हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा माहिती, इतिहास मराठी । Guru Purnima Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – आषाढी एकादशी
गुरुपौर्णिमा मराठी । Guru Purnima Information in Marathi
आषाढी पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. किमान पाच हजार वर्षांपूर्वी आषाढ पौर्णिमेला पुराणपुरुष नारायणाने व्यासरूपाने अवतार धारण केला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या न्यायाने व्यासांचा जन्म अत्यंत श्रेष्ठ कुळात झालेला होता. महर्षी वसिष्ठांचा पुत्र शक्ती. शक्तीचा पुत्र पराशर व पराशरांचा पुत्र व्यास, अशी व्यासांची वंशपरंपरा आहे. पराशर ऋषी व योजनगंधा यांच्या पोटी व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. व्यासांचा जन्म पराशरांपासून यमुना नदीच्या बेटात झाला, म्हणून व्यासांना पाराशर्य व द्वैपायन असे म्हणतात. त्यांचा वर्ण घननील होता, म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असेही म्हटले जाते.
जन्माला येताच योजनगंधा-सत्यवतीला व्यास म्हणाले- “माते, तुझ्यावर जेव्हा एखादे संकट येईल तेव्हा तू माझे स्मरण कर. त्याच क्षणी मी तुला दर्शन देईन.” असे सांगून व्यास तपश्चर्येसाठी निघन गेले. व्यासांना जगद्गुरूमानलेले आहे. व्यासांनी वेदसंहिता तयार केल्या. एक लक्ष श्लोकांचे महाभारत, अठरा पुराणे व ब्रह्मसूत्रे या ग्रंथांची रचना केली. महाभारताला ‘पंचम वेद’ असे म्हटले आहे. सर्व ज्ञानाचा उदय व्यासांपासून झाला. म्हणूनच म्हटले आहे – ‘जे महाभारतात आहे. ते इतरत्रही आहे. परंतु जे महाभारतात नाही ते कुठेही नाही.’ याचा अर्थ जगातील सर्व ज्ञानविषय महाभारतात आहेत. व्यासांच्या पूर्वी एकच एक प्रचंड वेदराशी होती. परंतु कलियुगात मनुष्याला आयुष्य कमी आहे व धारणाशक्ती, स्मरणशक्तीही कमी आहे. म्हणून वेदरक्षण होणार नाही. हे लक्षात घेऊन व्यासांनी वेदांचा व्यास म्हणजे विस्तार केला.
एका प्रचंड वेदाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे चार भाग केले. म्हणून व्यासांना वेदव्यास असे गौरवाने म्हटले जाते. व्यासांचे अनेक शिष्य होते. त्यांत पैल, वैशंपायन, जैमिनी व सुमंतू हे चार प्रमुख शिष्य होते. व्यासांनी वेदसंहिता तयार केल्यावर पैलास ऋग्वेद दिला. वैशंपायनास यजुर्वेद दिला. जैमिनीला . सामवेद व सुमंतूला अथर्ववेद दिला व वेदविद्येचे रक्षण करण्यास सांगितले. त्या वेळी वेदविद्या मिळाल्यामुळे आनंदित झालेल्या या चार शिष्यांनी व्यासांची पूजा करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. ज्ञानदात्या आपल्या गुरूंना अभिवादन केले.
ही गोष्ट आषाढ पौर्णिमा या दिवशी घडली म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. तेव्हापासून व्यासांना जगद्गुरू मानून या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा सुरू झाली. नारायणाचे अवतार असलेले वेदव्यास अलौकिक महापुरुष होते. त्यांची थोरवी सांगताना म्हटले आहे : भगवान वेदव्यास हे चार मुखे नसलेले ब्रह्मदेव, फक्त दोनच हात असलेले विष्णू व कपाळावर तृतीय नेत्र नसलेले शंकर आहेत. व्यास खऱ्या अर्थाने जगद्गुरू-अवघ्या विश्वाचे गुरू, मार्गदर्शक होते. अखिल मानवाच्या कल्याणाचा त्यांनी विचार केला.
