हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला महाशिवरात्री माहिती, इतिहास मराठी । Mahashivratri Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
महिना : | माघ. |
तिथी : | चतुर्दशी. |
पक्ष : | वद्य. |
आणखी वाचा – कोजागरी पौर्णिमा
महाशिवरात्री माहिती | Mahashivratri Information in Marathi
हिंदू संस्कृतीमध्ये माघ वद्य चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान महादेवाचा सर्वांत मोठा उत्सव महाशिवरात्री होय. ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन आद्य देवतांपैकी श्रीशंकर हा उग्र तितकाच भोळा देव आहे. या दिवशी शिवाची पूजाअर्चा, अभिषेक, जप इ. करावे. सहस्र बेलाची पाने वाहावीत. कवठाच्या पदार्थांचा नेवेद्य समर्पण करावा. या दिवशी उपवास केल्याने बारा एकादशा केल्याचे पुण्य मिळते, अशी आख्यायिका आहे.
इतर महत्त्व -प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीला शिवरात्र येते. परंतु माघ महिन्यातील चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी महादेवाला १०८ बेलाची पाने वाहतात. या दिवशी ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करतात; तर काही लोक बम बम भोलेनाथ’ अशी गर्जना करतात. महादेव हा भोळा भाबडा देव असा समज आहे. तो म्हणतो, की शरण येणाऱ्याला अभयदान द्यावे. नेहमी सत्याने, न्यायाने वागावे.
शिव म्हणजे शंकर, शिव म्हणजे चांगुलपणा, शिव म्हणजे मंगलमयता ! अशा शिवाण उपासनेने सगळ्यांचे कल्याणच होते. असा उदात्त हेतू ठेवून महाशिवरात्रीचे व्रत आपण सर्वांनी पाळावे. महाराष्ट्रामध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंगे भीमाशंकर, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढ्या नागनाथ व घृष्णेश्वर या ठिकाणी आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या प्रत्येक मंदिरात रोषणाई करतात.
बऱ्याच ठिकाणी दिपोत्सव साजरा करतात. दिवसाचे महत्त्व : महादेव हा विश्वाचा सूत्रधार. आदिशक्तीचा निर्माता, भुतांचा राजा. स्मशानात त्याचे संचार. तर कैलासात त्याचा निवास! या देवाचा वेश, त्याचे केश, त्याच्या गळ्यातील नाग, कपाळावर गंगा, वाहन नंदी हे सगळेच आगळेवेगळे आहे. महादेव हा देवांचाही देव आहे. महाशिवरात्रीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेजण उपवास करतात. महादेवाच्या मंदिरात जाऊन, त्याचे मनोभावे दर्शन घेतात. असा हा हिंदू संस्कृतीमधील महत्त्वपूर्ण उत्सव दिन समजला जातो.
माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री असते. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्री म्हणतात. परंतु माघ वद्य चतुर्दशीला शंकराच्या ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव रात्रीच्या वेळी झाला. पृथ्वीतून प्रकट झालेले ते ज्योतिर्लिंग कोटिसूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी होते. म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणतात. या दिवशी सर्वांनी उपवास करावा. या दिवशी शंकराच्या पजेइतकेच किंवा त्याहूनही अधिक महत्त्व उपवासाला आहे. या दिवशी उपवास करून शंकराची बेलाच्या पानांनी (त्रिदलांनी) पूजा केली असता शंकर प्रसन्न होतात. या दिवशी शक्यतर पवित्र नद्यांत किंवा समुद्रात स्नान करावे.
शिवनामाचा जप करावा व रात्री जागरण करावे. शिवरात्रीच्या दिवशी रात्रीला फार महत्त्व आहे. काही शिवभक्त या दिवशी रात्रीच्या चार प्रहरात चार वेळा दूध, दही, तूप व मध यांनी शंकराची पूजा करतात. काहीजण या दिवशी शिवलीलामृताचे पारायण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास, जागरण व बिल्वपत्राने शिवपूजा यांचे महत्त्व सांगणारी एक कथा शिवलीलामृत ग्रंथात दिली आहे ती अशी – विंध्य पर्वतात राहणारा एक शिकारी एके दिवशी हातात धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी वनात फिरत होता. फिरता फिरता तो एका शिवमंदिराजवळ आला. त्या दिवशी महाशिवरात्री होती. मंदिरात लोकांची खूप गर्दी होती.
सगळीकडे शिवनामाचा जयघोष चालू होता. शिकाऱ्याने मंदिरात डोकावून पाहिले. तेथे भगवान शंकराच्या लिंगावर अभिषेक चालू होता. शिवलिंगावर बिल्वपत्रांचा वर्षाव चालू होता. सगळे लोक उपवासपूर्वक शिवाच्या उपासनेत रंगून गेले होते. तो सगळा प्रकार पाहून त्या शिकायला हसू आले. एकसारखे शिव, शिव म्हणणारे, दगडाची पूजा करणारे हे लोक वेडेच आहेत असे त्याला वाटले. तो त्या लोकांची थट्टा करीत तिथन निघाला व घनदाट वनात शिरला. लोकांची टवाळी करण्यासाठी शिव, शिव असे सारखे म्हणत होता. त्या दिवशी त्या शिकायला वनात एकही शिकार मिळाली नाही.
