प्राचीन शक्तिपीठ कोल्हापूरची महालक्ष्मी

आपला देश हा पवित्र तीर्थक्षेत्रांचे माहेरघर आहे. ५१ शक्तिपीठांपैकी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असून आदिशक्ती जगन्माता सर्व देव-देवतांसह येथे वास्तव्य करुन आहे. म्हणून हे पूर्णपीठ असून फार प्राचीन शक्तिपीठ आहे. उत्तर भारतात काशी तर दक्षिण भारतात कोल्हापूर (करवीर) ही दोन क्षेत्रे संसारतापापासून मुक्त होण्यासाठी महाविष्णूने निर्माण केल्याचे पुराणात सांगितले आहे.

कोल्हापूरची श्री महालक्ष्मी किंवा अंबाबाई ही अनेकांची कुलस्वामिनी आहे. दक्षिण काशी म्हणजे भगवान शंकरांनी वर्णन केलेली करवीर नगरी होय. पुराण इतिहास कथांमध्ये म्हटले आहे, केशी राक्षसाचा मुलगा कोलासूर हा येथे राज्य करीत होता. त्याने देवांना संत्रस्त करुन सोडले. म्हणून देवांनी प्रार्थना केल्यावरुन श्री महालक्ष्मीने त्याच्या वधाची तयारी केली. श्री महालक्ष्मी रजोगुणी देवता.

तिचे व कोलासूराचे घनघोर युद्ध झाले. श्री महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्याचे मस्तक उडवून दिले. त्यांनी मागितलेल्या वरानुसार करवीर, कोल्हापूर ही नांवे तशीच ठेवली. श्री महालक्ष्मीचे हे मंदिर पूर्वकालीन हेमाडपंथी बांधणीचे असून त्या वास्तूशिल्पावर प्राचीन कलेचा प्रभाव आहे. एक मध्यवर्ती मंदिर व त्याच्या तीन बाजूस तीन मंडप आणि तीन गर्भगृहे अशा पद्धतीची मंदिराची रचना असून ते पश्चिमाभिमुख आहे.

कासव मंडपाच्या पूर्वेस महालक्ष्मी, उत्तरेस महाकाली व दक्षिणेस महासरस्वती ही देवतांची मंदिरे आहेत. १२ व्या शतकांतील यादवांच्या राजवटीत मुख्य मंदिराला ही दोन मंदिरे जोडली आहेत. गणेश मंडप व पुढे गरुड मंडप हे ही नंतर आहे. मंदिराच्या बाहेरच्या भागावर सुंदर मूर्ती कोरल्या आहेत. अशा या मंदिराचे खांब रेखीव, सुबक असून नक्षीकामाने सजविलेले आहेत. या मंदिराच्या चारही बाजूला प्रवेशद्वार पाहावयास मिळते.

पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला महाद्वार म्हणतात. येथील शिल्पकाम व नक्षीकाम पाहिल्यावर स्थापत्य व शिल्पशास्त्र किती प्रगत होते, याचा अंदाज येतो. देवालयाच्या बाहेरील भाग हा तारांकित बांधणीचा आहे. मंदिरातील किरणोत्सव सोहळा पाहाण्यासाठी अनेक भक्त येतात. हा किरणोत्सव सोहळा म्हणजे लक्ष्मीला सूर्यनारायण भेटीला येण्याचा आनंदसोहळा असतो.

मंदिराच्या सभोवती ३५ देवालये असून अनेक लहान-लहान मंदिरे आहेत. मेघडंबरी, दहा खांबावर लाकडी कमानीची व त्यावर चांदीच्या पत्र्यावर कलाकुसर करुन बनवलेली आहे. त्यात ही श्री महालक्ष्मीची मूर्ती अधिष्ठित झाली आहे. मूर्तीचे गर्भागृह ३० फूट लांब व २० फूट रुंद असे लंबचौकोनाकृती आहे. या गर्भगाराचा दरवाजा शिसवी लाकडाचा, भव्य व भक्कम बनविलेला आहे. त्यावर गणेशमूर्ती कोरल्या आहेत. उंबरठ्यावर चांदीचा पत्रा असून त्यावर कूर्म प्रतिमा कोरली आहे.

श्रीच्या मूर्ती शेजारी उजव्या बाजूस उत्सव मूर्तीची जागा आहे. तिचीही पूजा या देवीच्या पूजेबरोबर होते. डाव्या बाजूस चांदीचे घंगाळे व शंख असून मूर्तीच्या डाव्या बाजूला शेजघर आहे. तेथे नक्षीदार पलंग असून त्यावर मूल्यवान किंमतीच्या गाद्या, उशा व भरजरी शाली आहेत. दररोज शेजारती झाल्यावर विडा, दूध, चांदीची तांब्यापात्रे भरुन ठेवली जातात. नंतर दरवाजा बंद होतो. या श्री महालक्ष्मीची मूर्ती २ फूट ९ इंच आहे. मूर्ती चर्तुभूज आहे.

मागील भागी चांदीची प्रभावळ असून सूर्य-चंद्राच्या आकृत्या आहेत. मस्तकावर सुवर्णमुकुट आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणापासून बनली आहे. सकाळी ४-३० वाजता पाद्यपूजा होऊन काकड आरती होते. दुसऱ्या महापूजेच्या वेळी भक्तांचे अभिषेक केले जातात. पुरणपोळीचा महानैवेद्य असतो. दुपारी दोन वाजता देवीची अलंकारयुक्त पूजा बांधली जाते.

मंदिर रात्री ८-३० पर्यंत दर्शनासाठी खुले असते. रात्री शेजारती होते. शुक्रवार हा देवीचा वार म्हणून ओळखला जातो. मंगळवारही शुभ मानला जातो. पालखी प्रदक्षिणा वर्षातून आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष व माघ या पाच पौर्णिमा व चैत्र प्रतिपदेस रथोत्सवादिवशी निघते. शारदीय नवरात्र उत्सव करवीरवासियांचा मोठा उत्सव असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: