गुढीपाडवा माहिती, इतिहास मराठी | Gudi Padwa Information in Marathi
हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला गुढीपाडवा माहिती, इतिहास मराठी | Gudi Padwa Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – हनुमान जयंती
गुढीपाडवा मराठी | Gudi Padwa Information in Marathi
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आपला वर्षारंभ. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवशी झाली. आपल्या घरात पंचांग असते. आपले पंचांगवर्ष याच दिवसापासून सुरू होते. याच दिवसाला गुढी पाडवा किंवा नववर्ष दिन असे म्हणतात. फार प्राचीन काळी आपल्या भारत देशात शालिवाहन नावाचा राजा होऊन गेला. तो अत्यंत थोर, शूर वीर होता. याच वेळी भारतात शक नावाचे परकीय राजे होते. ते येथील लोकांना अतिशय त्रास देत असत. सगळ्यांना छळत. जुलूम करीत असत. त्यांना दरवर्षी शेकडो सुंदर मुलींची खंडणी द्यावी लागत असे.
शकांचा विजय साजरा करण्यासाठी आपल्या मुलींच्या साडी – चोळीची गुढी उभी करावी लागत असे. या शक राजांना प्रथम विरोध केला तो प्रतिष्ठानच्या-पैठणच्या शालिवाहन राजाने. असे म्हणतात की त्याने मातीचे सैन्य तयार केले व त्यांत प्राण भरला. त्याचा अर्थ असा की त्या काळात लोक चेतनाहीन, भ्याड-भेकड, स्वाभिममानशून्य होते. शालिवाहनाने त्यांच्यातील पराक्रम जागा केला. त्यांच्या ठिकाणी देश-धर्म-संस्कृती याबद्दलचे प्रेम निर्माण केले. त्यांच्यात परकीयांबद्दल चीड निर्माण केली व सर्वांना परकीयांशी युद्ध करण्यास सज्ज केले.
मग शालिवाहनाने स्वकीयांना बरोबर घेऊन शकांची जुलमी राजवट नष्ट केली. सगळीकडे आनंदीआनंद झाला. लोकांनी आपली घरे सजवली-नटवली. विजयाचा ध्वज उभा केला. या दिवसापासून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू केली. हा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. यालाच आपण वर्षप्रतिपदा किंवा गुढी पाडवा असे म्हणतो. या दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा आपल्या पुराणग्रंथांन आहेत. फार वर्षांपूर्वी चेदी देशात वसू नावाचा एक थोर राजा राज्य करी होता.
एके दिवशी तो आपले राज्य सोडून अरण्यात गेला. तेथे तो तपश्चर्या करू लागला. त्याची खडतर तपश्चर्या पाहून स्वर्गाचा राजा इंद्र घाबरला. आता हा वसुराजा आपले स्वर्गाचे राज्य घेणार, अशी त्याला भीती वाटू लागली. मग इंद्र व इतर देव वसुराजाकडे आले व त्याला म्हणाले “वसुराजा, तू स्वर्गाचे राज्य करण्यास योग्य आहेस. परंतु पृथ्वीचा सांभाळ करण्यास तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. म्हणून काही वर्षे तरी तूच पृथ्वीवर राज्य कर,” असे बोलून देवांनी वसुराजाला अनेक उत्तम शस्त्रे दिली. एक ध्वज दिला.
मग इंद्र हात जोडून म्हणाला “हे वसुराजा, या पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय एकही मित्र नाही. मी तुला एक वैजयंतीमाळ देतो.” ” हिचा मला काय उपयोग?” वसुराजाने विचारले. इंद्र म्हणाला, “ही माळ तू गळ्यात घातलीस की कोणत्याही युद्धात तुला एकही जखम होणार नाही. तुला सर्वत्र विजय मिळेल.” मग इंद्राने वसुराजाच्या गळ्यात वैजयंतीमाळ घातली व साधुलोकांच्या रक्षणासाठी वेळूची एक काठी दिली. वसुराजाने सुंदर वस्त्रे, अलंकार व फुलांच्या माळा यांनी ती काठी सुशोभित केली.
तिची स्थापना केली व गंध-अक्षता-फुलांनी तिची पूजा केली. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. तोच हा गुढी पाढवा सण. याच दिवशी ब्रह्मदेवाने हे जग प्रथम उत्पन्न केले. श्रीरामांनी लंकेवर स्वारी करून रावणाशी युद्ध केले व रावणसत्तेचा पूर्ण नाश केला. रावणाच्या बंदिवासातून सीतेची मुक्तता केली. मग श्रीराम-लक्ष्मण व सीता अयोध्येला परत आले.
अयोध्यानगरीत आनंदीआनंद झाला. लोकांनी सगळीकडे विजयाच्या गुढ्या उभारल्या. मोठा उत्सव केला. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवशी घरातील सर्वांनी भल्या पहाटे उठावे. स्नान करावे. घर, अंगण स्वच्छ करावे. सडा- सारवण घालावे. सुंदर सुंदर रांगोळ्या काढाव्यात. दारावर आंब्याच्या पानांची तोरणे बांधावीत.
वेळूच्या काठीला पैठणी किंवा भरजरी वस्त्र नेसवून कडुलिंबाच्या पाल्याने, फुलांच्या माळांनी तिला सजवावे. शक्य असेल तर तिला साखरेची माळ बांधावी. काठीच्या मस्तकाच्या ठिकाणी चांदीचा, पितळेचा किंवा तांब्याचा गडू पालथा घालावा व दारासमोर रांगोळी घातलेल्या जागी सूर्योदयाच्या वेळी तिची स्थापना करावी. हिलाच गुढी असे म्हणतात. त्या गृढीची गंध-अक्षता-फुलांनी पूजा करावी. त्या वेळी गुढीची म्हणजेच ब्रह्मध्वजाची अशी प्रार्थना करावी –
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।
प्राप्ते स्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु।।
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुढीवर अक्षता टाकून ती व्यवस्थित उतरवावी. ही गुढी म्हणजे आपल्या पूर्वजांच्या विजयाची गुढी. आनंदाची गुढी. ही गुढी म्हणजे आपल्या मनातील विकारांवर, वाईट वासनांवर, आळसावर मिळवलेल्या विजयाची पताका. या दिवशी प्रातःकाळी स्नान झाल्यावर कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, सैंधव, जिरे व ओवा या वस्तू एकत्र वाटून खाण्याची प्रथा आहे.
कडुलिंबाला अमृतवृक्ष म्हणतात. त्याची पाने खाल्ल्याने सर्व रोगांचा नाश होतो. कोणताही रोग होत नाही. सुख, आरोग्य, विद्या, बल, आयुष्य, बुद्धी व संपत्ती यांचा लाभ होतो. याच वेळी वसंत ऋतू सुरू होतो. हा दिवस अत्यंत पवित्र व शुभ समजलेला आहे.
आपल्या प्रसिद्ध साडेतीन मुहूर्तात एक पूर्ण मुहूर्त म्हणून याची गणना केली जाते. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यास हा दिवस उत्तम समजला जातो. विद्यार्थ्यांनी या दिवशी विद्याव्रताला प्रारंभ करावा. आपल्या पंचांगाची सुरुवात याच दिवशी होते. या दिवशी नूतन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना पाठवून सर्वांचे कल्याण चिंतावे म्हणजे आपलेही कल्याण होते.
काय शिकलात?
आज आपण गुढीपाडवा माहिती, इतिहास मराठी | Gudi Padwa Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.