हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला हनुमान जयंती माहिती, इतिहास मराठी । Hanuman Jayanti Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – परशुराम जयंती
हनुमान जयंती मराठी । Hanuman Jayanti Information in Marathi
हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा या दिवशी मारुतीचा – हनुमंताचा सूर्योदयाच्या वेळी जन्म झाला. म्हणून या दिवशी आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतात. बुद्धी आणि शक्ती यांचा आदर्श म्हणजे हनुमान. या हनुमंताची जन्मकथा मोठी अद्भुत आहे. खूप वर्षांपूर्वीची म्हणजे प्रभुरामचंद्राचा अवतार झाला त्या वेळची गोष्ट आहे.
किष्किंधा राज्यातील ऋष्यमूक पर्वतावर केसरि नावाचा एक बलाढ्य वानर होता. तो सुग्रीवाचा सेनापती होता. त्याच्या पत्नीचे नाव होते अंजनी. अंजनीने पुत्रप्राप्तीसाठी ऋष्यमूक पर्वतावर कठोर तपश्चर्या केली. तिच्या भक्तीने प्रसन्न झालेले शंकर अंजनीला दर्शन देऊन म्हणाले “हे अंजनी, तुझी इच्छा असेल तो वर माग.” तेव्हा अंजनी म्हणाली, “मला यशवंत, कीर्तिवंत, महाप्रतापी, वज्रदेही, अत्यंत बुद्धिमान, चिरंजीव असा पुत्र द्या.” शंकर म्हणाले, “मी अकरावा रुद्र तुझ्या पोटी अवतार घेईन. हे अंजनी, तू ओंजळ पसरून माझे ध्यान करीत बैस.
मोठा सोसाट्याचा वारा सुटेल त्या वेळी प्रत्यक्ष वायूच तुला प्रसाद आणून देईल. तो तू भक्षण कर म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल,” असे सांगून शंकर गुप्त झाले. अंजनी डोळे मिटून ध्यान करीत बसली. तिचे मन आनंदाने भरून गेले होते. याच वेळी अयोध्येत दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. प्रसन्न झालेल्या अग्निदेवाने यज्ञवेदीत प्रकट होऊन दशरथाला प्रसादाची थाळी दिली.
आनंदित झालेल्या दशरथाने पुत्रप्राप्ती करून देणारा तो प्रसाद कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या आपल्या राण्यांना दिला. त्याच वेळी एका घारीने कैकेयीच्या हातातील प्रसादावर झडप घातली व तो प्रसाद पळविला. त्या वेळी सोसाट्याचा वारा सुटला. वाऱ्याने-वायूने घारीच्या तोंडातील प्रसाद ओढला व तो अंजनीच्या ओंजळीत टाकला. अंजनीने शिवस्मरण करून तो प्रसाद भक्षण केला. त्या दिव्य प्रसादाने अंजनी गर्भवती झाली. चैत्र महिना चालू होता. नवमास पूर्ण होताच चैत्र पौर्णिमेला मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी अंजनी प्रसूत झाली.
तिला साक्षात सूर्यासारखा तेजस्वी, अक्षय्य सुवर्णकौपिन धारण केलेला, यज्ञोपवीत धारण केलेला वानररूप पुत्र झाला. तिने त्याचे नाव मारुती असे ठेवले. – मारुती जन्मास आल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी एक अद्भुत घटना घडली. बाल मारुतीला अतिशय भूक लागली. भुकेने कासावीस झालेला तो रडू लागला. तेव्हा अंजनी त्याच्यासाठी फळे आणावयास गेली. अगदी सकाळची वेळ होती. पूर्व दिशेला लाल रंगाचे सूर्यबिंब दिसले. मारुतीला ते फळ आहे असे वाटले म्हणून ते पकडण्यासाठी त्याने आकाशात झेप घेतली. तो अत्यंत वेगाने सूर्याकडे झेपावत होता.
