याने वनात जाण्याचा निश्चय केला. वर्धमान आपणास सोडून जाणार म्हणून सर्वांना अतिशय दुःख झाले. परंतु वर्धमानाच्या मुखावर मात्र दैवी तेज विलसत होते.
एके दिवशी वर्धमान खऱ्या सुखाच्या शोधासाठी संसार-सुखाचा, राजवैभवाचा त्याग करून घरातून बाहेर पडला. त्याने साधुदीक्षा घेतली. आपले केस कापून टाकले. अंगावरील वस्त्रालंकार काढून टाकले. साधे वस्त्र परिधान केले. दीक्षा घेताना त्याने प्रतिज्ञा केली : “आजपासून आयुष्यभर मी कोणतेही पापकर्म करणार नाही. खोटे बोलणार नाही. कोणालाही दुखावणार नाही.” त्या दिवसापासून त्याने रात्रीचे भोजन सोडून दिले. त्या वेळी त्याचे वय तीस वर्षाचे होते. एक तप म्हणजे बारा वर्षे त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या केली. सर्व इंद्रियांवर ताबा मिळविला.
तेराव्या वर्षी महावीरांच्या आयुष्यातील सोनियाचा दिवस उजाडला. ऋजुबालिका नदीच्या तीरावर शालवृक्षाच्या खाली महावीर आत्मचिंतन करीत बसले होते. अचानक त्यांना कैवल्यज्ञानाची प्राप्ती झाली. त्या दिवशी वैशाख शुद्ध दशमी होती. महावीरांची तपश्चर्या फळाला आली. संसारातील दुःखातून मुक्त होण्याचा उपाय सापडला. महावीर आता केवळ लोकोपकारासाठी उरले होते. महावीरांनी काम, क्रोध, लोभ, द्वेष इत्यादी दोषांना जिंकले म्हणून त्यांना ‘महावीर जिन’ असे म्हणतात.
जिनाचे अनुयायी ते जैन. ऋषभदेवांनी जैन संप्रदायाची खरी सुरुवात केली. महावीरांनी जैन संप्रदायाला तपस्येची तेजस्वी शिकवण दिली. जैन धर्माचा त्यांनी प्रसार केला. जैन लोक महावीरांना चोविसावे तीर्थंकर मानतात. स्वतःला केवलज्ञान प्राप्त झाल्यावर महावीरांनी सुमारे तीस वर्षे पायी प्रवास करून आपल्या धर्माचा प्रसार केला. आत्मज्ञान, अहिंसा, व्रत, विनय, शील, मैत्री, समभाव व समाधान या आठ तत्त्वांवर त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाची उभारणी केली. त्यांनी आपला उपदेश लोकभाषेत केला.
स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाचा प्रसार करून स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार दिला. त्या काळात हे फार मोठे धाडस होते. त्यांनी हिंसेला विरोध केल्यामुळे वैदिक धर्मात यज्ञयागातील हिंसा निषिद्ध ठरली. असा हा महापरुष इ. स. पर्व ५२७ मध्ये कार्तिकी अमावास्येच्या मध्यरात्री श्रावस्ती येथे परमज्योतीत विलीन झाला. त्या वेळी त्यांचे वय ७२ वर्षे होते.
या महापुरुषाची व त्याच्या कार्याची स्मृती म्हणून दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. त्या दिवशी महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढतात. जैन मंदिरांत प्रार्थना-प्रवचन इत्यादी कार्यक्रम होतात. गोरगरिबांना अन्नदान केले जाते. आपणही सर्वांनी महावीर जयंतीच्या दिवशी महावीरांचे पुण्यस्मरण करून आपल्या मनातील हिंसा, द्वेष, मत्सर, जातिभेद इत्यादी दोषांचा त्याग करण्याचा प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थाने महावीर जयंती साजरी केली असे ठरेल.
काय शिकलात?
आज आपण महावीर जयंती माहिती, इतिहास मराठी । Mahavir Jayanti Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.