मुलांनो, शिष्याने आपल्या सदगुरूंची इच्छा कशी पूर्ण केली, त्याच्यासाठी त्याने किती कष्ट केले, काय काय केले ह्याबद्दलच्या अनेक कथा तुम्ही वाचल्या, ऐकल्या असतील. आता मात्र मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार ती आहे, आपल्या शिष्याचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या सद्गुरूंची. ल गोष्ट अशी आहे.- श्री गुरू दत्तात्रेय ह्यांच्या श्री क्षेत्र गाणगापूर इथल्या नृसिंह सरस्वती नामक अवताराची! त्या अवतारात भक्तीमार्गाचा प्रसार करीत त्यांनी जे अनेक भक्त-शिष्य गोळा केले; त्यातलाच हा एक शिष्य. त्याचं नाव होतं भास्कर. तो परिस्थितीनं अतिशय गरीब होता.
मात्र, भास्कराची आपल्या सदगुरुंवर अढळ श्रद्धा होती. तो नेहमीच त्याच्या प्रत्येक आज्ञेचं मोठ्या कसोशीने पालन करीत असे. भास्कर परिस्थितीने गरीब असल्याने, तो गुरुसेवेत आपला देह आनंदाने झिजवीत होता. तो तना-मनाने सेवा करी. आश्रमातला केरवारा, पाणी भरायचं, सरपण आणायचं, पूजा पाठाची तयारी करायची अशी अनेक कामे तो पुढाकार घेऊन करायचा.
चांगली करायचा. मा एकदा भास्कराने गुरुमुखामधून अन्नदान हेच श्रेष्ठ दान, अन्नदानाचं मोल, महत्त्व अन् गरज ह्याबद्दल बरंच काही ऐकलं मात्र…..आणि भास्कराच्या मनात असा विचार आला की, ‘आपणही असं अन्नदान करून काही पुण्य गाठी जोडावं!’ पण नेमकं व्हायचं काय की, परिस्थितीमुळे त्या बिचाऱ्याचे हात बांधले गेले होते. अन्नदानाची इच्छा, हे त्याचे मनातले मांडेच ठरत होते. पणा तसं असलं तरी, त्याच्या मनातली ती अन्नदान करण्याची, आपल्या कुवतीप्रमाणे चार लोकांना तरी जेवू घालण्याची मनोमन इच्छा मात्र फार प्रबळ होती. क आणि म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. त्याप्रमाणे त्याने थोडं करून अन्न-धान्य जमा केलं.
चार पैसे गाठीला जोडून त्यातून शिधा, भाजीपाला, तेल, मीठ-मसाला इत्यादीची सर्व तयारी केली आणि आपल्या मनातली ती अन्नदानाची इच्छा तो सद्गुरूंकडे आता बोलून दाखविणार तेवढ्यात एक दिवस सद्गुरूच त्याला म्हणाले, “भास्करा, अरे, एकदा केव्हा तरी तुझ्याकडून भोजन घेण्याची इच्छा आहे. काय? पुरवणार ना आमची इच्छा? देणार ना आम्हाला इच्छाभोजन?” ते शब्द ऐकले आणि भास्कराचा आनंद गगनात मावेना. त्याने त्या आपल्या जवळ साठलेल्या भोजन तयारीमधूनच गुरूमाऊली अन मठातील अन्य चार-पाच सेवक शिष्यवर्ग ह्यांना भोजन देण्याचा दिवस ठरवला. अखेर भोजनाचा दिवस ठरला. भास्कराने जी होती, ती सर्व शिधा-सामुग्री आणली.
इकडे स्वयंपाक तयार होऊ लागला. अन् … तिकडे मात्र नृसिंह सरस्वती ह्यांनी शिष्याकरवी आज मठात भंडारा आहे, प्रसादाला’, या असा सर्व गावात निरोप पाठविला. दुपारी बाराची वेळ झाली. नैवेद्याची ताटं वाढली. अंगणात बैठका पडल्या, अन् काय! एका पाठोपाठ एक, अशी अनेक भक्त मंडळी मठात प्रसाद भोजनासाठी गोळा झाली. मात्र ह्या प्रकाराने भास्कर चिंतेत पडला, कावरा-बावरा झाला. स्वयंपाक तर थोडासा, साधन-सामुग्री अपूरी अन् लोक मात्र इतके. आता कसं होणार?
साऱ्यांना अन्न कसं पुरणार? कमी पडलं तर, जास्त अन्न कुठून आणणार? अन् कसं तयार करणार? एक ना अनेक प्रश्न भास्करापुढे आ वासून उभे राहिले. तो एक सारखा सद्गुरूंचा धावा करू लागला. ‘महाराज, आता ह्या गरीब भक्ताची लाज आपणच राखा.’ अशी वारंवार मनोमन प्रार्थना करू लागला. तोच सद्गुरु भास्कराजवळ आले अन् विचारू लागले, “काय भास्करा, आहे ना सर्व तयारी? करायची ना सुरुवात? भास्कर काय बोलणार? तो फक्त हात जोडत एवढंच म्हणाला, “गुरुदेवा, आपण एकदा सर्व पाकसिद्धीवर नजर फिरवली, म्हणजे झालं.”
सदगुरूंना त्या विनंतीमधली खोच लगेच लक्षात आली. त्यांनी एकवार सर्वत्र नजर फिरवली. मात्र… अन् म्हणाले, “अरे भास्करा, हे अन्न असे उघडे का? आधी ते झाक बरं!” असं म्हणत सद्गुरूंनी आपल्या खांद्यावरची छाटी दिली अन् सर्व पाकसिद्धी झाकली. “हं भास्करा, आता वाढ पंक्ती! पण हो, एक महत्त्वाचं; ही छाटी मात्र अन्नावरून दूर करू नकोस.” आणि काय आश्चर्य! ते छाटीखाली झाकलेलं अन्न वाढायला सुरुवात केली.
मात्र…. एकापाठोपाठ एक, अशा अनेक पंक्ती उठल्या. सर्व मंडळी तृप्त, संतुष्ट झाली. जवळ-जवळ शे-पन्नास मंडळी जेवून गेली. नुसती माणसंच नव्हे तर, गाई-गुरे, पशूपक्षी, जलचर ह्यांनाही तो प्रसाद मिळाला. शेवटी जेव्हा अन्नावरची छाटी दूर केली, तर काय! जेवढे अन्न शिजविले होते, तेवढेच अन्न भांड्यांत शिल्लक होते. भास्कराने सदगुरूंचे पाय धरीत म्हटले, “गुरुराया, हा सारा तुमच्या कृपेचाच प्रसाद बरं!”
तात्पर्य : सद्गुरूवर श्रद्धा- भक्ती, विश्वास तुमच्या पक्का असावा. ते शिष्याला कधीच काहीच कमी पडू देत नाहीत