धन अनेक प्रकारचं असतं. पशुसंपदा हीसुद्धा शेतकऱ्याचं धनच! त्या पशुसंपदेमधलं सर्वांत महत्त्वाचं धन म्हणजे गो-धन! पूर्वी राजाकडेसुद्धा असं विपुल गोधन असायचं. त्यामधूनही राजेमंडळी ब्राह्मणांना गोदान करून मोठे पुण्य पदरी जोडून घेत असत. गायीला आपण गो-माता किंवा देवता मानतो. गाय ही नुसती पवित्रच नाही, तर तिच्या पोटात तेहतीस कोटी देव निवास करत आहेत, असंही आपण मानतो.
पण एक गोष्ट ठाऊक आहे का? गाय ही जशी सर्वांगाने पवित्र मानली गेली असली, तरी ती तोंडाकडून पवित्र मानत नाहीत. ह्याच कारणासाठी गाईचं दर्शन हे तिच्या शेपटीकडील भागाकडून घेतले जाते. हे ठाऊक आहे का? आता गाईचं मुख हे अपवित्र अन् शेपूट हे पवित्र का मानतात, ह्या संदर्भात एक पौराणिक कथा सांगितली जाते.
ती अशी आहे की काशीनगरी ही भगवान शिवशंकरांची नगरी! त्या नगरीचा रक्षक-त्याचं नाव कालभैरव. कालभैरव हासुद्धा भगवान शिवशंकर ह्यांचाच एक अवतार!” एकदा विष्णू भगवान आणि ब्रह्मदेव ह्या दोघांच्यात सर्वांत श्रेष्ठ कोण, असा वाद निर्माण झाला. विष्णू म्हणाले, “मी सकलविश्वाचे संगोपन करतो, संवर्धन करतो; तेव्हा मीच श्रेष्ठ.” तर ह्यावर ब्रह्मदेवांचं म्हणणं असं की, “ही सकलसृष्टी मीच निर्माण केली आहे, म्हणून मीच श्रेष्ठ!” अखेर हा वाद काशीनगरीतल्या त्या कालभैरवांकडे म्हणजेच शिवशंकरांकडे सोडवण्यासाठी आला.
तेव्हा शंकर त्यांना म्हणाले, “हे पाहा, तुमच्यापैकी जो कुणी स्वर्गातला माझ्या मस्तकावरचा मुकुट आणि पाताळामधले माझे पाय आधी पाहून परत येईल, त्यालाच आपण श्रेष्ठ ठरवू या.” झालं, ही अट दोन्ही देवांनी एकदम मान्य केली. ब्रह्मदेव म्हणाले, “आदिनाथा, मी तुमचा स्वर्गातला मुकुट पाहून येतो.” तर विष्णू म्हणाला, “प्रभू, मला आपल्या सिद्ध चरणांचे दर्शन घ्यायला आवडेल. मी पाताल लोकांत जातो.”
असं म्हणून ब्रह्मदेव हे उर्ध्वगमन करते झाले, तर विष्णू हे शिवपद शोधण्यासाठी खाली पाताळनगरीतच जाऊ लागले… एक-एक स्वर्गलोक पाहत-पाहत ब्रह्मा हे जवळ-जवळ एकवीस स्वर्ग फिरले; पण त्यांना काही आदिनाथांच्या मस्तकावरील मुकुटाचे दर्शन झाले नाही. तर इकडे एक-एक करीत विष्णू जवळजवळ सप्त-पाताळ खाली गेले. तरी त्यांना ही शिवचरणाचा ठावठिकाणा लागला नाही.
मग भगवान विष्णू ह्यांनी त्वरित माघारी परत येऊन शिवचरणाजवळ सरल शरणागती पत्करली आणि ते विनम्रभावे तेथेच बसून राहिले. तर तिकडे एकवीस स्वर्ग शोधत-शोधत वर जाऊनसुद्धा खरं तर ब्रह्मदेवाला त्या शिव मुकुटाचा शोध लागला नाही. पण असं अयशस्वी कसं परतायंच- असा विचार करून ब्रह्मदेवाने एक कपटकारस्थान केलं. इतकंच नव्हे, तर ब्रह्मदेवाने आपल्या ह्या कारस्थानात स्वर्गलोकीची कामधेनू ही गाय आणि केतकी ह्या वनस्पतीला सामील करून घेतलं.
त्या दोघींना साक्षीदार म्हणून सोबत घेऊन ब्रह्मदेव हे कालभैरव म्हणजेच शिव यांच्याकडे येऊन दाख्ल झाले. “काय ब्रह्मदेवा, झाले का शिव मुकूटाचे दर्शन?” भैरवाने विचारले. आणि खरं तर त्या शिवमुकुटाचे खरेखुरे दर्शन झालेले नसताना ही ब्रह्मदेवाने मात्र सरळ ‘हो, झाले ना दर्शन’, असे सांगितले. इतकेच नव्हे, तर ब्रह्मदेवाने आपल्यासोबत आणलेल्या कामधेनू अन् केतकी ह्यांचा पुरावे पुढे केले. त्या शिवमुकुट दर्शनाला ह्या दोघी साक्षीदार आहेत, असे निक्षून सांगितले.
तेव्हा कालभैरवांनी प्रथम कामधेनूला प्रश्न केला, “काय गं गोमाते! ह्या ब्रह्मदेवांनी खरोखरच माझ्या मुकुटाचे दर्शन घेतले का?” त्याच वेळी ब्रह्मदेवांच्या पूर्ण सांगण्या अन् शिकविल्याप्रमाणे कामधेनूने ‘हो झाले ना दर्शन’ असे म्हटले मात्र अन् तोंड हलविले. आणि तत्क्षणीच कालभैरव ह्यांनी हे ओळखले की, कामधेनू ही खोटी साक्ष देते आहे.
तेव्हा ब्रह्मदेवाच्या असत्य वचनास पुष्टी देणाऱ्या त्या कामधेनूवर रागावलेल्या भैरवांनी तिला शाप दिला की, “हे कपिले, तू ज्या तोंडाने ही खोटी साक्ष दिली आहेस. ते हे तुझे तोंड अपवित्र समजले जाईल. तुझा रंग बदलेल, तुला नाना रंग प्राप्त होतील.” हा शाप ऐकताच कामधेनू शंकरांना शरण गेली. तिने क्षमा मागितली. तेव्हा भगवान शिव म्हणाले, “कपिले, तुझे तोंड अपवित्र मानले गेले, तरी लोक तुझे शेपटीकडून दर्शन घेतील. तुझे शेपूट पवित्र मानले जाईल.”
तात्पर्य : असत्याला कधीही पाठीशी घालू नका. खोटं बोलू नका. खोटी साक्ष देऊ नका.