सगळीकडे हाहाकार झाला. त्या वेळी राहू सूर्याला ग्रासण्यासाठी सूर्याच्या जवळ आला होता. मारुतीने एका फटक्यात राहूला रक्तबंबाळ केले. मारुतीने सूर्याला पकडले पण ते फळ नाही हे लक्षात येताच त्याला फेकून दिले. ही गोष्ट इंद्राला समजताच तो देवसेनेसह धावत आला. परंतु मारुतीने इंद्राला एक फटका मारून ऐरावतासह त्याला उडवून लावले. पुढे आलेल्या यमालाही मारुतीने झोडपून काढले. सगळे देव भयभीत झाले. या विचित्र प्राण्याचा बंदोबस्त कसा करायचा हे त्यांना समजेना.
मग इंद्राने मारुतीच्या तोंडावर वज्रप्रहार केला. त्यामुळे मारुती बेशुद्ध पडला. मारुती जमिनीवर बेशुद्ध पडलेला पाहून वायूला अतिशय दुःख झाले. त्याला इंद्राचा राग आला. या दुष्ट इंद्राने माझ्या बाळावर निर्दयपणे वज्र फेकले. आता मी अवघ्या त्रैलोक्याचा नाश करतो! असे म्हणून वायूने वाहणे बंद केले. सर्वांचे प्राण आकडून घेतले. त्यामुळे सर्वांचे प्राण कोंडले. अवघे त्रैलोक्य कासावीस झाले. मग सगळे देव वायूला शरण गेले. वायू बेशुद्ध पडलेल्या मारुतीला मांडीवर घेऊन रडत होता. शरण आलेल्या देवांनी मारुतीला अनेक वर दिले. विष्णू म्हणाले, हा मारुती चिरंजीव होईल.
शंकर म्हणाले, या मारुतीवर कोणत्याही शस्त्रास्त्रांचा परिणाम होणार नाही. इंद्र म्हणाला, हा मारुती वज्रदेही, अक्षय-अभंग राहील. माझ्या वज्राची याला बाधा होणार नाही. माझे वज्र याच्या हनुवटीला लागले म्हणून आजपासून हा ‘हनुमान’ या नावाने ओळखला जाईल. यम म्हणाला, याचे जो नित्य स्मरण करील त्याला माझी पीडा कधीही होणार नाही.
वरुण म्हणाला, याला युद्धात कधीच थकवा येणार नाही. अशा रीतीने सर्व देव मारुतीला अनेक वर देऊन निघून गेले. मग वायू पूर्वीसारखा वाहू लागला. त्रैलोक्यावर आलेले संकट गेले. सावध झालेल्या मारुतीला घेऊन वायू अंजनीकडे आला. अंजनीला अतिशय आनंद झाला. असा हा मारुती. सप्तचिरंजीवांत याची गणना केली जाते. आपल्या अंतर्बाह्य शत्रूवर विजय मिळविलेला मारुती शक्ती-बुद्धीने संपन्न होता. भक्ती आणि शक्ती यांचा उत्तम संगम म्हणजे मारुती. चैत्र पौर्णिमेला सकाळी मारुती मंदिरात हनुमान जयंती साजरी करतात.
हनुमंताची पूजा, जन्मकाळाचे कीर्तन, हनुमंताच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक, कुस्त्यांच्या स्पर्धा इत्यादी कार्यक्रम या दिवशी करतात. हनुमान श्रीरामांचा आदर्श भक्त असून सीता-शोधकार्यात व राम-रावण युद्धात याने अचाट, अद्भुत पराक्रम केला होता. हनुमान हा चिरंजीव, मनोवेगी, वान्यासारखा वेगवान, इंद्रियांवर ताबा असलेला, बुद्धिमान लोकांत श्रेष्ठ आहे.
आयुष्यभर श्रीरामचंद्राचा सेवक म्हणून राहण्यात त्याने धन्यता मानली. आजकाल आपल्या समाजात रावण, कुंभकर्ण खूप माजले आहेत. अशा वेळी रामकार्य करणाऱ्या मारुतीची गरज आहे. रावणी विचार व वत्ती यांचे दहन करणाऱ्या वीर मारुतीची गरज आहे. रामसंस्कतीचे रक्षण करणाऱ्या दास मारुतीची गरज आहे. समाज बलवान, सुसंस्कृत व्हावयास हवा. याची प्रेरणा घेण्यासाठी व आदर्श रामभक्ताचे स्मरण करण्यासाठी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करावयाचा असतो.
काय शिकलात?
आज आपण हनुमान जयंती माहिती, इतिहास मराठी । Hanuman Jayanti Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.