हजार मंदिरांची सुवर्णनगरी कांचीपुरम्
कांचीपुरम् हे जिल्ह्याचे ठिकाण असून याला सागरकिनारा लाभलेला आहे. कांचीपुरम् हे शहर चेन्नईपासून ७१ कि. मी. वर असून जवळ विमानतळ आहे. हे शहर राज्यातील इतर शहरांना रेल्वेमार्ग आणि रस्त्यांनी जोडले आहे. येथील रेशमी तसेच सोनेरी जरीच्या शुद्ध रेशमी साड्या जगप्रसिद्ध आहेत. हिंदू यात्रास्थानातील अत्यंत महत्त्वाचे प्राचीन शहर तसेच कांचीपुरम् हे सहस्त्र मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ‘कांची कामकोटी’ हा प्रसिद्ध मठ येथेच आहे.
हिंदू धर्मात ज्या ७ मोक्षदायक पुऱ्या सांगितल्या आहेत. त्यापैकी ही एक आहे. ‘काशी-कांची’ हे शिवाचे दोन नेत्र होत असे ब्रह्मांड पुराणात म्हटले आहे. शैववैष्णव या दोघांनाही ती सारखीच पवित्र वाटते. कांचीला ‘दक्षिण काशी’ म्हणतात. – येथे श्रीविष्णूच्या १०८ दिव्य क्षेत्रांपैकी १३ क्षेत्रे याच परिसरात आहेत. या क्षेत्री पुण्यकारक कृत्य शतपटीने वाढते. म्हणून ब्रह्मदेवाने येथे अश्वमेध यज्ञ केला होता.
कांची हे शक्तीपीठ तसेच कांचीचे नांव ‘कांचीपुरम् ‘ असे होते. येथे जन्म व मृत्यू होणे हे भाग्याचे मानले जाते. या नगरीचे दोन भाग आहेत. एक शिवकांची व दुसरे विष्णूकांची. येथे शिवाची १०८ तर विष्णूची १८ ते २० मंदिरे पाहावयास मिळतात. विष्णूकांची क्षेत्री श्रीवल्लभाचार्य महाप्रभूची बैठक असून विष्णूची शेषशायी मूर्ती सरोवरातील पाण्यात असते. ती २० वर्षातून एकदा पाण्यातून बाहेर काढतात.
या विष्णूकांचीला ब्रह्मदेवाचे तप:स्थान मानतात. दक्षिण भारतात रथोत्सवाचे महत्त्व फारच आहे हे आपण पाहातो आणि हा रथोत्सव पाहाण्यासाठी दूर दूरच्या ठिकाणाहन लोक रथोत्सव पाहावयास गर्दी करतात. संध्याकाळी विष्णूकांची क्षेत्री रथ सजवून त्यात विष्णूची मूर्ती ठेवून तिची पूजा-अर्चा, आरती ओवाळून, रथाजवळ नारळ फोडून भाविकजन दोरखंड हातात घेऊन विष्णूच्या नांवाने जयघोष करुन मोठ्या मिरवणुकीने रथ ओढत ओढत शिवकांची येथे आणतात.
मिरवणुकीत जयघोषाबरोबर मंगलवाद्ये ही असतात. मिरवणुकीच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक घरातील स्त्रिया पूजा करतात. हा रथ फिरत फिरत दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा विष्णूकांचीला येतो. हा सोहळा पाहाण्यासारखा असतो. या रथयात्रेत हिंदूमधील एकात्मतेचा भाव दिसून येतो. नाना जातीपोटजातीची मंडळी सहभाग घेतात. सध्या देवींची ५१ शक्तीपीठ अस्तित्त्वात आहेत. त्यापैकी कांची हे एक शक्तीपीठ आहे. मृत सतीदेवीचा अस्थिपंजर येथे पडला. कांचीपुरम्ला हजारो मंदिरांची सुवर्णनगरी म्हणतात.