पोटात अन्नाचा कणसुद्धा नव्हता. दिवसभर उपवास पडला. इतक्यात संध्याकाळ झाली. अंधार पड लागला. आज शिकार केल्याशिवाय घरी जायचे नाही असा त्याने निश्चय केला होता. इतक्यात त्याला स्वच्छ पाण्याने भरलेले तळे दिसले. त्या तळ्याच्या काठावर एक गोलाकार बेलाचे झाड होते. त्या शिकाऱ्याला वाटले, या तळ्यावर पाणी पिण्यासाठी प्राणी नक्कीच येतील. म्हणून तो त्या बेलाच्या झाडावर चढून एका फांदीवर बसला. त्याने धनुष्यबाण सज्ज ठेवले होते. तो वृक्ष घनदाट होता. समोरचे काहीच दिसत नव्हते म्हणून तो उजव्या हाताने दंवानी ओले झालेले बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकू लागला. त्याच वृक्षाखाली एक दिव्य शिवलिंग होते. त्याची स्थापना साक्षात् ब्रह्मदेवाने केलेली होती.
तो शिकारी बेलाची पाने तोडून टाकत होता. ती त्या शिवलिंगावर पडत होती. त्यामुळे अजाणतेपणी त्याच्या हातून शिवपूजा होत होती. तो मनातल्या मनात शिव, शिव असे म्हणतच होता. उपवास, जागरण, शिवपूजा व शिवस्मरण यामुळे त्या शिकायचे पाप हळू हळू नाहीसे होत होते. इतक्यात तेथे पाणी पिण्यासाठी एक हरिणी आली. त्या हरिणीला पाहताच शिकाऱ्याने धनुष्याला बाण लावला. तोच ती हरिणी मनुष्यभाषेत त्याला म्हणाली – संद्गृहस्था, थांब! मला मारू नकोस. मी तुझा कसलाही अपराध केलेला नाही. निरपराध प्राण्याला ठार मारणे पाप आहे.
ती हरिणी मनुष्यभाषेत बोलत होती हे पाहून त्या शिकाऱ्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने तिची चौकशी केली तेव्हा ती हरिणी म्हणाली, मी पूर्वजन्मी रंभा अप्सरा होते. परंतु माझ्या हातून घडलेल्या काही अपराधामुळे शंकरांनी मला शाप दिला. ‘तू पृथ्वीवर हरिणी होशील.’ हिरण्य दैत्याने माझी आराधना केली नाही म्हणून तोही पृथ्वीवर हरीण होईल. तो तुझा पती होईल. बारा वर्षांनंतर तू माझ्या पदाला येशील. मग मी पृथ्वीवर हरिणी म्हणून जन्मास आले. हे व्याधा, तू तुझ्या बायकामुलांचे पोट भरण्यासाठी मला या क्षणी मारू शकतोस. पण घरी माझे पती व बाळे आहेत.
मी त्यांना खाऊपिऊ घालून येते मग त मला खुशाल मार. मी माझे वचन पाळले नाही तर मला अनंत पापांचे फळ भोगावे लागेल. हरिणीचे हे शब्द ऐकताच त्या शिकाऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला त्या हरिणीची दया आली. दिवसभर केलेल्या उपवासामुळे, शिवपूजेमुळे व शिवस्मरणाने त्याचे अनेक जन्मांचे पाप जळून गेले. त्याने परवानगी देताच ती हरिणी आपल्या घरी गेली. त्या हरिणीने घरी जाऊन आपल्या पतीला व मुलांना सर्व हकीकत सांगितली. मग ते सर्वचजण त्या शिकाऱ्याकडे परत आले. तो हरीण शिकाऱ्याला म्हणाला – मला प्रथम मार.
तेव्हा हरिणी म्हणाली – हे बरोबर नाही. प्रथम मला मार, मला सौभाग्यपणी मरण आले पाहिजे. हरिणीची पाडसे म्हणाली – प्रथम आम्हाला मार. आईवडिलांच्या प्राणांचे रक्षण करणे हे पुत्राचे कर्तव्य आहे. त्या हरिणांचे हे बोलणे ऐकून त्या शिकाऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने धनुष्यबाण फेकून दिले. तो त्यांच्या पाया पडून म्हणाला. आज तुमच्यामुळे मी धन्य झालो. पापमुक्त झालो. तो शिकारी असे म्हणत असतानाच कैलासाहून दिव्य विमान तेथे आले. दिव्य वाद्ये वाजत होती. स्वर्गातून देवगण पुष्पवृष्टी करीत होते. त्याच क्षणी त्या शिकाऱ्याला व हरिणांना दिव्य देह प्राप्त झाले.
शिवगणांनी त्या सर्वांना विमानातून शिवलोकाला नेले. त्या व्याधाला शिवपद प्राप्त झाले. आजही आकाशात त्या व्याधाचा तारा आपल्याला पहावयास मिळतो. माघ वद्य चतुर्दशीची ही महाशिवरात्री मानवाला शिव बनण्याची प्रेरणा देते. ‘शिवो भूत्वा शिवं यजेत्.’ शिव बनून शिवाची उपासना केली पाहिजे याची शिकवण देते. मनुष्याने मनात आणले तर एकाच रात्रीत मानव शिवत्व प्राप्त करू शकतो हे आश्वासन महाशिवरात्री देते.
काय शिकलात?
आज आपण महाशिवरात्री माहिती, इतिहास मराठी । Mahashivratri Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.