जागृत देवस्थान केळशीची महालक्ष्मी
एका बाजूला अथांग अरबी समुद्र, दोन बाजूंना असलेल्या खाड्या म्हणजे तीन बाजूंनी पाण्यांनी वेढलेले व एका बाजूला पर्वतराजी, यामधील भूभागावर केळशी’ हे गाव वसलेले आहे. अशाही परिस्थितीत गावाने संस्कृती व परंपरा जपल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी हे ऐतिहासिक गाव आहे. तेथील श्री महालक्ष्मीचे देवस्थान स्वयंभू व जागृत स्थान मानले जाते.
दापोली तालुक्यातील भारजा नदी खाडीच्या लगत वसलेल्या या गावाचे ग्रामदैवत श्री कालभैरव असून महालक्ष्मी व श्री कालभैरवची जत्रा म्हणजे केळशी गावाचे भूषण मानण्यात येते. श्री महालक्ष्मीचे मंदिर डोंगराच्या पायथ्यापाशी वसले असून उत्कृष्ट वास्तुशिल्पाचा नमुना आहे. या मंदिरावर दाक्षिणात्य व मुगलकालीन कलाकारांचा ठसा आढळतो.
या मंदिराला दोन घुमट असून सर्व बांधकाम चुना, दगडाचे आहे. दोन घुमटांपैकी एका घुमटाच्या खाली श्रीमहालक्ष्मीचे स्वयंभू स्थान आहे. दुसऱ्या घुमटाच्याखाली प्रशस्त सभागृह आहेत. या सभागृहात प्रवेश करण्यास तीन दरवाजे आहेत व चौथा दरवाजा श्री महालक्ष्मीकडे जाणारा आहे. सूर्य उगवल्यावर विशिष्ट वेळी तसेच मावळताना सूर्यकिरणे श्रीमहालक्ष्मीचे चरणी येतील अशी बांधकामाची रचना केली आहे. मंदिराच्या अंगणात पुरातन वृक्ष असून धर्मशाळेत श्रीगणपती व शंकराची पिंडी आहे.
मंदिराचा सर्व परिसराला तटबंदी असून चार प्रवेशद्वार आहेत. तेथील पुरातन तळ्याला घाटासारख्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. श्री महालक्ष्मीसंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते की, देवी समुद्रामार्गे येथे येऊन या ठिकाणी वास करती झाली. येताना तिने वाटेत आपले केस झटकले. पाऊलाचा एक अंगठा जमिनीवर टेकून दुसरे पाऊल जमिनीवर ठेवले त्यानंतर ती स्थानापन्न झाली.
विशेष म्हणजे या सर्व खुणा पाहावयास मिळतात. अभ्यासकांच्या मते ह्या देवीचे मूळ नांव ‘वणजाई’ असून चांद्रसेनीय कायस्थ प्रभू लोकांची कुलस्वामिनी आहे. चैत्र शुद्ध अष्टमीला यात्रेच्या उत्सवाला प्रारंभ होतो. उत्सवातील एक प्रमुख भाग म्हणजे कीर्तन होय. हे कीर्तन सुरु होताना आणि संपण्यापूर्वी गोंधळ घातला जातो.
गोंधळ हे नांव जरी या प्रकाराला असले तरी त्यात गोंधळ कुठेच नसतो. हा गोंधळ म्हणजे निरनिराळ्या देवांना केलेले आवाहन होय. उत्सव अष्टमीपासून चालू झाला तरी त्यातील महत्त्वाचे दिवस हे एकादशी ते पौर्णिमा हेच असतात. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते उत्सव संपेपर्यंत गावातील गुरव घराण्याला काम पाहावे लागते.
श्री कालभैरव मंदिरातील व्यवस्था पाहाणे, पूजाअर्चा करणे गुरव घराण्याला करावी लागतात. श्री महालक्ष्मीच्या स्वयंभू मूर्तीला एकादशीच्या दिवशी मुखवास चढवला जातो. मुखवास म्हणजे देवीचा सोन्याचा तयार केलेला मुखवटा होय. त्याशिवाय सभामंडपात व रथामध्ये बसवली जाते तीरथपुतळी, आद्यदैवत श्री कालभैरव, सोमेश्वर व त्यांच्यामध्ये वास करणारा महापुरुष यांनादेखील चांदीचा मुखवटा चढवला जातो.
हा मुखवटा उतरेपर्यंत गावकरी जागता पहारा देतात. याला तेथे जागरणी’ म्हणतात. द्वादशीच्या दिवशी सर्व गावातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. प्रत्येक सुवासिनीची ओल्या हरभऱ्यांनी ओटी भरली जाते. महिलांच्या कलागुणांना वाव दिला जातो. त्रयोदशीचे रात्री देवीच्या देवळात जो कार्यक्रम होतो त्याला गावची जत्रा म्हटले जाते.
यादिवशी देवांच्या दरबारांत भालदार चोपदार सुंदर बयाणेम्हणतात. त्यानंतरचा कार्यक्रम म्हणजे विडेवाटणी होय. महालक्ष्मीच्या दरबारात हा विडा मिळणे फार मानाचे तसेच भाग्याचे समजले जाते. या उत्सवास सर्व जाती जमातीच्या लोकांना मानाचे स्थान आहे. दिवसा कार्यक्रम असणारे उत्सवामधील जे काही दोन दिवस आहेत ते म्हणजे गावची जेवणावळ व देवीची रथयात्रा हे होत.
हा रथ सागवानी लाकडाचा असतो. हा रथ खांद्यावर वाहून नेतात त्यापैकी आहे. या रथाला चार दांडे असतात. हा रथ जड असून दहा माणसे उचलण्यासाठी लागतात. रथाच्या मखरात श्री महालक्ष्मीची मूर्ती बसवली जाते. गावात रथ फिरवताना पुढे पुजारी व मागे भालदार-चोपदार असतात. दुसऱ्या दिवशी पहाटे गोंधळ, कीर्तन वगैरे कार्यक्रम होतात. अशा प्रकारे देवी व श्री कालभैरवाचा महोत्सव साजरा होतो. ही दैवते अतिशय जागृत असून नवसाला पावणारी आहेत. अशी या दैवताची ख्याती आहे.