होळी पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी । Holi Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला होळी पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी । Holi Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – तुलसीविवाह

Contents

होळी मराठी । Holi Information in Marathi

फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी पौर्णिमा असे म्हणतात. हिला हुताशनी किंवा होलिका असेही म्हणतात. या दिवशी घरोघरी होळी पेटवून तिची पूजा केली जाते. सार्वजनिक स्वरूपात हा होळीचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होतो. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकणात हा होळीचा सण फाल्गुन शुद्ध पंचमीपासून फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत असतो. पौर्णिमेच्या अगोदर घराघरातून लाकडे, गोवऱ्या, गवत इत्यादी वस्तू जमा केल्या जातात. मग पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर किंवा गावातील लोकांना सोयीचे असेल अशा ठिकाणी मोकळ्या जागी होळीची जागा तयार करून मधोमध माड, पोफळ, एरंड, ऊस किंवा केळीचे झाड पुरतात व त्याच्या सभोवती लाकडे, गोवऱ्या, गवत इत्यादी रचतात.

या वेळी सगळ्यांनी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावयाचे असते. मग जे कोणी मानकरी असतील त्यांच्या हस्ते होळी पेटविली जाते व तिची पूजा केली जाते. मग इतर लोक पूजा करतात. होळीत नैवेद्य म्हणून नारळ टाकतात. या दिवशी भोजनासाठी व नैवेद्यासाठी पुरणपोळीच करतात. होळीला पोळी हवीच. होळीची पूजा झाल्यावर तिच्या भोवती प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करतात. घरगुती स्वरूपात मात्र दुपारी भोजनापूर्वी घराच्या अंगणात पाच गोवऱ्यांची होळी तयार करून तिची पूजा करतात.

हा सण केव्हा सुरू झाला, का सुरू झाला व या दिवशी होळी का पेटवितात याविषयी अनेक उद्बोधक कथा,आख्यायिका आहेत. सत्ययुगात रघू नावाचा एक सर्वगुणसंपन्न, प्रतापी राजा होता. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे. कुणाला अकाली मृत्यू येत नसे. सर्व लोक धर्माने, न्यायनीतीने वागत. त्यामुळे सगळे लोक धनधान्याने समृद्ध होते. एके दिवशी काही लोक वाचवा! वाचवा! असे ओरडत रघुराजाकडे आले. रघूने त्यांची विचारपूस केली तेव्हा लोक म्हणाले, महाराज ढुंढा नावाची एक राक्षसी आमच्या मुलाबाळांना फार त्रास देते. तिच्यावर कोणत्याही मंत्रतंत्राचा परिणाम होत नाही. तिची सर्वांना अतिशय भीती वाटते. लोक असे सांगत होते त्या वेळी वसिष्ठ ऋषी तेथे होते. ते म्हणाले – ही ढुढा राक्षसी माली नावाच्या दैत्याची मुलगी आहे.

तिने भगवान शंकरांची आराधना करून “मला देव, मनुष्य, राक्षस, शस्त्र-अस्त्र इत्यादीपासून कधीही मृत्यू येऊ नये” असा वर मागून घेतला होता. प्रसन्न झालेल्या शंकरांनी तसा वर दिला व तिला सांगितले, तुला उन्मत्त मुलांची भीती राहील. या ढुंढा राक्षसीपासून सुटका होण्याचा उपाय सांगतो. आज फाल्गुन शुद्ध पौर्णिमा आहे. या दिवशी सर्वांनी धीट बनावे. आरडाओरडा करावा. नाचावे, गाणी म्हणावीत, लहान मुलांनी लाकडाच्या तलवारी घेऊन युद्धाचा खेळ खेळावा. वाळकी लाकडे, गोवऱ्या, गवत इत्यादी गोळा करून त्यांचा ढीग तयार करावा व मंत्रपूर्वक तो पेटवावा.