मानवाचा सर्वांगीण उत्कर्ष कसा होईल याचे मार्गदर्शन केले. त्यांची भगवद्गीता विश्वधर्म सांगणारी आहे. ज्यामुळे समाजाचे रक्षण व वर्धन होते त्यास धर्म असे म्हणतात, अशी त्यांनी धर्माची व्याख्या सांगितली आहे. परोपकार केल्याने पुण्य व परपीडेने पाप घडते असे त्यांच्या अठरा पुराणांचे सार आहे. राज्यकर्ता नीतिमान, समर्थ व सावध असेल तर राष्ट्र सुखी होते, राष्ट्रधर्म राज्याच्या सुव्यवस्थेवर चालतो, अशी राजनीती त्यांनी सांगितली आहे. मनुष्य हाच या जगात सर्वश्रेष्ठ असून त्याचे हात हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे. मनुष्यांनी कधीही नीती सोडू नये. अधर्माने धन मिळवू नये.
श्रमातून मिळणारे धनच मनुष्याला सुखशांती देते, असा त्यांनी सर्व मानवांना उपदेश केला आहे. म्हणूनच व्यासांना जगद्गुरू मानले आहे. त्यांच्या पूज्य स्मृतीसाठी दरवषी आषाढ पौणिमेला श्री व्यासपौणिमा हा उत्सव साजरा केला जाता. व्यास पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. भारतीय संस्कृतीत गुरूला फार मोठे स्थान आहे. गुरू म्हणजे मार्गदर्शक. गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. सद्गुरूशिवाय सत्याचे ज्ञान, परमेश्वराचे ज्ञान प्राप्त होत नाही. गुरू हा ब्रह्मा-विष्णू-महेशस्वरूप आहे. गुरू हा साक्षात परब्रह्म-परमेश्वर आहे, असे मानले आहे.
गुरू हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा निर्माता, विष्णूप्रमाणे सवृत्तीचा, सदाचाराचा पालक व शंकराप्रमाणे दुर्गुण व दुराचारांचा संहारक आहे. अशा गुरूच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे. ज्याच्यापासून आपणास ज्ञानप्राप्ती होते, त्याला गुरू असे मानून त्याची पूजा करावी. गुरुदेव दत्तात्रेयांनी सुद्धा सत्तावीस गुरू केले होते असे म्हणतात. गुरू हा आपल्या शिष्याच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा करून तेथे ज्ञानाचा प्रकाश पाडतो. म्हणून आपल्या जीवनात गुरुपदाला फार महत्त्व आहे.
भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरा फार मोठी आहे. याज्ञवल्क्य-जनक, सांदीपानी-श्रीकृष्ण, श्रीकृष्ण-अर्जुन, विश्वामित्र-श्रीराम व लक्ष्मण, रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद, निवृत्तिनाथ-ज्ञानेश्वर, समर्थ रामदास- शिवाजी असे अनेक श्रेष्ठ गुरू-शिष्य सांगता येतील. प्राचीन काळी विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात शिकण्यासाठी जात असत. त्या काळी अध्ययन-अध्यापनाची सुरुवात आषाढ महिन्यातील पौर्णिमेला होत असे. प्रथम सर्व विद्याथी आपल्या गुरूंची पूजा करीत असत व नंतर अध्यापनाला सुरुवात होत असे.
तेव्हापासून गरुपूजनाचा-गुरुपौणिमेचा उत्सव सुरू झाला. भगवान वेदव्यास हे अखिल मानवाचे गुरू होते. म्हणून परंपरेने आपण व्यासपूजा ही गुरुपूजा मानली आहे. काळ बदलला तरी या परंपरा नष्ट होत नाहीत, होऊ नयेत, म्हणून दरवर्षी निदान या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना- शिक्षकांना आदरपूर्वक एखादे फूल देऊन त्यांना नमस्कार करावा व आपली गुरूबद्दलची पूज्यबुद्धी-कृतज्ञता व्यक्त करावी. या दिवशी आपल्या गुरूचे आशीर्वाद लाखमोलाचे असतात.
काय शिकलात?
आज आपण गुरुपौर्णिमा माहिती, इतिहास मराठी । Guru Purnima Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.