यालाच होळी म्हणतात. पेटलेल्या होळीभोवती प्रदक्षिणा घालाव्यात. मोठी आरडाओरड, आक्रोश करणाऱ्या मुलांच्या तलवारीच्या भीतीने ती राक्षसी पळून जाईल व पुन्हा येणार नाही. वसिष्ठांनी असे सांगितले असता रघुराजाच्या आज्ञेने लोकांनी त्या फाल्गुन पौर्णिमेला सगळीकडे होळ्या पेटविल्या. आरडाओरड केली, शंखध्वनी केला. त्यामुळे घाबरलेली ढुंढा राक्षसी पळून गेली. त्या दिवसापासून हा ढुंढा राक्षसीचा उत्सव सुरू झाला. ढुंढा हीच या होळीची देवता आहे. गावातील पीडा नाहीशी व्हावी, गावावरील संकट दूर व्हावे व ते पुन्हा कधीही येऊ नये यासाठी होळीचा उत्सव करावयाचा असतो.

याच दिवशी भगवान शंकरांनी मदनाला जाळून भस्म केले. शिवगणांनी वाईट शब्द उच्चारून मदनाचा धिक्कार केला. म्हणूनच कदाचित, या दिवशी होळी पेटल्यावर अचकट विचकट शिव्या देण्याची चाल पडली असावी. गोकुळात बाळकृष्णाला ठार मारण्यासाठी आलेल्या पूतना राक्षसीला कृष्णाने ठार मारले. मग गवळयांनी त्या राक्षसीचे तुकडे तुकडे करून तिला जाळले. ही घटना फाल्गुन पौर्णिमला घडली. हिरण्यकश्यपूच्या बहिणीला अग्नीपासून मृत्यू येणार नाही असा वर होता. आपल्या भावाच्या आज्ञेनुसार ती प्रल्हादाला जाळण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन आगीत बसली.

परंतु भगवान विष्णूच्या कृपेने ती चिता (होळी) जळून गेली तरी प्रल्हादाला काहीही झाले नाही. तो सुखरूप राहिला. त्या आनंददायक प्रसंगाचे स्मरण म्हणून होळी साजरी करण्याची चाल सुरू झाली. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धुळवड किंवा धूलिवंदन असते. या दिवशी रंग, गुलाल, होळीची राख, पाणी एकमेकांच्या अंगावर उडवून आनंदाची देवाण-घेवाण केली जाते. आपल्या जीवनातील अमंगल, अशुभ, पापमय असे जे काही असेल ते जाळून टाका, हाच संदेश आपणास हा सण देतो.

रंगपंचमी | Holi Information in Marathi

फाल्गुन वद्य पंचमी या दिवशी रंगपंचमी हा सण असतो. उत्तर भारतात हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तिकडे होळी पौर्णिमेपासून पुढचे पाच दिवस हा सण चालू असतो. रंगपंचमीच्या दिवशी सगळे स्त्री-पुरुष घराबाहेर पडून नृत्यगायनाचे कार्यक्रम करतात. या वेळी सर्वत्र रंग खेळणे चालू असते. थट्टामस्करी करीत एकमेकांवर रंग उडविला जातो. काहीजण गुलाल उधळतात. तिकडे होळीला व रंगपंचमीला होरी असे म्हणतात. हा सण मुख्यतः लहान मुलामुलींचा आहे. खूप रंग तयार करून तो पिचकारीने एकमेकांच्या अंगावर उडविणे हा या दिवशीचा मुख्य कार्यक्रम.

एकमेकांच्या अंगावर रंग उडवून सगळ्यांचे कपडे रंगीबेरंगी झालेले पाहणे ही यातील खरी मजा असते. हा रंगपंचमीचा सण का सुरू झाला याचे निश्चित कारण सांगता येत नाही. तथापि वसंत ऋतू, मदन, नववर्ष, वृक्षांना येणारी नवीन पालवी, गोकुळातील श्रीकृष्ण व गोपगोपी यांनी खेळलेली रंगपंचमी इत्यादींशी या सणाचा संबंध असावा. त्या-त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपल्याकडे हा रंगपंचमीचा सण साजरा केला जात असावा.

रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे. या वेळी वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागते. जुने, वाळलेले, नको असलेले होळीत जाळून टाकलेले असते. वर्षभरातील वाईट कृत्ये, वाईट वासना, वाईट विचार होळीच्या वेळी जाळून टाकायचे असतात, नष्ट करायचे असतात. आता वसंत ऋतू येईल, नवीन वर्षाचे आगमन होईल, वृक्षवेलींना नवीन पालवी येईल. सगळ्या पृथ्वीवर नवचैतन्याचा संचार होईल. त्या नववर्षाचे स्वागत करायचे, स्वागतगीते म्हणायची, नाचायचे, बागडायचे यासाठी सर्वजण रंग उधळतात. हीच ती रंगपंचमी. पूर्वी तारकासुर नावाचा एक भयंकर दैत्य होता.

सर्व देवांचा त्याने पराभव केला. भगवान शंकरांचा पुत्रच तारकासुराचा वध करील अशी भविष्यवाणी होती. शंकरांचा पार्वतीशी विवाह झाला होता, पण ते हिमालयावर ध्यानस्थ बसून तप करीत होते. तेव्हा सर्व देवांच्या सांगण्यानुसार मदनाने शंकरांचे मन विचलित केले. आपल्याला पुत्र व्हावा असा विचार त्यांच्या मनात आला. शंकरांनी डोळे उघडले. आपले मन विचलित कोणी केले, असा ते विचार करीत होते. तोच त्यांना समोर मदन दिसला. शंकर क्रुद्ध झाले. त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून मदनाला क्रोधाग्नीने जाळून भस्म केले. मदन जळून गेल्याने त्याची पत्नी रती रडू लागली. ती शंकरांना शरण गेली.

तेव्हा शंकरांनी मदनाला पुन्हा अनंगरूपाने (शरीररहित) जिवंत केले. मदन जिवंत झाल्याने सर्वांना आनंद झाला. तो आनंद त्यांनी एकमेकांवर रंग उडवून साजरा केला. त्या दिवशी फाल्गुन वद्य पंचमी होती. या प्रसंगाची आठवण म्हणून तेव्हापासून रंगपंचमीचा सण सुरू झाला असावा. गोकुळात बाल श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी कंसाने पूतना नावाची राक्षसी पाठविली होती. पूतना सुंदर-तरुण गोपीचे रूप धारण करून गोकुळात आली व कृष्णाला कडेवर घेऊन खेळवू लागली. परंतु ईश्वरी अवतार असलेल्या बाळकृष्णाने पूतनेचा डाव ओळखला व तिचे प्राण हरण केले. त्या पूतनेचे प्रचंड धूड जमिनीवर कोसळले.

मग गवळ्यांनी त्या पूतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले व ते जाळून टाकले. त्या वेळी श्रीकृष्णाचा अद्भुत पराक्रम व पूतनेचा नाश, याचा आनंदोत्सव गोकुळात साजरा करण्यात आला. श्रीकृष्णाने गोपगोपींबरोबर नृत्यगायन करीत रंग उडविला. त्या दिवशी फाल्गुन वद्य पंचमी होती. त्या प्रसंगाचे स्मरण म्हणून हा रंगपंचमीचा सण सुरू झाला असे म्हणतात. रंगपंचमी हा सर्वांना आनंद देणारा, नवीन वर्षाचे स्वागत करणारा, जीर्ण सृष्टी होळीत जळून गेली, आता नवीन सृष्टीचा उदय होणार हे सुचविणारा सण आहे.

मराठेशाहीत व पेशवाईत हा सण राजवाड्यात मोठ्या आनंदाने साजरा केला जात असे. या दिवशी सर्वांनी रंग खेळावा. त्यामुळे आनंद होतो. उत्साह वाढतो. मात्र आजकाल रंगपंचमीच्या नावाने जो किळस आणणारा प्रकार केला जातो तो मात्र सर्वांनी टाळला पाहिजे. चांगल्या कार्याचे, चांगल्या आचारविचाराचे स्वागत करणारा, सदाचरणाची प्रेरणा देणारा हा सण आहे. हे सर्वानी लक्षात ठेवले पाहिजे.

काय शिकलात?

आज आपण होळी पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी । Holi Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: